आम्ही भाजपपासून राजकीयदृष्ट्या वेगळे झालो आहोत, पण...; संजय राऊतांचं महत्त्वपूर्ण विधान

By ऑनलाइन लोकमत | Published: August 27, 2021 11:06 AM2021-08-27T11:06:02+5:302021-08-27T11:08:52+5:30

भाजपमधले बाटगे वातावरण बिघडवताहेत; संजय राऊतांचं नारायण राणे, प्रसाद लाड यांच्यावर शरसंधान

shiv sena mp sanjay raut slams bjp leader narayan rane | आम्ही भाजपपासून राजकीयदृष्ट्या वेगळे झालो आहोत, पण...; संजय राऊतांचं महत्त्वपूर्ण विधान

आम्ही भाजपपासून राजकीयदृष्ट्या वेगळे झालो आहोत, पण...; संजय राऊतांचं महत्त्वपूर्ण विधान

googlenewsNext

मुंबई: इतर पक्षांमधून भारतीय जनता पक्षात आलेल्या बाटग्यांना इतिहासाचे धडे द्यायला हवेत. भाजपनं त्यांना वेळीच आवरण्याची गरज असल्याचं विधान शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केलं. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या कानशिलात लगावण्याची, शिवसेना भवन फोडण्याची भाषा भाजपचे मूळ नेते कधीही करणार नाहीत. पण भाजपमध्ये इतर पक्षांमधून दाखल झालेले बाटगे ती भाषा वापरत आहेत. गटर पॉलिटिक्स असो वा लेटर पॉलिटिक्स, तुम्ही शिवसेनेचा मुकाबला करू शकत नाही ही गोष्ट लक्षात ठेवा, असा इशारा राऊत यांनी दिला.

भाजपमध्ये आलेल्या बाटग्यांना इतिहास शिकवण्याची गरज असल्याचं म्हणत राऊतांनी नारायण राणे, प्रसाद लाड यांना टोला लगावला. शिवसेना आणि भाजप राजकीयदृष्ट्या वेगळे झाले आहेत. मात्र दोन्ही पक्षांमधला हिंदुत्वाचा धागा कायम आहे. मात्र भाजपमधले बाटगे वातावरण खराब करण्याचं काम करत आहेत. त्यांच्याकडून बेताल वक्तव्यं सुरू आहेत. अशी विधानं देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील, सुधीर मुनगंटीवार, आशिष शेलार यांच्यासारखी भाजपची जुनीजाणती मंडळी कधीही करणार नाहीत, अशा शब्दांत राऊतांनी भाजपच्या मोजक्या नेत्यांचा समाचार घेतला.

बांगलादेशी घुसखोर भारतात घुसखोरी करून हैदोस घालतात. तशीच घुसखोरी भाजपमध्ये झाली आहे. त्यामुळे पक्षाचं शुद्धीकरण करण्याची गरज आहे. आडवाणी आणि वाजपेयींचे बाळासाहेब ठाकरेंशी कसे संबंध होते. बाळासाहेबांचे नरेंद्र मोदींशी कसे संबंध होते, ते मी जवळून पाहिलं आहे. मात्र भाजपमधले बाटगे वातावरण बिघडवत आहेत. नारायण राणे टीका करू शकतात. टोकदार टीका करू शकतात. आम्ही ती सहन करू. पण सध्या ते काही करत आहेत, त्याला टीका म्हणत नाहीत. ते केवळ वैयक्तिक शत्रुत्व जपत आहेत, अशा शब्दांत राऊतांनी हल्लाबोल केला.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सर्व नव्या मंत्र्यांना जनआशीर्वाद यात्रा काढायला सांगितली. देशातल्या सर्वच राज्यांत जनआशीर्वाद यात्रा निघाल्या. पण कोकणात जे झालं, तशी परिस्थिती कुठेही उद्भवली नाही. ती परिस्थिती का निर्माण झाली हा सवाल भाजप नेत्यांनी स्वत:ला विचारावा. मोदींनी राणेंना चिखलफेक करायला पाठवलेलं नाही. जर कोणी कमरेखाली टीका करत असेल, तर कमरेखाली तुम्हीदेखील आहात ही गोष्ट त्यांनी लक्षात ठेवावी, असा सूचक इशारा राऊत यांनी दिला.

Web Title: shiv sena mp sanjay raut slams bjp leader narayan rane

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.