रायगडमध्ये शिवसेना-राष्ट्रवादीत चुरस

By ऑनलाइन लोकमत | Published: March 10, 2019 11:16 PM2019-03-10T23:16:51+5:302019-03-10T23:17:48+5:30

दोनही पक्षात मोर्चेबांधणीला सुरुवात; पक्षांतर्गत गटबाजी डोकेदुखी ठरण्याची शक्यता

Shiv Sena-NCP fight in Raigad | रायगडमध्ये शिवसेना-राष्ट्रवादीत चुरस

रायगडमध्ये शिवसेना-राष्ट्रवादीत चुरस

googlenewsNext

- आविष्कार देसाई 

अलिबाग : देशातील २९ राज्यांमध्ये लोकसभेसाठी सात टप्प्यांमध्ये मतदान होणार असून, महाराष्ट्रात चार टप्प्यांमध्ये निवडणुका जाहीर झाल्या आहेत. निवडणुकांची तारीख जाहीर होताच राजकीय पक्षांची मोर्चेबांधणी सुरू केली आहे.

रायगड लोकसभा मतदारसंघामध्ये शिवसेनेचे केंद्रीय अवजड उद्योगमंत्री खासदार अनंत गीते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस सुनील तटकरे असे दोन तुल्यबळ उमेदवार रिंगणात आहेत. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत तटकरे यांचा निसटता पराभव झाला होता. शेकापने स्वतंत्र उभ्या केलेल्या उमेदवारामुळे गीतेंना लोकसभेची वाट सोपी झाली होती; परंतु शेकापचा लालबावटा आता तटकरेंच्या बाजूने उभा राहिल्याने गीतेंसमोर आव्हान उभे राहिल्याचे चित्र आहे. भाजपाला सत्तेवरून खाली खेचण्यासाठी काँग्रेसने भाजपाविरोधी गटाची महाआघाडीची मोट बांधली आहे.

सुनील तटकरे व अनंत गीते यांची उमेदवारी निश्चित असली तरी दोघांनाही अंतर्गत गटबाजीचे अडथळे पार करावे लागणार नाही. पुर्वीचा कुलाबा आणि २००९ नंतरच्या रायगड मतदार संघावर कोणत्याही पक्षाला दीर्घकाळ वर्चस्व गाजवता आलेला नाही. हा मतदार संघ कधीही लाटेवर स्वार झालेला नाही.

मतदार संघातील राजकीय पार्श्वभूमी
रायगड लोकसभा मतदार संघामध्ये जातीच्या समीकरणाचा विचार केल्यास मराठा, कुणबी, आगरी, कोळी, माळी, दलित, मुस्लीम या समाज घटकांचा प्रामुख्याने प्रभाव आहे.
रायगड मतदार संघातून शिवसेनेचे अनंत गीते निवडून गेले असले, तरी या मतदार संघामध्ये शेतकरी कामगार पक्ष (शेकाप) आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्र आल्याने त्यांचा चांगलाच दबदबा निर्माण झाला आहे. जिल्ह्यातील पनवेल महानगरपालिकेवर भाजपाचे कमळ फुलले आहे, तर रोहे, खोपोली आणि श्रीवर्धन या तीन नगरपालिकांवर राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता आहे. कर्जत, मुरुड, माथेरान आणि उरण या चार नगरपालिकांवर शिवसेनेचा भगवा तर पेण आणि महाड नगरपालिकांवर काँग्रेसचे वर्चस्व आहे.
अलिबाग या एकमेव नगरपालिकेमध्ये शेकापची एकहाती सत्ता आहे. अलिबाग, पेण या दोन विधानसभा मतदार संघांमध्ये शेकापचे दोन आमदार आहेत. कर्जत, रोहे विधानसभा मतदार संघात राष्ट्रवादीचे दोन आमदार आहेत. पनवेलमध्ये भाजपा, महाड काँग्रेस आणि उरणमध्ये शिवसेनेचा आमदार निवडून गेलेला आहे.
जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील स्वराज्य संस्थांमध्ये शेकाप, राष्ट्रवादी काँग्रेस आणि त्या खालोखाल शिवसेनेची पकड आहे. ५९ सदस्य संख्या असणाऱ्या जिल्हा परिषदेवर शेकापचे २३ सदस्य निवडून गेले आहेत, तर शिवसेनेचे १८ राष्ट्रवादीचे १२, काँग्रेस आणि भाजपाचे प्रत्येकी तीन सदस्य आहेत. रायगड जिल्हा परिषदेवर शेकाप आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या आघाडीची सत्ता आहे. रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेवर निर्विवादपणे शेकापचाच लाल बावटा फडकत आहे.

