कुछ तो गडबड है... शिवसेना शहरप्रमुख येताच शिवसेनेच्या आमदारांनी घेतला काढता पाय!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 10, 2021 02:03 PM2021-08-10T14:03:20+5:302021-08-10T14:03:38+5:30

आमदार त्यांच्या कार्यकर्त्यांसह डम्पिंगच्या ठिकाणावरून निघून गेल्यावर वातावरण काही प्रमाणात निवळलं

Shiv Sena MLAs left dumping site after shiv sena city president arrives | कुछ तो गडबड है... शिवसेना शहरप्रमुख येताच शिवसेनेच्या आमदारांनी घेतला काढता पाय!

कुछ तो गडबड है... शिवसेना शहरप्रमुख येताच शिवसेनेच्या आमदारांनी घेतला काढता पाय!

Next

अंबरनाथ: अंबरनाथ शहरातील डम्पिंग ग्राउंड स्थलांतरित करण्यासाठी पालकमंत्र्यांनी आदेश दिले आहे. त्या आदेशानुसार शनिवारी आमदार आणि मुख्याधिकारी यांनी डम्पिंग ग्राउंडची पाहणी केली. ही पाहणी सुरू असतानाच त्या ठिकाणी शहरप्रमुख आल्याने काही प्रमाणात अस्वस्थता निर्माण झाली. आमदारांची कोंडी करण्यासाठीच शहरप्रमुख याठिकाणी आल्याची चर्चा रंगू लागली. अखेर आमदार आपल्या कार्यकर्त्यांसह डम्पिंगच्या ठिकाणावरून निघून गेल्यावर वातावरण काही प्रमाणात निवळले. 

शुक्रवारी पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी अंबरनाथच्या डम्पिंग ग्राउंड संदर्भात महत्त्वपूर्ण बैठक झूम मीटिंगच्या माध्यमातून घेतली. या बैठकीला अंबरनाथ आणि बदलापूरच्या आमदारांसह सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील पदाधिकारी देखील उपस्थित होते. न्यायालयाच्या समोरच डम्पिंग असल्याने न्यायालय सुरू होण्याआधी डम्पिंग ग्राउंड स्थलांतरित करणे गरजेचे आहे. त्यामुळे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी या बैठकीत तात्काळ पालिकेच्या आरक्षित डम्पिंग ग्राऊंडच्या जागेवरच कचरा टाकण्याचा आदेश दिले. या आदेशाची अंमलबजावणी करण्याच्या अनुषंगाने शनिवारी नव्या डम्पिंग ग्राऊंडच्या जागेची पाहणी करण्यासाठी आमदार डॉक्टर बालाजी किणीकर आणि मुख्याधिकारी प्रशांत रसाळ हे सर्व अधिकार यांच्या समवेत गेले. नेमका कचरा टाकावा कुठे, याबाबत चर्चा सुरू असतानाच शिवसेनेचे शहरप्रमुख अरविंद वाळेकर हे आपल्या कार्यकर्त्यांसह डम्पिंग ग्राऊंडच्या जागेवर पोहोचले. ते येताच काही काळासाठी वातावरण स्तब्ध झाले होते. एवढेच नव्हे तर, शहरप्रमुखांनी इतर उपस्थित अधिकारी आणि पदाधिकारी यांना सज्जड दम भरताच आमदार आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणाहून निघून जाण्यात धन्यता मानली. 

शिवसेना पक्षाचे आमदार असताना देखील आमदार आणि शहरप्रमुख यांनी एकत्रितपणे डंपिंग संदर्भात नियोजन करणे गरजेचे होते. मात्र एकमेकांना शह देण्याच्या संघर्षात डम्पिंगचा मूळ मुद्दा सोडून आमदारांना तिथून निघून जावे लागले. डम्पिंग ग्राउंडवर आमदार जागेची पाहणी करीत असताना शहरप्रमुख यांना विश्वासात घेतले नाही, याचा संताप व्यक्त करण्यासाठी वाळेकर डम्पिंग ग्राउंडवर आल्याची चर्चा शहरात रंगली आहे. शिवसेनेच्याच शहरप्रमुखांकडे पाठ फिरवून आमदारांनी डम्पिंग ग्राउंड वरून निघून जाण्याचा निर्णय घेतल्यावर आमदार आणि शहर प्रमुख यांच्या राजकीय नात्यांमध्ये प्रचंड दरी निर्माण झाल्याचे चित्र निर्माण झाले आहे.

Web Title: Shiv Sena MLAs left dumping site after shiv sena city president arrives

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.