"मुख्यमंत्र्यांच्या घरी बसण्यावर आक्षेप असेल, तर मोदींनाही बाहेर पडायला, देश फिरायला सांगा"
By ऑनलाइन लोकमत | Published: September 3, 2020 01:16 PM2020-09-03T13:16:23+5:302020-09-03T13:23:03+5:30
उद्धव ठाकरेंवर घरात बसणारे मुख्यमंत्री अशी टीका करणाऱ्या विरोधकांना शिवसेनेकडून प्रत्युत्तर
मुंबई: सर्वाधिक काळ घरात बसणारे मुख्यमंत्री अशा शब्दांत विरोधकांनी उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल केला आहे. या टीकेला शिवसेना खासदार संजय राऊत यांनी उत्तर दिलं आहे. सध्याच्या घडीला मुख्यमंत्री आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कामाची पद्धत सारखीच आहे. कोरोना काळातील प्रोटोकॉल पाळून दोन्ही नेते काम करत आहेत. मुख्यमंत्र्यांच्या कार्यपद्धतीवर आक्षेप असल्यास राज्यातल्या विरोधकांनी मोदींनाही देश पालथा घालून परिस्थितीचा आढावा घेण्यास सांगावं, अशा शब्दांत राऊत यांनी भाजपवर जोरदार पलटवार केला आहे.
"सर्वाधिक काळ घरात राहणारे राज्याच्या इतिहासातील उद्धव ठाकरे पहिलेच मुख्यमंत्री"
पंतप्रधान मोदी यांच्याप्रमाणेच देशातील सगळेच मुख्यमंत्री घरातूनच काम करत आहेत. कारण परिस्थितीच तशी आहे. मुख्यमंत्री बाहेर पडल्यावर त्यांच्याबरोबर अधिकारी बाहेर पडतात. लोकांची गर्दी होते आणि सध्याच्या परिस्थिती गर्दी होणं संकटाला आमंत्रण देण्यासारखं असल्याचं राऊत म्हणाले. मंत्रिमंडळ राज्यात फिरतं आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस राज्यभर फिरत आहेत. त्यांच्या सूचनांचा आम्ही नक्कीच विचार करू. प्रवासात वेळ घालवण्यापेक्षा त्याच वेळात घरात बसून अनेक जिल्ह्यांचा आढावा व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे घेणं शक्य आहे. यालाच डिजिटल इंडिया म्हणतात, अशा शब्दांत राऊत यांनी मुख्यमंत्र्यांच्या 'वर्क फ्रॉम होम'चं समर्थन केलं.
"सरकारने मंदिरं सगळ्यात शेवटी उघडून उगाच नको ते पुरोगामीत्व दाखवू नये"
मुख्यमंत्री 15 तास काम करतात, काँग्रेसच्या मंत्र्याकडून उद्धव ठाकरेंची पाठराखण
मंदिरं उघडण्याची मागणी करणाऱ्या विरोधकांनादेखील राऊत यांनी प्रत्युत्तर दिलं. राज्यातील मंदिरं खुली व्हावीत, ही आमचीदेखील इच्छा आहे. लोकशाहीचे घटक म्हणून विरोधकांना सरकारकडे मागण्या करण्याचा पूर्ण अधिकार आहे. मात्र परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये यासाठी राज्यातलं सरकार काळजी घेतं आहे. त्यामुळे विरोधकांनी संयम सोडून टोकाची भूमिका घेऊ नये. आपल्याला कोरोना संकटाचा सामना करायचा आहे. आम्ही केंद्र सरकारप्रमाणे कोरोनाला ऍक्ट ऑफ गॉड मानत नाही, असा टोला त्यांनी लगावला.
राज्यात बदल्यांचा धंदा सुरू झालाय, फडणवीसांचा ठाकरे सरकारवर हल्लाबोल
ठाकरे सरकारला बदल्या करण्यात जास्त रस असल्याची टीका करणाऱ्या विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनादेखील राऊत यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं. 'सरकार बदलल्यावर बदल्या करू नयेत, असं घटनेत लिहिलं आहे का? फडणवीस सरकारनं बदल्या केल्या नव्हत्या का? केंद्रातून मनमोहन सिंग यांचं सरकार गेल्यावर मोदी पंतप्रधान झाले. त्यांनी बदल्या केल्या नाहीत का?', अशी प्रश्नांची सरबत्तीच त्यांनी केली. बदल्या करण्याचा अधिकार राज्य सरकारला असून त्या राज्याच्या हिताच्या आहेत, असंदेखील ते म्हणाले.