Goa Election 2022: “मनोहर पर्रिकरांनी ज्यांना मोठं केलं, तेच आता उत्पल यांची औकात काढताहेत”; संजय राऊतांचा पलटवार
By ऑनलाइन लोकमत | Published: January 18, 2022 11:36 AM2022-01-18T11:36:45+5:302022-01-18T11:38:33+5:30
Goa Election 2022: उत्पल पर्रिकर यांच्या जागी माफियाला तिकीट दिले जातेय, याबाबत भाजपने बोलावे, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.
मुंबई: गोवा विधानसभा निवडणूक (Goa Election 2022) जाहीर झाल्यापासून माजी मुख्यमंत्री दिवंगत मनोहर पर्रिकर यांचे सुपुत्र उत्पल पर्रिकर (Utpal Parrikar) यांच्या उमेदवारीवरून जोरदार राजकारण सुरू झाल्याचे पाहायला मिळत आहे. एकीकडे भाजपने उत्पल यांना तिकीट देण्यास असमर्थता दर्शवली असून, उत्पल यांनी अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवण्याची तयारी सुरू केली आहे. तर दुसरीकडे, शिवसेनेने उत्पल यांना सर्वपक्षीयांनी पाठिंबा द्यावा, असे म्हटले आहे. यात पुन्हा एकदा शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी भाजपवर निशाणा साधत, मनोहर पर्रिकर यांनी ज्यांना मोठे केले, तेच आता त्यांचे पुत्र उत्पल यांची औकात काढत आहेत, असा पलटवार संजय राऊत यांनी केला.
तुम्ही संजय राऊत यांची वक्तवे चालवता म्हणून ते फारच वाढत चालले आहे. मनोहर पर्रिकरांच्या मुलाबद्दल त्यांनी कशाला भाष्य करायचे? तुमचे तिथे ऐकायला कोण बसले आहे? हिंमत असेल तर संजय राऊतांनी गोव्यातील एक मतदारसंघ लढवावा. पर्रिकरांच्या मुलाला भाजपने तिकीट दिले तर तुम्ही सर्व जण निवडणूक लढणार नाही असे सांगा, असे थेट आव्हान भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिले होते. याला संजय राऊत यांनी प्रत्युत्तर दिले आहे.
उत्पल पर्रिकर यांना तिकीट द्यावेच लागेल
मनोहर पर्रिकरांचा मुलगा इकडे तिकडे फिरत असून त्याला अपमानित केले जात आहे. त्याची औकात काढली जात आहे. मग तिकीट देण्याची चर्चा कधीपासून सुरु झाली. उत्पल पर्रिकर अपक्ष उभे राहिल्यास आम्ही सर्व त्यांना पाठिंबा देऊ असे आम्ही सांगितल्यानंतर भाजपची धावपळ सुरु झाली आहे. त्यांना तिकीट द्यावेच लागेल, असे सांगत भाजपने उत्पल पर्रिकरांना तिकीट देण्यासाठी इतका वेळ का लावला? भाजपवाले बोलघेवडे आहेत. तिकीट का थांबवले हा मोठा प्रश्न आहे, अशी टीका संजय राऊत यांनी केली.
मनोहर पर्रीकर गोव्यातील प्रमुख नेते होते
एखाद्या नेत्याच्या मृत्यूनंतर कुटुंबाविषयी सहानुभूती असते. मी कोणतेही राजकीय भाष्य करत नाही. मनोहर पर्रिकर गोव्यातील प्रमुख नेते होते. गोव्याच्या विकासात त्यांचे योगदान आहे. गोव्यात जो भाजप दिसत आहे, त्यात मनोहर पर्रिकर यांचेच योगदान आहे. गोव्यात भाजप पर्रिकरांच्या नावाने ओळखला जातो. गोव्यात, राजकारणात मनोहर पर्रिकरांनी ज्यांना मोठे केले, तेच त्यांच्या मुलाची औकात काढत आहेत हे चांगले वाटले नाही. त्यांना तिकीट देणे, न देणे ही पुढील गोष्ट आहे. पण उत्पल पर्रिकर यांच्या जागी माफियाला तिकीट दिले जात आहे. उत्पल पर्रिकर यांचे ट्वीट मी पाहिले आहे. तिथे कोणाला तिकीट देत आहात त्यावर चर्चा करा, त्यानंतर पाहू, असे आव्हान संजय राऊत यांनी दिले.
दरम्यान, जर उत्पल पर्रिकर अपक्ष उभे राहणार असतील, तर मनोहर पर्रिकरांना आदरांजली म्हणून सर्व राजकीय पक्षांनी विरोधात उमेदवार देऊ नये, असे संजय राऊत म्हणाले होते. यानंतर चंद्रकांत पाटील यांनी संजय राऊत यांच्यावर टीका केली होती. दुसरीकडे, उत्पल पर्रिकर यांच्याविषयी आम्हाला चिंता आहे. गेले महिनाभर उत्पलच्या संपर्कात आहे. आम्ही अजून त्याच्याशी चर्चा करू, असे भाजपचे नेते व गोवा निवडणूक प्रभारी देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.