बुलेट ट्रेन दिल्यामुळेच जपानच्या माजी पंतप्रधानांना पद्म पुरस्कार; संजय राऊतांचा टोला
By ऑनलाइन लोकमत | Published: January 26, 2021 01:18 PM2021-01-26T13:18:55+5:302021-01-26T13:24:17+5:30
केंद्र सरकारने प्रजासत्ताक दिनाच्या पूर्व संध्येला पद्म पुरस्कारांची घोषणा केली. पुरस्काराच्या यादीवरुन शिवसेना नेते संजय राऊत यांनी केंद्र सरकारवर जोरदार टीका केली आहे.
केंद्र सरकारने प्रजासत्ताक दिनाच्या पूर्व संध्येला पद्म पुरस्कारांची घोषणा केली. पुरस्काराच्या यादीवरुन शिवसेना नेते संजय राऊत यांनी केंद्र सरकारवर जोरदार टीका केली आहे.
"ज्यांना पद्मश्री पुरस्कार मिळाले ते काबिल असतील. त्यांचं मी स्वागत करतो. बुलेट ट्रेन दिल्यामुळेच जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबे यांना पद्म पुरस्कार देण्यात आला असावा", असं संजय राऊत म्हणाले. राज्य सरकारने पद्म पुरस्कारांसाठी केंद्राकडे एकूण ९८ नावांची शिफारस केली होती. यामधून सहा जणांची पद्म पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. यावरुनही संजय राऊत यांनी केंद्रावर निशाणा साधला.
"महाराष्ट्र राज्य इतकं मोठं आहे. त्यात इतके लोक काम करतात. पण महाराष्ट्रातील केवळ ६ जणांनाच पुरस्कार देण्यात आला आहे. राज्यातील १० ते १२ जणांना दरवर्षी हा पुरस्कार देण्यात येतो. यंदा फक्त सहाच जणांना पुरस्कार देता? ही नावं पाहून मला आश्चर्य वाटलं", असं संजय राऊत म्हणाले.
केंद्र सरकारने देशातील ११९ कर्तृत्ववान व्यक्तींना पद्म पुरस्कार जाहीर केला आहे. त्यामध्ये, महाराष्ट्रातील 6 जणांना हा पुरस्कार जाहीर करण्यात आला असून राज्य सरकारने शिफारस केलेल्या सिंधुताई सपकाळ यांना पद्मश्री पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. राज्य सरकारने शिफारस केलेल्या नावांच्या यादीत शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांचंही नाव होतं. संजय राऊत यांनाही पद्म पुरस्कारने सन्मानित करण्याची शिफारस केंद्र सरकारकडे करण्यात आली होती. मात्र, केंद्राने केवळ एकाच नावाला पंसती दिली असून इतर ९७ व्यक्तींना यंदा तरी पद्म पुरस्कारासाठी नाकारले आहे.
महाराष्टाच्या यादीत कुणाकुणाचा होता समावेश
महाराष्ट्राने केंद्राला पाठवलेल्या ९८ जणांच्या यादीत शिवसेना नेते संजय राऊत यांच्यासह प्रख्यात उद्योगपती मुकेश अंबानी, लिटिल मास्टर सुनील गावसकर, एचडीएफसी बँकेचे अध्यक्ष दीपक पारेख यांसारख्या दिग्गजांचा समावेश होता. सिंधुताई सपकाळ, ‘सिरम’चे अदर पूनावाला, प्रोफेशनल स्कायडायव्हर शीतल महाजन, अभिनेत्री माधुरी दीक्षित, अभिनेते मोहन आगाशे, कै. राजारामबापू पाटील व डॉ. मिलिंद कीर्तने यांची नावे पद्मभूषणसाठी गेल्या सप्टेंबरमध्येच केंद्राकडे पाठविण्यात आली होती.