शिवसेना- अनंत गीते
बलस्थाने व कमकुवत स्थाने

गीते हे केंद्रामध्ये अवजड उद्योगमंत्री म्हणून काम पाहत आहेत. त्यामुळे त्यांना मतदार संघासाठी फारसा वेळा देता आलेली नाही. रस्ता, सरकारी इमारत यांच्या भूमिपूजन, बैठका आणि उद्घाटनासाठी त्यांनी हजेरी लावली आहे. त्यांच्याकडे कार्यकर्त्यांचे जाळे असले, तरी गीते हे मतदार संघात येतात. तेव्हाच त्यांच्या कार्यकर्त्यांचे दर्शन होते. स्वच्छ चारित्र्याचा मंत्री अशी गीते यांची ख्याती आहे. त्याच्यावर अद्याप भ्रष्टाचार अथवा घोटाळ्याचे आरोप झालेले नाहीत आणि हीच त्यांची जमेची बाजू आहे, असे म्हणावे लागेल. त्यांच्याकडे ना कोणत्या कंपन्या आहेत ना शिक्षण संस्था. लोकसेवक म्हणूनच काम करत असल्याचे त्यांच्या कृतीतून ते नेहमी दाखवत असतात.

राष्ट्रवादी काँग्रेस- सुनील तटकरे
बलस्थाने व कमकुवत स्थाने

सुनील तटकरे हे राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस आहेत. रायगड जिल्हा परिषदेवर शेकापसोबत ते सत्तेवर असल्याने त्यांचे लक्ष जिल्ह्यावर आहे. विकासकामे, भूमिपूजन बैठका अशा निमित्ताने ते जिल्ह्यात असतात. त्यांचे रायगड जिल्ह्यातील रोहे तालुक्यात घर असल्याने कार्यकर्ते पदाधिकारी यांना ते सहज भेटतात. त्यांच्याकडे कार्यकर्त्यांचे जाळे विखुरलेले आहे. बहुजन वर्ग त्यांच्या पाठीशी आहे. त्याचप्रमाणे मुस्लीम, दलित अशी व्होट बँकही ते सांभाळून आहेत. शेकापचे सरचिटणीस जयंत पाटील यांनी राष्ट्रवादीसोबत युती केली आहे. त्यामुळे गेल्या निवडणुकीत विरोधात असणारे शेकाप तटकरेंसोबत असल्याने कार्यकर्त्यांचा विश्वास दुणावल्याचे चित्र आहे.

पक्षनिहाय संभाव्य उमेदवार
२००९- लोकसभा निकाल
शिवसेनेचे गीते यांना तब्बल १,४६,५२१ मताधिक्क्य मिळाले होते.
अनंत गीते- ४,१३, ५४६ (मिळालेली मते)
बॅ.ए.आर. अंतुले (काँग्रेस) २,६७,०२५ (मिळालेली मते)

२०१४- लोकसभा निकाल
शिवसेनेचे गीते यांना फक्त २,११० अधिक मते मिळाली होती. २००९ सालच्या तुलनेत गीते यांचे मताधिक्य २०,३६८ ने घटल्याचे दिसते.
अनंत गीते- ३,९६,१७८ (मिळालेली मते)
सुनील तटकरे (राष्ट्रवादी काँग्रेस)- ३,९४,०६८ (मिळालेली मते)

