"रावसाहेब दानवेंची जीभ कापणाऱ्याला दहा लाखांचे बक्षीस"
By ऑनलाइन लोकमत | Published: December 12, 2020 04:42 PM2020-12-12T16:42:21+5:302020-12-12T16:55:23+5:30
santosh dhavale : दानवेंची जीभ कापण्यासाठी आपण केवळ कुणावर अवलंबून राहणार नसून स्वत:ही योग्य संधीची प्रतीक्षा करू आणि हे काम फत्ते करू, असेही ढवळे यांनी स्पष्ट केले.
यवतमाळ : दिल्लीत सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनामागे पाकिस्तान-चीनचा हात असल्याचे बेताल वक्तव्य करणारे भाजपा नेते आणि केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांची जीभ कापणाऱ्या व्यक्तीला दहा लाख रुपयांचे रोख बक्षीस देऊ, अशी घोषणा यवतमाळातील शिवसेनेच्या आंदोलनात विधानसभा मतदारसंघ संपर्क प्रमुख संतोष ढवळे यांनी केली. पेट्रोल-डिझेल दरवाढ आणि दानवेंच्या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी शनिवारी येथील दत्त चौकात शिवसैनिक एकत्र आले. यावेळी प्रचंड घोषणाबाजी करण्यात आली.
या आंदोलनाबाबत यवतमाळ विधानसभा संपर्क प्रमुख संतोष ढवळे यांनी 'लोकमत'ला सांगितले की, आंदोलनाच्या दहा मिनिटपूर्वी येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून आलेला एक इसम भेटला. आपल्याला रक्ताची गरज आहे, रक्त मिळत नाही, भाजपावाल्यांकडे गेलो तर ते शिव्या देतात, तुम्ही लोक आंदोलन करत नाही, मस्त गाड्यांमध्ये फिरता, अशा शब्दात त्यांनी सुनावले. त्यांच्या वक्तव्याने आपण क्षणात एक निर्णय घेतला. आपल्याला शेतकऱ्यांच्या मुलांनी लोकवर्गणी करून चारचाकी वाहन पक्ष कार्यासाठी व समाजसेवेसाठी उपलब्ध करून दिले आहे.
शेतकऱ्यांबाबत वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या रावसाहेब दानवे यांची जीभ जो कोणी कापेल, त्याला आपण लगेच हे १२ लाखांचे वाहन भेट देऊ, त्या क्षणापासून आपण पायी फिरू, वाहन वापरणार नाही, एवढेच नव्हे तर त्याला आणखी दहा लाख रुपयांचे रोख बक्षीस दिले जाईल. शिवाय, त्याची रक्ततुलाही केली जाईल, अशी घोषणा आपण लगेच शिवसेनेच्या दत्त चौकातील आंदोलनात केल्याचे संतोष ढवळे यांनी सांगितले.
या घोषणेचे उपस्थितांनी जोरदार स्वागत केले. दानवेंची जीभ कापण्यासाठी आपण केवळ कुणावर अवलंबून राहणार नसून स्वत:ही योग्य संधीची प्रतीक्षा करू आणि हे काम फत्ते करू, असेही ढवळे यांनी स्पष्ट केले. या आंदोलनात शिवसेनेचे जिल्हा प्रमुख पराग पिंगळे, राजेंद्र गायकवाड यांच्यासह विविध पदाधिकारी सहभागी झाले होते.
भाजपाचेही निषेध आंदोलन
दरम्यान, सेनेच्या आंदोलनाच्या काही वेळ पूर्वी भाजपानेही याच दत्त चौकात आंदोलन केले. त्यांनी पश्चिम बंगालमध्ये भाजपच्या ताफ्यावर दगडफेक झाल्याच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा निषेध नोंदविला.