राजकारणात नसता, तर काय व्हायला आवडलं असतं; संजय राऊत म्हणाले...
By ऑनलाइन लोकमत | Published: July 24, 2021 10:02 AM2021-07-24T10:02:21+5:302021-07-24T10:03:49+5:30
Sanjay Raut : संजय राऊत यांनी उलगडला आपला जीवनप्रवास. राऊत यांनी शेअर केले मजेदार किस्से.
शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबतच काम करायचं आहे हे मनात पक्क होतं, अशी एक आठवण शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी आपला प्रवास उलगडताना सांगितली. लोकमतचे ज्येष्ठ पत्रकार अतुल कुलकर्णी यांनी शिवसेनेचे नेते संजय राऊत यांची राजकारणाच्या पलीकडे जाऊन एक खास मुलाखत घेतली. यावेळी त्यांनी अनेकविध विषयांवर मनसोक्त आणि मनमोकळेपणाने गप्पा मारल्या. "मला पत्रकाराचीच भूमिका आवडते. मी कधीही पत्रकारीता दूर होऊ दिली नाही. खासदारकी, शिवसेनेचं नेतेपद सगळ्या गोष्टी पत्रकार असल्यानं माझ्याकडे आल्या. मला बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत काम करायचं हे मनात पक्क होतं. माझं कुटुंब त्यांच्यासोबत अनेक वर्ष काम करत होतं. खासदार, मंत्री हे माझं स्वप्न होतं," अस संजय राऊत म्हणाले.
... जर मी लिहायचं म्हटलं तर खूप स्फोट होतील : संजय राऊत
"राजकारणात नसतो तर मी पत्रकारचं झालो असतो. पत्रकारीतेलाच मी माझा पेशा म्हणून स्वीकारलं होतं. मी बाळासाहेब ठाकरे यांच्या जवळ असल्यामुळे राजकारणात आलो. सामना या वृत्तपत्राची दखल ही सर्वत्र घेतली जाते. त्याचा संपादक हा राजकारणीच असतो. संपादकांना एखादी भूमिका असावी, ती नसली तर वृत्तपत्र पुढे नेता येणार नाही. टिळक, आगरकर, अत्रे यांनाही भूमिका होती," असंही राऊत म्हणाले.
"सामना हे माझं खरं घर आहे. माझं संपूर्ण आयुष्य त्या ठिकाणी काढलं. मी शिवसेना भवनात जातो, उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री नव्हते तेव्हा मी अनेकदा मातोश्रीवर जायचो, देशभरात जातो, अशा अनेक गोष्टी मला आवडतात," असंही ते म्हणाले. यावेळी त्यांनी आपल्या घरातील एक मजेशीर किस्साही सांगितला. "माझ्या मुलींना वाटतं की मला काही गोष्टींचं ज्ञान नाही. मग त्या मला ज्ञान देण्याचा प्रयत्न करतात. घरी आल्यावर युट्यूब वगैरे अशा काही गोष्टी करतो. त्या मला अनेक गोष्टी या पाहा ते पाहा हे सांगत असतात. सध्याची पीढी ही इतिहासापासून तुटत चाललीये. सध्या जे चाललंय तेच त्यांना इतिहास वाटतो. देश कसा घडला याचा इतिहास त्यांना माहित नाही," असंही ते म्हणाले.