“प्रताप सरनाईकांविषयी लवकरच बातमी मिळेल”; संजय राऊतांचे सूचक विधान
By ऑनलाइन लोकमत | Published: June 26, 2021 07:12 PM2021-06-26T19:12:02+5:302021-06-26T19:16:10+5:30
प्रताप सरनाईकांविषयी लवकरच बातमी मिळेल, असे सूचक विधान संजय राऊत यांनी केले आहे.
मुंबई: गेल्या काही दिवसांपासून एकीकडे मराठा आणि ओबीसींच्या राजकीय आरक्षणाचा प्रश्न तापत असताना दुसरीकडे शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिलेल्या पत्रामुळे राज्यातील राजकारणात खळबळ उडाली होती. या पार्श्वभूमीवर शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. यानंतर प्रताप सरनाईकांविषयी लवकरच बातमी मिळेल, असे सूचक विधान संजय राऊत यांनी केले आहे. (shiv sena sanjay raut meets cm uddhav thackeray over pratap sarnaik letter issue)
दिल्लीत राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची भेट घेतल्यानंतर राऊत यांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेतल्याने आता राजकीय वर्तुळात चर्चा रंगू लागल्या आहेत. शरद पवार यांच्या भेटीविषयी संजय राऊत यांनी ट्विटरवरून माहिती दिली होती. त्यानंतर मुंबईतील मातोश्रीवर संजय राऊत आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यात तब्बल दोन तास खलबतं झाल्याची माहिती मिळाली आहे. या भेटीनंतर संजय राऊत यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
गुड न्यूज! जुलैमध्ये मिळू शकेल सिंगल डोस जॉन्सन अँड जॉन्सनची लस; ‘इतकी’ असेल किंमत
प्रताप सरनाईकांविषयी लवकरच बातमी मिळेल
उद्धव ठाकरे राज्याचे मुख्यमंत्री असले, तरी ते शिवसेनेचे पक्षप्रमुख आहेत. माझी चर्चा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी झाली. संघटनात्मक काम महत्त्वाचे आहे. भविष्यात पक्ष मजबूत असेल, तर सरकार अधिक काळ टिकेल. अनेक विषयांवर चर्चा झाली. प्रताप सरनाईक यांच्याशी माझी चर्चा झाली. त्यांनी खुलासा केला आहे. मी माझ्या भावना व्यक्त केल्या आहेत आणि मी आजन्म शिवसेनेतच राहीन आणि शिवसैनिक म्हणूनच मरेन, असे सरनाईकांनी स्पष्ट केले आहे. यासंदर्भात सुद्धा उद्धव ठाकरे यांच्याशी बोलणे झाले आहे. प्रताप सरनाईक यांच्याविषयी तुम्हाला लवकरच बातमी कळेल, असे राऊत म्हणाले.
“खडसे, मुंडे, तावडे, बावनकुळे या ओबीसी आणि बहुजन नेत्यांचा राजकीय बळी का घेतला?”
बैठकीबद्दल बाहेर चर्चा व्हावी, असे काही नाही
अधिवेशन असल्यानं त्यांची तयारी सुरू आहे. त्या मी काही पडत नाही. या बैठकीबद्दल बाहेर चर्चा व्हावी, असे काही नाही. सर्वकाही स्थिर स्थावर आणि सुरळीत सुरू आहे. मुख्यमंत्री महाराष्ट्राच्या विकासाला आणि राजकारणाला गती देण्यासाठी सक्षम आहेत. कुणी कितीही कंड्या पिकवल्या. कुणी कितीही ढोल बडवले, तरीही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील हे सरकार आपला कार्यकाळ व्यवस्थित पूर्ण करेल, असे संजय राऊत यांनी यावेळी बोलताना स्पष्ट केले.