"३१ मे लक्षात ठेवा! तुम्ही सगळे महाराज एकत्र या; मग होऊन जाऊद्या आमने-सामने"
By ऑनलाइन लोकमत | Published: May 12, 2021 05:24 PM2021-05-12T17:24:31+5:302021-05-12T17:26:36+5:30
संजय गायकवाड यांच्या विधानानंतर अनेक वारकरी संप्रदायातील लोकांनी फोन करून त्यांचा निषेध व्यक्त केला.
बुलडाणा – शिवसेना आमदार संजय गायकवाड यांची एक ऑडिओ क्लीप सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. कोरोनासंदर्भात संजय गायकवाड यांची स्थानिक वृत्तपत्रात बातमी छापून आली होती. यावरून वारकरी संप्रदायात नाराजी पसरली. मांसाहार केल्याने रोगप्रतिकारशक्ती वाढेल, कोरोनातून तुम्हाला देव वाचवायला येणार नाही असं विधान आमदार संजय गायकवाड यांनी केले होते.
संजय गायकवाड यांच्या विधानानंतर अनेक वारकरी संप्रदायातील लोकांनी फोन करून त्यांचा निषेध व्यक्त केला. यावेळी संजय गायकवाड यांनी कथित ऑडिओ क्लीपमध्ये वारकऱ्यांना गर्भित इशारा दिल्याचं ऐकायला मिळतं. या ऑडिओ क्लीपमधील आवाज संजय गायकवाड यांचाच असल्याचा दावा केला जातो. संजय गायकवाड म्हणतात की, तुम्हाला काय वाटायचं ते वाटू दे. पण मी रोज २०-२५ जणांच्या अस्थी जाळू लागलो, तुमच्या लोकांची श्रद्धा आहे हे मला माहित्येय, पण मी जे बोललो ते वास्तव आहे. मी पण नास्तिक नाही परंतु काळाची गरज आहे ते बोललो. तुम्ही सगळ्या महाराजांनी वेगवेगळे फोन करू नका. माझ्याकडे वेळ नाही. तुम्ही सगळे एकत्र या मग बघू. आमचं लॉकडाऊन ३० मे ला उठतंय, ३१ मे ला तुम्ही सिंदखेडराजाला या मग आमनेसामने बघू काय होतं? असंही संजय गायकवाड बोलत असल्याचं ऐकायला मिळत आहे.
“उपास-तापासाची वेळ नाही, रोज अंडे, मटन खा”; कोरोनाकाळात देवही वाचवायला येणार नाही”
मुलाखतीत काय म्हटलं होतं?
कोरोनाकाळात मंदिरंही बंद आहेत. देव पण लॉक करण्यात आले आहेत. तुम्हाला वाचवायला कोणी येणार नाही. स्वत:ची काळजी स्वत:लाच घ्यायची आहे. त्यामुळे उपास तापास बंद करा, रोज ४ अंडे खा. एक दिवसाआड चिकन खा आणि प्रोटिनयुक्त भरपूर खा असा सल्ला त्यांनी लोकांना दिला आहे.
मला फोन करणाऱ्या प्रत्येक वारकऱ्याशी मी बोलू शकत नाही. सध्याची महामारी आणि कठोर निर्बंध पाहता तुम्ही सर्वांनी ठरवून एक दिवस सिंदखेड राजा येथील जिजाऊ सृष्टीवर बसून संवाद साधू, असे मला फोन करणाऱ्यांना मी सांगितले. शिवसेनेला आणि आपल्याला बदनाम करण्याचे हे भाजपच्या वारकरी सेलचे षडयंत्र आहे - संजय गायकवाड, शिवसेना आमदार, बुलडाणा