VIDEO: "मला कोरोनाचे जंतू सापडले असते, तर मी ते फडणवीसांच्या तोंडात कोंबले असते"
By ऑनलाइन लोकमत | Published: April 18, 2021 10:25 AM2021-04-18T10:25:21+5:302021-04-18T10:31:30+5:30
फडणवीसांवर टीका करताना शिवसेना आमदार संजय गायकवाड यांचं बेताल वक्तव्य
बुलडाणा: देशातील कोरोना रुग्णांचा दिवसागणिक वाढत असताना, आरोग्य व्यवस्थेवर मोठा ताण असताना दुसऱ्या बाजूला राजकारण जोरात सुरू आहे. राज्यातील रेमडेसिविरच्या तुटवड्यावरून सत्ताधारी महाविकास आघाडी आणि भारतीय जनता पक्षात जोरदार जुंपली आहे. काल रात्री हा वाद थेट पोलीस ठाण्यात पोहोचला. आता यावरून शिवसेना आमदार संजय गायकवाड यांनी केलेल्या विधानानं नवा वाद निर्माण होण्यची शक्यता आहे.
दमणच्या फार्मा कंपनीच्या मालकाला पोलिसांनी घेतले ताब्यात; फडणवीस, दरेकर पोहोचले
महाराष्ट्राला रेमडेसिविर इंजेक्शन पुरवाल तर परवाना रद्द करू, अशी धमकी केंद्र सरकारनं रेमडेसिविर तयार करणाऱ्या कंपन्यांना दिल्याचा गंभीर आरोप राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री नवाब मलिक यांनी केला. यानंतर भाजपनं आक्रमक भूमिका घेतली. आरोप सिद्ध करा, अन्यथा माफी मागा, असं खुलं आव्हान भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी मलिक यांना दिलं. यानंतर काल दमणमधील एका फार्मा कंपनीच्या मालकाला मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतलं. याची माहिती समजताच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, प्रवीण दरेकर यांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली.
...तर मी कोरोनाचे जंतू देवेंद्र फडणवीसांच्या तोंडात कोंबले असते; शिवसेना आमदार संजय गायकवाड यांची जीभ घसरली https://t.co/CbvSFUjpi9pic.twitter.com/6jw7ZRhmTC
— Lokmat (@MiLOKMAT) April 18, 2021
रेमडेसिविरवरून महाविकास आघाडी आणि भाजपमध्ये झालेला संघर्ष संपताना दिसत नाहीए. शिवसेनेचे बुलडाण्याचे आमदार संजय गायकवाड यांनी भाजप आणि देवेंद्र फडणवीस यांना लक्ष्य केलं. फडणवीस यांच्यावर टीका करताना गायकवाड यांनी पातळी सोडली. 'तुमच्या सरकारमुळे लाखो लोक मरतील त्याचं काय? ज्याचा घरातला माणूस मरतो, ज्याच्या घरात जीव जातो, त्याला समजतं की कोरोना काय आहे? मला कोरोनाचे जंतू सापडले असते तर मी देवेंद्र फडणवीसांच्या तोंडात कोंबून टाकले असते,' असं गायकवाड म्हणाले.
“महाराष्ट्राला रेमडेसिवीर इंजेक्शन पुरवाल तर परवाना रद्द करू”; मंत्री नवाब मलिकांचा खळबळजनक दावा
रात्री पोलीस ठाण्यात हाय व्होल्टेड ड्रामा
दमणच्या ब्रुक फार्मा या कंपनीच्या मालकाने महाराष्ट्राला रेमडेसीवीर इंजेक्शन देण्यास पुढाकार घेतला होता. त्याला पोलिसांनी अचानक ताब्यात घेतल्याने मोठी खळबळ उडाली आहे. या कंपनीच्या मालकाला पार्लेच्या पोलीस ठाण्यात बराच वेळ बसवून ठेवण्यात आले होते. त्याला बीकेसी पोलीस ठाण्यात नेण्यात आले . यामुळे फडणवीस आणि दरेकर या पोलीस ठाण्याकडे निघाले.
महत्वाचे म्हणजे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर आणि प्रसाद लाड हे अलीकडेच दमनला या कंपनीमध्ये गेले होते. तेथे त्यांनी रेमडेसीवीरची ५० हजार इंजेक्शने बुक केल्याचे सांगितले होते. प्रदेश भाजपतर्फे राज्य सरकारला ५० हजार रेमडेसिविर इंजेक्शन्स भेट देण्यात येणार होती. राज्यात या इंजेक्शनचा तुटवडा असताना विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकाराने भाजपने राज्य शासनाला मदतीचा हात पुढे केला होता. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर आणि प्रदेश भाजपचे उपाध्यक्ष आ. प्रसाद लाड यांनी सोमवारी दमणमधील ब्रुक फार्मा कंपनीच्या व्यवस्थापनाशी चर्चा केली. त्यानंतर ५० हजार रेमडेसिविर खरेदी करण्याचे ठरले. दमणमधून ही इंजेक्शन्स आणण्यासाठी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाची परवानगी लागते. ती मंगळवारपर्यंत मिळणार आहे, असे लाड यांनी ‘लोकमत’ला सांगितले होते.