जुनी थडगी आम्ही उकरली तर...; संजय राऊत यांचा किरीट सोमय्यांना इशारा
By कुणाल गवाणकर | Published: November 14, 2020 10:47 AM2020-11-14T10:47:02+5:302020-11-14T10:52:20+5:30
मुख्यमंत्री ठाकरेंवर टीका करणाऱ्या सोमय्यांचा राऊत यांच्याकडून समाचार
मुंबई: गेल्या काही दिवसांपासून मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर घणाघाती हल्ले करणाऱ्या भाजप नेते किरीट सोमय्यांना शिवसेना खासदार संजय राऊत यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. किरीट सोमय्यांकडे त्यांचा पक्षही गांभीर्यानं पाहत नाही. आपल्या कृतींमुळे आपलाच पक्ष गाळात जातोय, याचं भान त्यांनी ठेवायला हवं. सोमय्यांनी उगाच खोटे आरोप करू नयेत, असं राऊत म्हणाले. त्यांनी दिवाळीनिमित्त पत्रकारांशी संवाद साधत राज्यातल्या जनतेला शभेच्छा दिल्या.
सोमय्या यांची ठाकरे सरकारविरुद्ध पुन्हा आरोपबाजी; उच्च न्यायालयकडे दाद मागणार
अन्वय नाईक आणि त्यांच्या कुटुंबानं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे, शिवसेना नेते रविंद्र वायकर यांच्या पत्नी मनिषा वायकर यांना जमीन विकल्याची कागदपत्रं सोमय्यांनी पत्रकार परिषदेत दाखवली. ठाकरे आणि वायकर कुटुंबं एकत्र का आली, त्यांचे भागिदारीत असे किती व्यवसाय आहेत, मुख्यमंत्री ठाकरे याची माहिती जनतेला देणार का, अशी प्रश्नांची सरबत्ती सोमय्यांनी पत्रकार परिषदांमधून केली. त्याला राऊत यांनी आज प्रत्युत्तर दिलं. आम्ही बोलावं असं कोणतंही महान काम सोमय्यांनी केलेलं नाही. जुनी थडगी आम्हालाही उकरता येतात. तशी ती उकरली गेली तर त्या थडग्यांमध्ये तुमचेच सांगाडे जास्त सापडतील, असा इशारा राऊत यांनी दिला.
'भाजपा नेत्याचं ट्विट, भाषा सांभाळून वापर परब, नाहीतर उलटे फटके पडतील'
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जनकल्याणाचं काम करत आहेत. गेल्या वर्षभरापासून राज्यावर संकटं येत आहेत. कोरोना, निसर्ग चक्रीवादळ, अवकाळी पाऊस, त्यामुळे आलेला पूर, शेतीचं झालेलं नुकसान अशी संकटांची मालिका सुरू आहे. त्याला मुख्यमंत्री धैर्यानं तोंड देत आहेत. पुढील ४ वर्षे ते राज्यातल्या विकासासाठी अविरत काम करतील, असं राऊत म्हणाले.
'किरीट सोमय्यांच्या डोक्यावर परिणाम, ठाण्यात दाखवून शॉक दिला पाहिजे'
महाविकास आघाडी सरकार आपोआप पडेल, अशी विधानं करणाऱ्या विरोधकांचा राऊत यांनी समाचार घेतला. 'ऑपरेशन लोटसची चर्चा वर्षभर ऐकली. सरकार पाडण्यासाठी अघोरी प्रयत्न झाले. मात्र सरकारला काहीही झालं नाही. त्यामुळे आता विरोधकांनी ऑपरेशनची भाषा करू नये. गेल्या वर्षभरात अनेकदा ऑपरेशनचे प्रयत्न करूनही सरकारला साधं खरचटलंसुद्धा नाही. त्यामुळे विरोधकांनी विधायकं कामांकडे लक्ष द्यावं,' असा सल्ला राऊत यांनी दिला.