“...तेव्हा शिवसेनेची ऑफर नाकारली अन् भाजपात थांबलो, अखेर देवेंद्र फडणवीसांनी न्याय दिला”
By प्रविण मरगळे | Published: November 9, 2020 05:46 PM2020-11-09T17:46:14+5:302020-11-09T17:48:35+5:30
Pune Graduate Constituency Election, BJP Sangram Deshmukh, Shiv Sena News: भाजपाने मेधा कुलकर्णी यांचा पत्ता कट करत संग्राम देशमुख यांना उमेदवारी दिली.
प्रविण मरगळे
मुंबई – विधान परिषदेच्या ५ जागांसाठी येत्या १ डिसेंबरला निवडणूक होणार आहे, यात पुणे पदवीधर मतदारसंघासाठी भाजपाने सांगलीच्या संग्राम देशमुख यांना उमेदवारी जाहीर केली आहे. पुणे पदवीधर निवडणुकीसाठी भाजपाच्या अनेक इच्छुकांनी प्रयत्न केले होते, पुण्याचे महापौर मुरळीधर मोहोळ, रवींद्र भेगडे, अभाविपचे राजेश पांडे यांनी भाजपाची उमेदवारी मिळवण्यासाठी प्रयत्न केले होते.
त्याचसोबत विधानसभा निवडणुकीत प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यासाठी कोथरूड मतदारसंघ सोडणाऱ्या मेधा कुलकर्णी यांना पुणे पदवीधर मतदारसंघासाठी संधी दिली जाईल अशी चर्चा रंगली होती, परंतु भाजपाने मेधा कुलकर्णी यांचा पत्ता कट करत संग्राम देशमुख यांना उमेदवारी दिली. सांगली जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे विद्यमान उपाध्यक्ष संग्राम देशमुख यांचा जिल्ह्यात मोठा प्रभाव आहे. सातारा, सांगली, पुणे जिल्ह्यात त्यांचा कनेक्ट आहे. आमदार पृथ्वीराज देशमुख यांचे ते बंधू आहेत.
या निवडीबाबत बोलताना पृथ्वीराज देशमुख म्हणाले की, मागील विधानसभा निवडणुकीत पलूस-कडेगाव हा मतदारसंघ महायुतीत शिवसेनेच्या वाट्याला गेला होता, याठिकाणी देशमुख कुटुंबांचे मोठं वर्चस्व आहे. सध्या विद्यमान आमदार विश्वजित कदम यांना कडवी झुंज दिली असती, भाजपाने हा मतदारसंघ घेण्यासाठी प्रयत्न केले परंतु शिवसेनेने आमच्याकडे या आणि निवडणूक लढवा अशी आमंत्रण दिलं, परंतु भाजपा सोडायची नाही असं आम्ही ठरवलं, त्याचा फळ आता आम्हाला मिळालं आहे असं त्यांनी सांगितले.
त्याचसोबत निश्चित पुणे पदवीधर मतदारसंघासाठी भाजपाने मतदारांच्या नोंदणी केल्या आहेत, या मतदारसंघाचे नेतृत्व भाजपाकडे राहिलं होतं. देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आम्हाला न्याय दिला आहे भाजपाने दिलेल्या संधीचे नक्कीच सोनं करणार असा विश्वास सांगली जिल्हाध्यक्ष आमदार पृथ्वीराज देशमुख यांनी व्यक्त केला आहे.
एकाच जिल्ह्यात दोघांना उमेदवारी?
पुणे पदवीधर मतदारसंघात भाजप व राष्ट्रवादीत काट्याची लढत शक्य आहे. भाजपाने सांगली जिल्ह्यातील संग्राम देशमुख यांना उमेदवारी दिली आहे. दुसरीकडे राष्ट्रवादीकडूनही याच जिल्ह्यातील अरुण लाड यांना उमेदवारी देण्याची तयारी सुरू केली आहे. त्यांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर पुणे पदवीधर निवडणुकीच्या राजकारणाच सांगली जिल्हा हे केंद्र बनणार आहे.
आमदारकीची परंपरा
दिवंगत माजी आमदार संपतराव देशमुख यांनी १९९५ मध्ये पतंगराव कदम यांचा पराभव करून आमदारकी मिळवली होती. संपतराव देशमुख यांच्या पश्चात त्यांचे पुतणे पृथ्वीराज देशमुख यांनी पतंगराव कदम यांच्याविरोधात विधानसभा पोटनिवडणूक जिंकली होती. त्यांनतर पृथ्वीराज देशमुख यांना भाजपच्या सत्ताकाळात मध्ये विधानपरिषदेवर संधी मिळाली होती. आता आणखी एकदा उमेदवारी मिळाल्याने देशमुख समथर्कांतून आनंद व्यक्त होत आहे.