"शिवसेना नेत्यांनाच सरकार पडणार असल्याची सारखी भीती वाटतेय"
By ऑनलाइन लोकमत | Published: November 14, 2020 05:50 PM2020-11-14T17:50:38+5:302020-11-14T17:56:42+5:30
Praveen Darekar News : शिवसेना नेते संजय राऊत यांना माध्यमांशी बोलल्याशिवाय चैन पडत नाही, पोटशूळ बाहेर काढल्याशिवाय त्यांना समाधान मिळत नाही.
मुंबई - राज्यातील सरकार पाडणार, असे कोणीही बोलले नसताना शिवसेना नेत्यांना केवळ भीतीने ग्रासले आहे, म्हणूनच शिवसेना नेत्यांनाच स्वत: सरकार पडणार असल्याची सारखी भीती वाटत असावी, असा टोला विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांनी मारला आहे.
शिवसेना नेते संजय राऊत यांना माध्यमांशी बोलल्याशिवाय चैन पडत नाही, पोटशूळ बाहेर काढल्याशिवाय त्यांना समाधान मिळत नाही. सरकारने एक वर्षे पूर्ण केल्याचे राऊत सांगत आहेत, पण सरकारचा कारभार कोणीही करीत असतो, गाडी पुढे जात असते, पण या एका वर्षात काय केले असा सवाल प्रविण दरेकर यांनी उपस्थित केला आहे. सरकारने महाराष्ट्रातील शेतक-यांना दिलेला शब्द पाळला नाही, शेतकरी अतिवृष्टीने हैराण झाला आहे, कोकणात निर्सग वादळातील शेतक-यांना मदत नाही, कामगार बेजार आहे, बेरोजगारीचे करार करतात पण प्रत्यक्षात काही होत नाही, आजही कोविड नियंत्रणात आणू शकत नाही, या परिस्थितीत आमच्या सरकारने एक वर्षे पूर्ण केले अशा गमजा ते मारत असल्याची टीकाही दरेकर यांनी केली.
ऑपरेशन लोटसबाबत आम्ही काहीच बोललो नाही. तेच म्हणतात की, यामुळे साधे खरचटले नाही, पण भाजपाने काही ठरविले तर खरचटायचे तर दूर राहिले, रक्तबंबाळ व्हाल असा इशारा देतानाच दरेकर म्हणाले की, थडगी उकरून काढण्यची भाषा राऊत करीत आहे, पण बोलायाला फक्त त्यांनाच येते असे त्यांनी समजू नये. सगळ्यांना बोलायला येते. मग थडगी काय आणि दुसरे काय सर्वांनाच पर्दाफाश करता येईल, त्यामुळे कोणी आव्हान देण्याची भाषा करु नये, असेही दरेकर यांनी स्पष्ट केले.