"ईडी, सीबीआयच्या ‘कार्यकर्त्यां’ना हाताशी धरून महाराष्ट्रात राजकीय क्रांती घडविता येणार नाही"

By जयदीप दाभोळकर | Published: January 19, 2021 08:15 AM2021-01-19T08:15:29+5:302021-01-19T08:20:51+5:30

ग्रामपंचायत निवडणुकांच्या निकालावरून शिवसेनेची भाजपवर टीका

shiv sena saamna editorial criticize bjp after maharashtra gram panchayat election results ed cbi income tax | "ईडी, सीबीआयच्या ‘कार्यकर्त्यां’ना हाताशी धरून महाराष्ट्रात राजकीय क्रांती घडविता येणार नाही"

"ईडी, सीबीआयच्या ‘कार्यकर्त्यां’ना हाताशी धरून महाराष्ट्रात राजकीय क्रांती घडविता येणार नाही"

Next
ठळक मुद्देग्राम पंचायत निवडणुकांच्या निकालावरून शिवसेनेचा भाजपवर निशाणाग्रामंपचायत निवडणुकीनं भाजपच्या भ्रमाचा भोपळा फोडला, शिवसेनेची टीका

ग्रामपंचायती हा लोकमताचा कौलच असतो, तो मान्य करा नाहीतर महाराष्ट्रातील जनता आणखी माती केल्याशिवाय राहणार नाही. ईडी, सीबीआय, आयकरातील ‘कार्यकर्त्यां’ना हाताशी धरून महाराष्ट्रात राजकीय क्रांती घडविता येणार नाही. महाराष्ट्राची मातीच वेगळी आहे. चला, हवा येऊ द्या, असे म्हणत शिवसेनेने भाजपवर घणाघाती टीका केली आहे.

ठाकरे सरकार लोकांचे प्रश्न मार्गी लावत आहे. राज्याने विकासाची गती पकडली आहे. विरोधी पक्षाने आता स्वतःला सावरायला हवे. ग्रामपंचायत निवडणुकीत महाविकास आघाडीच्या सर्व घटक पक्षांनी बाजी मारली आहे. राज्यातील ठाकरे सरकारच्या बाजूने हा कौल नाही तर काय आहे?, असा सवालदेखील शिवसेनेने केला आहे. शिवसेनेने सामनाच्या संपादकीयमधून निवडणुकांच्या निकालानंतर भाजपावर जोरदार निशाणा साधला. 

काय म्हटलंय अग्रलेखात ?

महाविकास आघाडी सरकारला जनमताचा अजिबात पाठिंबा नाही. ‘ठाकरे सरकार’ म्हणजे जुगाड आहे, ते जोडतोडीतून बनले आहे अशी तोंडची हवा महाराष्ट्रातील विरोधी पक्ष गेले वर्षभर सोडत आहे. त्या विरोधी पक्षाची हवा ग्रामपंचायत निवडणुकीत निघाली आहे. राज्यभरातील साडेतीन हजारांवर ग्रामपंचायतींचे निकाल हाती येत आहेत. त्यात महाविकास आघाडीने चांगलीच मुसंडी मारली आहे. शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी यांनी जिंकलेल्या ग्रामपंचायती पाहता भाजपची सूज लोकांनी उतरवली आहे हे स्पष्ट दिसत आहे. 

ग्रामपंचायतींचे निकाल हा राज्याच्या जनतेचा कौल आहे. ग्रामपंचायती म्हणजे गाव खेड्यातल्या, पाड्यावरच्या विधानसभाच आहेत. त्या निवडणुकीत राज्याची जनता मतदान करते. आजपर्यंतचे निकाल पाहता भारतीय जनता पक्षाचे सर्व गडकिल्ले लोकांनी उद्ध्वस्त केले आहेत. 

सर्वच पक्षांतील वजनदार लोकांना, प्रस्थापितांना या निवडणुकीत धक्के बसले आहेत, पण जगातील नंबर एकचा तोरा मिरविणाऱ्यांना महाराष्ट्रीय जनतेने माती चारली आहे. विदर्भ-मराठवाड्यातही काँग्रेस-राष्ट्रवादीने झेप घेतली आहे. कोकणात शिवसेनाच आहे, पण काही ठिकाणी मोठी पडझड झाली. त्याची झाडाझडती नंतर घेता येईल. मात्र राज्याच्या संपूर्ण निकालाची गोळाबेरीज पाहता भारतीय जनता पक्षाला लोकांनी झिडकारले आहे. याचा दुसरा अर्थ असा की, महाविकास आघाडीच्या ठाकरे सरकारला लोकांनी स्वीकारले आहे. 

दिल्लीच्या सीमेवरील शेतकऱ्यांचे आंदोलन हे मूठभर शेतकऱ्यांचे आंदोलन असल्याची तोंडपाटीलकी चंद्रकांत पाटील यांनी केली होती, पण दिल्लीतील शेतकऱ्यांचे आंदोलन महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचेही आहे. भाजपचा पराभव करून महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी पंजाब-हरयाणाच्या शेतकऱ्यांना पाठिंबाच दिला आहे. विरोधी पक्षाने गेल्या काही दिवसांत आपल्या अकलेचीच दिवाळखोरी जाहीर केली. लोकांच्या जीवन-मरणाच्या प्रश्नांची चिंता न करता त्यांनी सुशांत राजपूत, कंगना राणावत, ईडीची वाटमारी याच विषयांवर कोळसा उगाळण्याचे कार्यक्रम केले. 

विरोधी पक्षाला आजही एक भ्रम कायम आहे तो म्हणजे महाविकास आघाडीचे सरकार पडेल, आपणच पुन्हा अलगद सत्तेवर येऊ. त्यामुळे विरोधी पक्षाच्या भूमिकेत शिरायला ही मंडळी तयार नाहीत. आज ना उद्या हे सरकार पडणारच आहे, मग उगाच लोकांच्या प्रश्नांवर रान का उठवायचे या भूमिकेत ही मंडळी आणखी किती काळ राहणार? पदवीधर आणि शिक्षक मतदार संघातील पराभवातूनही त्यांनी धडा घेतला नाही व आता ग्रामपंचायत निवडणुकीने तर भ्रमाचा फुगाच फोडला आहे. 

 

Web Title: shiv sena saamna editorial criticize bjp after maharashtra gram panchayat election results ed cbi income tax

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.