नारायण राणेंची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा, पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे शिवसेनेची मागणी
By ऑनलाइन लोकमत | Published: August 24, 2021 10:37 AM2021-08-24T10:37:58+5:302021-08-24T10:43:37+5:30
Vinayak Raut : नारायण राणे यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करण्यात यावी, असे पत्र शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लिहिले आहे.
मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविषयी भाजपाच्या जनआशिर्वाद यात्रेदरम्यान आक्षेपार्ह विधान केल्याबद्दल केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्याविरोधात शिवसैनिक संतप्त झाले आहेत. तसेच, नाशिक, पुणे आणि महाडमध्ये नारायण राणेंविरोधात गुन्हे दाखल झाले आहेत. यातच नारायण राणे यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करण्यात यावी, असे पत्र शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लिहिले आहे.
"मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविषयी आक्षेपार्ह विधान केल्याप्रकरणी नारायण राणे यांना मंत्रिमंडळातून काढून टाकण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिले आहे. अशी भाषा सहन करू नये, शिष्टाचार राखला पाहिजे", असे विनायक राऊत यांनी म्हटले आहे.
नारायण राणेंविरोधात गुन्हा दाखल
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करताना नारायण राणे यांनी आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. या प्रकरणी नाशिक येथे नारायण राणे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा गुन्हा दाखल झाल्यानंतर आता नारायण राणे यांच्या अटकेची शक्यता वर्तवण्यात येत आहे. शिवसेनेचे महानगर प्रमुख सुधाकर बडगुजर यांच्या तक्रारीनंतर हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच, नाशिकच्या पोलीस आयुक्तांकडून नारायण राणे यांच्या अटकेचे आदेश देण्यात आले होते. त्यानंतर नाशिक पोलिसांचे पथक चिपळूणच्या दिशेने रवाना झाले आहे. हे पथक दुपारच्या सुमारास चिपळूणमध्ये दाखल होईल.
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्याविरुद्ध पुण्यातही गुन्हा दाखल https://t.co/uDAg3NKGUQ@BJP4India@CPPuneCity@ShivSena#narayanrane
— Lokmat (@MiLOKMAT) August 24, 2021
नेमकं काय म्हणाले होते नारायण राणे?
नारायण राणे यांची जनआशीर्वाद यात्रा सध्या कोकणात आहे. रायगडच्या महाडमध्ये पत्रकारांशी बोलताना राणे यांनी मुख्यमंत्र्यांबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमात उपस्थितांना संबोधित करताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवी वर्ष असल्याचे विसरले. त्यावेळी त्यांनी हीरक महोत्सव हा शब्द वापरला. मात्र, तिथे उपस्थित असलेले राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी मुख्यमंत्र्यांना अमृत महोत्सव असल्याचे सांगितले. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी आपली चूक सुधारली. त्यावरुन नारायण राणे यांनी मी तिथे असतो तर कानाखाली लगावली असती, असा शब्दांत नारायण राणे यांनी मुख्यमंत्र्यांवर प्रहार केला होता.