...तर आजचा भाजप दिसला नसता; 'आंदोलनजीवी'वरून शिवसेनेचा पंतप्रधान मोदींवर बाण

By ऑनलाइन लोकमत | Published: February 14, 2021 08:03 AM2021-02-14T08:03:43+5:302021-02-14T08:07:21+5:30

Sanjay Raut Slams PM Modi: आणीबाणीपासून अयोध्या आंदोलनापर्यंत. महागाईपासून कश्मीरातील 370 कलम हटविण्यापर्यंत भाजपने सतत आंदोलनेच केली. रामाचे आंदोलन झाले नसते तर आजचा भाजप दिसला नसता, अशा रोखठोक शब्दांत राऊत यांनी मोदींना लक्ष्य केलं आहे.

Shiv Sena MP Sanjay Raut slams PM Narendra Modi over Andolanjeevi remark on farmers protest | ...तर आजचा भाजप दिसला नसता; 'आंदोलनजीवी'वरून शिवसेनेचा पंतप्रधान मोदींवर बाण

...तर आजचा भाजप दिसला नसता; 'आंदोलनजीवी'वरून शिवसेनेचा पंतप्रधान मोदींवर बाण

Next

मुंबई: गेल्या अडीच महिन्यांपासून दिल्लीच्या सीमेवर कृषी कायद्यांविरोधात आंदोलन (Farmers Protest against Farm Laws) करणाऱ्या शेतकऱ्यांसंदर्भात भाष्य करताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (PM Narendra Modi) 'आंदोलनजीवी' शब्दाचा वापर केला. यावरून मोदींवर जोरदार टीका केली. यानंतर आता शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी मोदींना भारतीय जनता पक्षानं केलेल्या विविध आंदोलनांची आठवण करून दिली आहे. आपला देश आंदोलनातूनच स्वतंत्र झाला, याचंही स्मरण राऊत यांनी मोदींना करून दिलं आहे. (Shiv Sena slams PM Narendra Modi over Andolanjeevi remark)

पंतप्रधान मोदी यांनी देशातील आंदोलनाची चेष्टा केली आहे. आणीबाणीपासून अयोध्या आंदोलनापर्यंत. महागाईपासून कश्मीरातील 370 कलम हटविण्यापर्यंत भाजपने सतत आंदोलनेच केली. रामाचे आंदोलन झाले नसते तर आजचा भाजप दिसला नसता, अशा रोखठोक शब्दांत राऊत यांनी मोदींना लक्ष्य केलं आहे. ज्या लोकशाहीतले रस्ते सुनसान असतात त्या देशाची संसद मृतप्राय होते, असे एक विधान राम मनोहर लोहिया यांनी केल्याचे आठवते. आज लोहियांचे बोल खरे होताना दिसत आहेत. संसद दिवसेंदिवस मृतप्राय होत आहे. कारण रस्ते सुनसान व्हावेत असे फर्मान पंतप्रधान मोदी यांनी काढले आहे, अशी टीका राऊत यांनी केली आहे.

देशातील आंदोलने थांबवा. आंदोलने म्हणजे परकीय शक्तीचा कट. काही लोक फक्त आंदोलनांवरच जगत आहेत. 'आंदोलनजीवी' असा उल्लेख करून पंतप्रधानांनी रस्त्यावर उतरणाऱया कार्यकर्त्यांची थट्टा केली आहे. ही थट्टा फक्त गाझीपूरला तीन महिन्यांपासून कृषी कायद्यांच्या विरोधात आंदोलन करणाऱया शेतकऱयांची नाही, तर देशाचे स्वातंत्र्य आणि लोकशाहीचे मूल्य राखण्यासाठी दीडशे वर्षांपासून आंदोलन करणाऱया प्रत्येकाची थट्टा आहे, अशा शब्दांत राऊत यांनी मोदींवर निशाणा साधला आहे.

