नारायण राणेंना कावीळ झालीय, पनवती म्हणून भाजपनं त्यांना अडगळीत टाकलंय: विनायक राऊत
By ऑनलाइन लोकमत | Published: May 26, 2021 04:39 PM2021-05-26T16:39:29+5:302021-05-26T16:43:47+5:30
तौत्के चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कोकण दौऱ्यावर सडकून टीका करणारे भाजपचे खासदार नारायण राणे यांच्यावर शिवसेनेचे रत्नागिरी-सिंधुदुर्गचे खासदार विनायक राऊत यांनी जोरदार पलटवार केला आहे.
तौत्के चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कोकण दौऱ्यावर सडकून टीका करणारे भाजपचे खासदार नारायण राणे यांच्यावर शिवसेनेचे रत्नागिरी-सिंधुदुर्गचे खासदार विनायक राऊत यांनी जोरदार पलटवार केला आहे. नारायण राणे पनवती आहेत. म्हणूनच भाजपने त्यांना अडगळीत टाकलं आहे, असा खोचक टोला विनायक राऊत यांनी नारायण राणे यांना हाणला आहे.
...तर मी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना नारळाचं पाणी दिलं असतं; नारायण राणे यांचा मिश्किल टोला
नारायण राणे यांनी पत्रकार परिषद घेऊन उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली होती. त्यानंतर खासदार विनायक राऊत यांनीही प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. "भाजपनं पनवती म्हणून राणेंना अडगळीत टाकलेलं आहे. त्यांना कावीळ झालेली आहे. ते अजून कोकणातही गेलेले नाहीत. भ्रष्टाचाराचा महामेरू म्हणून राणेंचा उल्लेख होतो. त्यांच्या रुग्णालयातच RT-PCR चाचणीसाठी जादा पैसे घेतले जातायत. भूखंड हडप करणारा म्हणजे नारायण राणे", अशी टीका राऊत यांनी केली आहे.
'मातोश्री'त शांती यज्ञ घालण्याचा सल्ला नारायण राणे यांनी उद्धव ठाकरे यांना दिला होता. त्यावरही विनायक राऊत यांनी निशाणा साधला. "राणेंनी इतरांना सल्ला देऊ नये. आधी स्वत:च्या घरात शांती घालावी. वर्षा व मातोश्री ही दैवतांची घरे आहेत. त्यावर बोलणं त्यांना शोभत नाही", असं विनायक राऊत म्हणाले.
राणेंच्या भ्रष्टाचाराची पोलखोल करणार
नारायण राणे यांनी कोकणात केलेल्या भ्रष्टाचाराची पोलखोल करणार असल्याचा इशारा देखील विनायक राऊत यांनी यावेळी दिला आहे. सिंधुदुर्ग भवन कसं बनलं, कोकणवासीयांना फसवून भूखंड कसा लाटला हे आम्ही लोकांना सांगणार आहोत, असं विनायक राऊत म्हणाले.