"CM साहेब... विचार बदला, तेव्हाच देश बदलेल"; तीरथ सिंह रावतांच्या फाटलेल्या जीन्स विधानावरून हल्लाबोल
By ऑनलाइन लोकमत | Published: March 18, 2021 11:56 AM2021-03-18T11:56:53+5:302021-03-18T11:58:49+5:30
uttarakhand chief minister tirath singh rawat statement ripped jeans : एका कार्यक्रमामध्ये तीरथ सिंह रावत यांनी महिला वापरत असलेल्या जीन्सवर विधान केले असून यामुळे नवा वाद निर्माण झाला आहे.
नवी दिल्ली : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचारक राहिलेले भारतीय जनता पक्षाचे वरिष्ठ नेते तीरथ सिंह रावत (Tirath Singh Rawat) उत्तराखंडचे नवे मुख्यमंत्री आहेत. तीरथ सिंह रावत सध्या आपल्या एका विधानामुळे चर्चेत आले आहेत. एका कार्यक्रमामध्ये तीरथ सिंह रावत यांनी महिला वापरत असलेल्या जीन्सवर विधान केले असून यामुळे नवा वाद निर्माण झाला आहे. "आजकाल महिला फाटलेल्या जीन्स घालून फिरतात, हे सगळं बरोबर आहे का? हे कसले संस्कार आहेत," असे विधान तीरथ सिंह रावत यांनी केले आहे. यावरून विरोधी पक्षांनी निशाणा साधत तीरथ सिंह रावत यांनी महिलांची माफी मागावी, असे म्हटले आहे.
मुख्यमंत्री तीरथ सिंह रावत यांच्या विधानावर तृणमूल काँग्रेसच्या नेत्या आणि लोकसभेच्या खासदार महुआ मोइत्रा यांनी प्रतिक्रिया दिली आहे. महुआ मोइत्रा यांनी ट्विटरवरून तीरथ सिंह रावत यांच्यावर हल्लाबोल केला. "उत्तराखंडचे मुख्यमंत्री, एनजीओ चालवतात आणि तुमचे गुडघे फाडलेले दिसतात? मुख्यमंत्री साहेब, तुम्ही राज्य चालवता आणि तुमचे मन फाटलेले दिसते?", असे महुआ मोइत्रा यांनी ट्विट केले आहे.
Uttarakhand CM :
— Mahua Moitra (@MahuaMoitra) March 17, 2021
“Jabh nichey dekha toh gumboot the.. aur upar dekha toh .... NGO chalati ho aur ghutney phatey dikte hai?”
CM saab- jabh apko dekha toh upar neeche aagey peechey humein sirf besharm behuda aadmi dikhta hai
State chalatey ho aur dimaag phatey dikte hai?
दुसरीकडे, शिवसेना खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनीही तीरथ सिंग रावत यांच्या या विधानावर टिप्पणी केली आहे. प्रियांका चतुर्वेदी यांनी म्हटले आहे की, "देशातील संस्कृती आणि संस्कारावर त्या पुरुषांना फरक पडतो, जो महिलांना आणि त्यांच्या कपड्यांना जज करतात. विचार बदला मुख्यमंत्री रावतजी, तेव्हाच देश बदलेल."
Ripped Jeans aur Kitab.
— Priyanka Chaturvedi (@priyankac19) March 18, 2021
The country’s ‘sanskriti’ & ‘sanskaar’ are impacted by men who sit and judge women and their choices. Soch badlo Mukhyamantri Rawat ji, tabhi desh badlega. #RippedJeansTwitterpic.twitter.com/qYXcN88fY6
काय म्हणाले होते मुख्यमंत्री तीरथ सिंह रावत?
मिळालेल्या माहितीनुसार, बाल हक्क संरक्षण आयोगाच्या वतीने एका कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. याच दरम्यान बोलताना मुख्यमंत्री तीरथ सिंह रावत यांनी आजकाल महिला फाटलेल्या जीन्स घालून फिरतात, हे सगळं बरोबर आहे का? हे कसले संस्कार आहेत, असे विधान केले आहे. तसेच, मुलांवर होणाऱ्या संस्कारला आईवडील जबाबदार असतात असे देखील ते म्हणाले आहेत. तीरथ सिंह रावत यांनी त्यांचा प्रवासातील एक अनुभवही सांगितला. "एकदा मी विमानातून प्रवास करत होतो. त्यावेळी मी बघितलं की, एक महिला आपल्या दोन मुलांना घेऊन जवळच बसलेली होती. त्या महिलेने फाटलेली जीन्स घातलेली होती. मी त्या महिलेला विचारलं की कुठे जायचं? यावर ती महिला म्हणाली दिल्लीला."
"महिलेचा पती जेएनयूमध्ये प्राध्यापक आहे आणि ती महिला स्वयंसेवी संस्था चालवते. माझ्या मनात विचार आला, जी महिला एनजीओ चालवते आणि फाटलेली जीन्स घालून फिरते. अशी महिला समाजात कोणत्या संस्कृतीचा प्रसार करत असेल. जेव्हा आम्ही शाळेत होतो, तेव्हा असे नव्हते" असेही रावत यांनी म्हटले आहे. तसेच तरुणांमध्येही व्यसन वाढत चालले आहे. नशेबरोबरच आपल्याला सर्व विकृतींपासून मुलांना दूर ठेवून संस्कारी बनवावं लागेल. तसेच पाश्चिमात्य संस्कृतीच्या प्रभावापासून दूर राहावे लागेल, असे देखील रावत यांनी म्हटले आहे. काही दिवसांवपूर्वी रावत यांनी पंतप्रधान मोदींची तुलना ही प्रभू रामासोबत केली होती. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.