गोध्राकांड काय होतं?; राऊतांचा मोदी-शहांना सवाल
पंतप्रधान मोदी व गृहमंत्री शहा हे आज 'आंदोलना'ची खिल्ली उडवत आहेत; पण साबरमती एक्प्रेस जाळल्यावर जे भयंकर गोध्राकांड झाले, त्यातूनच मोदी हे हिंदू समाजाचे नवे मसिहा बनले. मोदी यांच्या दृष्टीने गोध्राकांड हे उत्स्फूर्त आंदोलनच होते. हे आंदोलन 'परजीवी' आहे असे तेव्हाचे पंतप्रधान वाजपेयी यांनी म्हटलेले नाही. त्याच 'गोध्राकांड' आंदोलनाने मोदी व शहा यांना दिल्लीच्या तख्तापर्यंत पोहोचविले. त्या मानाने दिल्लीच्या सीमेवरील शेतकऱयांचे आंदोलन शांत आणि सौम्य आहे. शिस्त पाळून आहे. हे आंदोलन 'कॉर्पोरेट व्यवस्था' आणि भांडवलदारांच्या विरोधात असल्यामुळे शेतकरी बदनाम केला जात आहे. ज्यांना आज शेतकऱ्यांचे आंदोलन नको आहे त्यांनी स्वातंत्र्यलढ्याचा इतिहास तपासायला हवा, असं राऊत यांनी म्हटलं आहे.

नुसते पुतळे उभारून काय होणार?
देशाच्या स्वातंत्र्य आंदोलनात शेतकरी मोठय़ा प्रमाणावर उतरला होता. गुजरातमध्ये वल्लभभाई पटेल यांचा जगातील सर्वात उंच पुतळा उभा केला आहे. ब्रिटिशांच्या विरोधात साराबंदी, बार्डोली सत्याग्रह शेतकऱयांनी केला व त्याचे नेतृत्व वल्लभभाई पटेलांनी केले. पटेलांचे फक्त पुतळे निर्माण करून काय होणार?, असा सवाल राऊत यांनी विचारला आहे.

सावरकरांना आंदोलनजीवी म्हणू नका
वीर सावरकर यांचे स्वातंत्र्याचे आंदोलन सशस्त्र होते व त्याबद्दल त्यांना इंग्रज सरकारने 50 वर्षांच्या काळय़ा पाण्याची शिक्षा ठोठावली. अंदमानातून सुटल्यावर सावरकरांनी अस्पृश्यता निर्मूलन, भाषाशुद्धीसारखी आंदोलने केली. वीर सावरकरांना भारतरत्न करण्यात आले नाही. निदान सावरकर परजीवी किंवा आंदोलनजीवी होते असे म्हणू नका. आंदोलन म्हणजे लोकशाहीतील सूर्यकिरणे आहेत. देश त्यामुळे जिवंत राहतो. भारतीय जनता पक्षाने आतापर्यंत जी आंदोलने केली त्यांना काय म्हणावे?, असा प्रश्न राऊत यांनी उपस्थित केला आहे.

भाजपच्या आंदोलनांचं काय?
भारतीय जनता पक्षाची सर्व आंदोलने झाली. ती मग फक्त राजकीय हितासाठी व सत्ताप्राप्तीसाठीच झाली असे म्हणावे लागेल. कश्मीरातून 370 कलम हटवणे हे भाजपच्या जीवनातले सगळय़ात मोठे आंदोलन होते. श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी त्यासाठी आंदोलन केले व बलिदानही दिले. मुखर्जी यांचे बलिदानही आता 'आंदोलनजीवी' ठरवले गेले. क्रांतिकारक सत्तेवर येताच सगळ्यात आधी क्रांतीच्या पिलांचा बळी घेतो. आपल्या देशात हेच सुरू आहे काय?, असाही सवाल राऊत यांनी विचारला आहे.
 

 

Web Title: Shiv Sena MP Sanjay Raut slams PM Narendra Modi over Andolanjeevi remark on farmers protest

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.