प्रताप सरनाईकांच्या ‘लेटरबॉम्ब’वर शिवसेना-राष्ट्रवादीची पहिली प्रतिक्रिया; संजय राऊत, जयंत पाटील म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Published: June 20, 2021 04:26 PM2021-06-20T16:26:14+5:302021-06-20T16:28:42+5:30

Pratap Sarnaik Letter to CM Uddhav Thackeray: आमदारांना नाहक त्रास दिला जात आहे. विनाकारण त्रास कोण देतंय? का देतंय? याचा अभ्यास करणं गरजेचे आहे असं सांगत राऊत यांनी यावर भाष्य करणं टाळलं आहे.

Shiv Sena-NCP first reaction to Pratap Saranaik 'letter to CM, Sanjay Raut, Jayant Patil said | प्रताप सरनाईकांच्या ‘लेटरबॉम्ब’वर शिवसेना-राष्ट्रवादीची पहिली प्रतिक्रिया; संजय राऊत, जयंत पाटील म्हणाले...

प्रताप सरनाईकांच्या ‘लेटरबॉम्ब’वर शिवसेना-राष्ट्रवादीची पहिली प्रतिक्रिया; संजय राऊत, जयंत पाटील म्हणाले...

googlenewsNext
ठळक मुद्देप्रताप सरनाईक यांच्या पत्रामुळे शिवसेना-राष्ट्रवादीत वितुष्ट येईल असं वाटत नाहीएका आमदारानं मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलं त्यावर काय बोलणार? - राऊतप्रताप सरनाईक शिवसेनेचे आमदार आहेत. त्यांनी त्यांच्या पक्षप्रमुखांना पत्र लिहिलं आहे. आता उद्धव ठाकरेंनी विचार करावा - भाजपा

मुंबई – शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी लिहिलेल्या पत्रामुळे राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे. तुटण्याआधीच जुळवून घेतलेले बरे असं म्हणत सरनाईक यांनी भाजपासोबत युती करा अशी मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून केली आहे. इतकचं नाही तर मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात प्रताप सरनाईक यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीवर गंभीर आरोप लावले आहेत. त्यामुळे सरनाईकांच्या पत्रावर शिवसेना काय भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागलं होतं.

परंतु शिवसेना खासदार संजय राऊत यांनी या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे. राऊत म्हणाले की, प्रताप सरनाईक यांनी पत्रात नाहक त्रास थांबेल असं सांगितल्याने हा गंभीर आरोप असून त्याचा सर्वांनी अभ्यास करावा. एका आमदारानं मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलं त्यावर काय बोलणार? हे पत्र खरं असल्यास त्यात एक मुद्दा असा आहे की आमदारांना नाहक त्रास दिला जात आहे. विनाकारण त्रास कोण देतंय? का देतंय? याचा अभ्यास करणं गरजेचे आहे असं सांगत राऊत यांनी यावर भाष्य करणं टाळलं आहे.

प्रताप सरनाईक यांचे आरोप राष्ट्रवादीनं फेटाळले

अलीकडच्या काळात शिवसेनेतून काँग्रेस आणि राष्ट्रवादीत कुणी गेलंय असं झालं नाही. प्रताप सरनाईक यांच्या पत्रामुळे शिवसेना-राष्ट्रवादीत वितुष्ट येईल असं वाटत नाही. ज्यांनी पत्र लिहिलंय त्यांच्या मतदारसंघात कोणी पक्षात प्रवेश केलाय का हे पाहावं लागेल असं सांगत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांचे आरोप फेटाळून लावलेत.

प्रताप सरनाईकांच्या पत्रात काय?

शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी भाजपसोबत जुळवून घेण्याचा आग्रह मुख्यमंत्र्यांकडे धरला आहे. 'पुढील वर्षी मुंबई, ठाणे आणि अन्य महापालिकांच्या निवडणुका आहेत. आतापर्यंत राज्यात आपली युती तुटली असली तरी युतीच्या नेत्यांचे वैयक्तिक संबंध, जिव्हाळा अनेक नेत्यांमध्ये तसाच आहे. ते अजून तुटण्याआधी परत जुळवून घेतल्यास बरं होईल,' असं सरनाईक यांनी पत्रात नमूद केलं आहे.

सरनाईक यांनी त्यांच्या पत्रात महाविकास आघाडी सरकारमधील काही मंत्र्यांवर गंभीर आरोपदेखील केले आहेत. 'तुम्ही मुख्यमंत्रीपदाला प्रामाणिकपणे न्याय देत असताना दुसरीकडे काँग्रेस, राष्ट्रवादीमुळे शिवसेनेचा मुख्यमंत्री झाला, असं काँग्रेस, राष्ट्रवादीच्या लोकांना वाटतं. त्यात काँग्रेस पक्ष एकला चलो रेची भूमिका घेत आहे. तर राष्ट्रवादी दुसऱ्या पक्षाचे नेते-कार्यकर्ते फोडण्यापेक्षा शिवसेनेचे नेते-कार्यकर्ते फोडत असल्याचं चित्र दिसत आहे. महाविकास आघाडीतील काही मंत्री आणि काही सनदी अधिकारी केंद्रीय तपास यंत्रणेचा ससेमिरा पाठीमागे लागू नये म्हणून केंद्रातील पक्षासह आपल्या नकळत छुपी हातमिळवणी करत आहेत,' असा खळबळजनक दावा त्यांनी पत्रात केला आहे.

उद्धव ठाकरेंनी विचार करावा – भाजपा

अल्पसंख्याकांचं लांगुलचालन मी करणार नाही, हीच बाळासाहेबांची भूमिका होती. या भूमिकेसाठी त्यांनी आयुष्यभर ज्यांच्याविरोधात संघर्ष केला, त्यांच्यासोबतच उद्धव ठाकरेंनी सत्तेसाठी वेगळी चूल मांडली,' आम्ही सकारात्मक बोलल्यास लगेच सामनामध्ये अग्रलेख येईल. सत्ता नसल्यानं यांच्या पोटात दुखत असल्याची टीका होईल. प्रताप सरनाईक शिवसेनेचे आमदार आहेत. त्यांनी त्यांचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिलं आहे. आता उद्धव ठाकरेंनी विचार करावा. त्यानंतर आमचे वरिष्ठ नेते, नेतृत्व विचार करेल, 'शिवसेना आणि काँग्रेस-राष्ट्रवादी यांच्या भूमिकेत आणि कार्यशैलीत खूप मोठा फरक आहे. त्यांची आघाडी अशास्त्रीय असल्याचं देवेंद्र फडणवीस १८ महिन्यांपूर्वीच सांगत होते. पण सत्ता लोहचुंबकासारखी असते. त्यासाठी शिवसेना काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत गेली असं भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील म्हणाले.

Web Title: Shiv Sena-NCP first reaction to Pratap Saranaik 'letter to CM, Sanjay Raut, Jayant Patil said

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.