राष्ट्रवादी खासदार सुनील तटकरे यांच्याविरोधात शिवसेना आमदाराने मांडला हक्कभंगाचा प्रस्ताव
By प्रविण मरगळे | Published: October 24, 2020 08:29 AM2020-10-24T08:29:00+5:302020-10-24T08:31:46+5:30
NCP MP Sunil Tatare, Shiv Sena News: सातत्याने माझ्या मतदारसंघात होणाऱ्या शासकीय कार्यक्रमाला डावलणे, कार्यक्रमाचं निमंत्रण न देणे हा माझ्या हक्कावर गदा आणण्याचा प्रयत्न राष्ट्रवादी खासदार सुनील तटकरे यांच्याकडून केला जात आहे.
मुंबई – राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस या महाविकास आघाडीचं सरकार असलं तरी स्थानिक पातळीवर अद्यापही तिन्ही पक्षाच्या नेत्यांमध्ये मतभेद असल्याचं उघड होत आहे. मतदारसंघात होणाऱ्या विकासकामांच्या भूमिपूजनाला निमंत्रण देत नसल्याने, सातत्याने कार्यक्रमाला डावलत असल्याने राष्ट्रवादी खासदार सुनील तटकरे यांच्याविरोधात शिवसेना आमदार योगेश कदम यांनी हक्कभंगाचा प्रस्ताव विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांच्याकडे पाठवला आहे.
याबाबत योगेश कदम यांनी सांगितले की, दापोली मतदारसंघात खासदार सुनील तटकरे मला डावलून शासकीय कार्यक्रम घेत असतात. १२ ऑक्टोबर रोजी मला निमंत्रण न देता पंचायत समिती सभागृहात शासकीय अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक घेतली. रायगड व रत्नागिरी जिल्हा जोडणारा आंबेत पुलाच्या पुनर्बांधणीसाठी मी प्रयत्न केले. राज्यमंत्री आदिती तटकरे यांच्यासोबत बैठका घेतल्या. म्हाप्रळ ते आंबेत फेरी बोट सेवा सुरु करण्यासाठी जेटीचे बांधकाम करण्यासाठी शासकीय निधी मंजूर झाला. मात्र या कामाचं वर्क ऑर्डर न काढताच खासदार सुनील तटकरे, त्यांचे चिरंजीव आमदार अनिल तटकरे आणि माजी आमदार संजय कदम यांना घेऊन कामाचे भूमिपूजन केले. या कार्यक्रमाचे निमंत्रण मला दिले नाहीत, तसेच याठिकाणी लावण्यात आलेल्या पाटीवरही स्थानिक आमदार म्हणून माझं नाव टाकलं नाही. खासदारांनी राष्ट्रवादी पक्षाचा भूमिपूजन कार्यक्रम केला असा आरोप त्यांनी केला.
त्यामुळे सातत्याने माझ्या मतदारसंघात होणाऱ्या शासकीय कार्यक्रमाला डावलणे, कार्यक्रमाचं निमंत्रण न देणे हा माझ्या हक्कावर गदा आणण्याचा प्रयत्न राष्ट्रवादी खासदार सुनील तटकरे यांच्याकडून केला जात आहे. त्यामुळेच २० ऑक्टोबरला विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांच्याकडे मी हक्कभंग प्रस्ताव दाखल केला आहे. सुनील तटकरे यांच्यावर योग्य ती कारवाई करण्याची विनंती आमदार योगेश कदम यांनी केली आहे. मात्र या प्रकारामुळे आता कोकणात महाविकास आघाडीतील धुसफूस चव्हाट्यावर आली आहे. एका खासदाराविरोधात हक्कभंग आणण्याची घटना पहिल्यांदाच होत आहे.
दरम्यान, दापोली पंचायत समितीत जी बैठक झाली, त्यात स्थानिक आमदार योगेश कदम उपस्थित का नाहीत? अशी विचारणा केली असता पूर्वनियोजित कार्यक्रमामुळे ते या बैठकीला येणार नसल्याचं खासदार सुनील तटकरेंनी तेव्हा पत्रकारांना सांगितले होते. जिल्हा आणि स्थानिक पातळीवर तिन्ही राजकीय पक्षांमध्ये समन्वय साधण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचंही तटकरे म्हणाले. येत्या काही दिवसात महाविकास आघाडीच्या लोकप्रतिनिधींना, पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना विश्वासात घेऊन कामे मार्गी कशी लावायची हे ठरवू असंही सुनील तटकरेंनी सांगितले आहे.