आधी विरोध, मग श्रेय, हा शिवसेनेचा स्थायीभाव; देवेंद्र फडणवीस यांची टीका
By ऑनलाइन लोकमत | Published: February 8, 2021 05:58 AM2021-02-08T05:58:10+5:302021-02-08T07:26:54+5:30
कोविड काळात भाजप कार्यकर्ते सरकारच्या पाठीशी राहिले. रस्त्यावर उतरून चांगले काम केले, असेही फडणवीस म्हणाले.
ओरोस (जि. सिंधुदुर्ग) : आधी कुठल्याही प्रकल्पाला विरोध करायचा आणि आपल्याशिवाय हा प्रकल्प पूर्ण होतोय असे वाटू लागले की मग त्याचे श्रेय घ्यायचे, हा शिवसेनेचा स्थायीभाव बनला आहे. यासाठी समृद्धी महामार्ग, मुंबईतील मेट्रो प्रकल्प अशी अनेक उदाहरणे देता येतील, अशी टीका विधानसभेतील विरोधी पक्षनेते, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी येथे केली.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पडवे (ता. कुडाळ) येथील वैद्यकीय महाविद्यालयाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. आरोग्य विभागाचा पुनर्विचार करावा लागेल, हे कोविडमुळे दिसले. त्यामुळे केंद्रीय अर्थसंकल्पात आरोग्य क्षेत्रावर सर्वाधिक तरतूद करण्यात आली आहे. पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वात आरोग्यक्षेत्रात क्रांती होत आहे. मात्र, असे असले तरी महाराष्ट्रात मात्र कोविड काळात देशातील आरोग्य क्षेत्रामधील सर्वात वाईट काम झाले आहे. आर्थिक
पाहणी अहवालात हे समोर आले आहे. कोविड काळात भाजप कार्यकर्ते सरकारच्या पाठीशी राहिले. रस्त्यावर उतरून चांगले काम केले, असेही फडणवीस म्हणाले.
‘त्या’ कार्यकर्त्यांना प्रवेश नाकारला
जिल्हा दौऱ्यावर आलेल्या मंत्र्यांना काळे झेंडे दाखविणार असल्याचा इशारा दिव्यांगांच्या एका संघटनेने दिला होता. त्यानुसार पोलीस प्रशासनाने आवश्यक ती खबरदारी घेतली होती.
तसेच कार्यक्रमस्थळी काळे शर्ट परिधान करून आलेल्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी प्रवेश नाकारला. त्यांना काळे शर्ट बदलून येण्याची सूचना करण्यात आली. तसेच काळे मास्क असलेल्यांनाही मास्क बदलून देण्यात आले.