रायगडमधील पक्षांतर्गत समीकरणे
रायगड लोकसभा मतदार संघातून शिवसेनेचे विद्यमान खासदार केंद्रीय मंत्री अनंत गीते यांनाच पुन्हा उमेदवारी मिळाली आहे. हा मतदारसंघ पूर्वी काँग्रेसच्या ताब्यात होता. याच मतदारसंघातून महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री बॅ. ए. आर. अंतुले लोकसभेवर निवडून गेले होते. पुढे जागावाटपामध्ये हा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला आला होता.
गीतेंना टक्कर देणारा नेता कोण असेल तर ते राष्ट्रवादी काँग्रेसचे सुनील तटकरेच असू शकतात, अशी खात्री त्यांच्या समर्थकांची आहे. तटकरे यांना पक्षामध्ये तसे कोणीच स्पर्धक नाहीत. त्यामुळे त्यांच्याच उमेदवारीवर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. आता शेकाप आणि राष्ट्रवादी काँग्रेसची युती झाल्याने गीते यांची डोकेदुखी वाढणार आहे.
गेल्या निवडणुकीत शेकापचे सरचिटणीस आमदार जयंत पाटील यांनीच सुनील तटकरे यांच्याविरोधात दंड थोपटले होते. तटकरे यांच्या जलसंपदा विभागातील भ्रष्टाचार तसेच कोट्यवधी रुपयांच्या बेहिशेबी कंपन्यांचाच भंडाफोड शेकापचे जयंत पाटील यांनी केला होता. तटकरेंच्या विरोधात त्यांनी श्वेतपत्रिकाही काढली होती. त्या कार्यक्रमाला त्यांनी थेट दिल्लीचे विद्यमान मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, अंजनी दमानिया अशा दिग्गजांची मांदियाळी उतरवली होती. त्याचप्रमाणे शेकापने राष्ट्रवादी काँग्रेसचे रमेश कदम यांना शेकापकडून उमेदवारी देऊन सुनील तटकरे यांची चांगलीच कोंडी केली होती.
भाजपाकडून रायगडमध्ये लोकसभा निवडणूक लढण्याची शक्यता सध्या तरी दिसून येत नाही, कारण रायगड लोकसभा मतदार संघामध्ये भाजपा फारच कमकुवत स्थितीत आहे, त्याचप्रमाणे त्यांच्याकडे लोकसभेसाठी सर्वसमावेशक असा चेहराही नाही. मनसे, बसपा, आप, भारिप आणि एमआयएम यांचा येथे प्रभाव नाही.

मतदारसंघातील प्रमुख मुद्दे
रायगड जिल्ह्यामध्ये विकासाच्या नावावर शेतकऱ्यांच्या जमिनी घेतल्या जात आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने समृद्धी महामार्ग, दिल्ली-मुंबई इंडस्ट्रीयल कॉरिडोरसाठी लागणाºया हजारो हेक्टर जमिनींच्या संपादनाचा प्रश्न आहे.
प्रकल्पासाठी जमीन संपादनाला स्थानिकांचा प्रखर विरोध आहे. प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न, जिल्ह्यात रोजगाराच्या अपुºया संधी, अस्तित्वात असणाºया उद्योगांमध्ये स्थानिकांचे प्रमाण अत्यंत नगण्य असेच आहे.
अलिबागला दाखवलेले रेल्वेचे स्वप्न हे स्वप्नच राहिले आहे. नव्याने रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यात कंपन्या स्थापन करण्यात येणार असल्याची गीतेंची घोषणा केवळ घोषणाच राहिली आहे.
पाण्याच्या समस्येमुळे तर नागरिक कमालीचे हैराण आहेत. शेतकरी, कष्टकरी, कामगार यांचे प्रश्नही आ वासून उभे आहेत.
रायगडला लाभलेल्या सागरी सुरक्षेबाबतचा प्रश्नही गंभीर आहे. कंपन्यांकडून केले जाणारे प्रदूषणही भयंकर आहे.

Web Title: Shiv Sena-NCP fight in Raigad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.