...याला म्हणतात महासत्ता! आम्ही आमच्या मस्तीत आहोत; संजय राऊत यांचा मोदी सरकारला टोला
By ऑनलाइन लोकमत | Published: August 16, 2020 11:47 AM2020-08-16T11:47:06+5:302020-08-16T11:50:10+5:30
दिल्ली इतकी आळशी व बेरोजगार कधीच झाली नव्हती. दिल्लीतही एकच आवाज गुदमरल्यासारखा घुमतो आहे, ‘‘आम्हाला काम पाहिजे! असं राऊत म्हणाले.
मुंबई - मुंबईप्रमाणे कोरोनाचे भय दिल्लीत आहे, पण घरात किती काळ बसून राहायचे म्हणून कामधंद्यासाठी लोक बाहेर पडले आहेत. दिल्लीतील अनेक केंद्रीय मंत्री व मोठे अधिकारी कोरोनाचे रुग्ण आहेत. अमित शहा यांच्यासह केंद्रातले सहा मंत्री कोरोनाच्या विळख्यात सापडले. हिंदुस्थान कोरोनाविरोधात ‘भाभीजी पापड’ लाटत बसला आणि तिकडे रशियाने कोरोनावर ‘लस’ बनवून बाजारात आणली. जागतिक आरोग्य संघटनेलाही त्याबाबत विचारले नाही. याला म्हणतात महासत्ता! आम्ही आमच्या मस्तीत आहोत असा टोला खासदार संजय राऊत यांनी केंद्रातील मोदी सरकारला लगावला आहे.
संजय राऊत यांनी रोखठोक भूमिकेत म्हटलं की, राष्ट्रातील संकटकाळात आम्हीच आमचे निर्णय घेऊ, जगाने नाक खुपसू नये असे बेदरकारपणे वागणाऱ्या रशियाचा आदर्श आमचे राजकारणी ठेवणार नाहीत. आजही ते अमेरिकेच्या प्रेमात पागल झाले आहेत. रशियाने बनवलेली ‘लस’ बेकायदेशीर ठरवण्याचे प्रयत्न जागतिक पातळीवर सुरू झाले आहेत, पण रशियाचे अध्यक्ष पुतिन यांनी ही लस सर्वप्रथम आपल्या तरुण मुलींनाच टोचली व आपल्या देशात आत्मविश्वास निर्माण केला. आत्मनिर्भरतेचा हा पहिला धडा रशियाने घालून दिला. आपण आत्मनिर्भरतेवर प्रवचनेच झोडत बसलो आहोत असा चिमटा त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना काढला.
तर दिल्लीच्या मुक्कामात रशियाच्या लस प्रकरणावर चर्चा झाली तेव्हा एका सरकारी अधिकाऱ्य़ाने मिश्कील भाष्य केले, “हीच लस अमेरिकेत सर्वप्रथम बनली असती तर प्रे. ट्रम्प यांचे काय कौतुक आपण केले असते! आज ज्या मंत्र्यांना व बड्या अधिकाऱ्य़ांना कोरोना झाला आहे, त्यांनी रशियाची लस गुप्त मार्गाने आधीच आणली असेल, पण देशातील लाखो गोरगरीबांना वाली कोण?’’ हा प्रश्न अनुत्तरित आहे असा सवाल संजय राऊतांनी केंद्र सरकारला केला आहे.
दिल्लीला काम हवंय
दिल्लीतील उन्हाळा कडक आहे, पण दिल्लीचे सुस्तावलेपण त्यापेक्षा गंभीर आहे. एक प्रकारचा आळस दिल्लीच्या नसानसांत भरलेला दिसत आहे. आज देशात 14 कोटी लोक बेरोजगार झाल्याचे अधिकृतपणे सांगितले गेले, पण देश चालवणाऱ्य़ा दिल्लीलाही काम नाही असे चित्र आहे. राजकीय आंदोलने नाहीत म्हणून कार्यकर्ते आळशी झाले. विरोधक थंड पडले म्हणून राज्यकर्ते लोळागोळा झाले. दिल्ली इतकी आळशी व बेरोजगार कधीच झाली नव्हती. दिल्लीतही एकच आवाज गुदमरल्यासारखा घुमतो आहे, ‘‘आम्हाला काम पाहिजे! असं राऊत म्हणाले.
पंतप्रधान मोदीही ‘क्वारंटाईन’ होणार काय? हा प्रश्न
अयोध्येत रामजन्मभूमी ट्रस्टचे अध्यक्ष नृत्यगोपाल दास हे कोरोना पॉझिटिव्ह झाले. ८५ वर्षांचे महंत नृत्यगोपाल दास हे ५ ऑगस्टला अयोध्येत रामजन्मभूमी मंदिर भूमिपूजन सोहळ्यास व्यासपीठावर हजर होते. त्यांनी तोंडास मास्क लावला नव्हता हे स्पष्ट दिसत होते. दुसरे असे की, त्याच वेळी पंतप्रधान मोदी व सरसंघचालक मोहन भागवत हे महंतांच्या संपर्कात आले. मोदी यांनी तर महंतांचा हात श्रद्धेने हातात घेतला. त्यामुळे महंतांना लागण झाल्याचे समजताच आपले पंतप्रधान मोदीही ‘क्वारंटाईन’ होणार काय? हा प्रश्नच आहे असं राऊतांनी सांगितले.
मोदी-शहांपेक्षा कोरोनाची भीती
आज गृहमंत्री अमित शहा कोरोनामुळे एकांतवासात, पंतप्रधान मोदी यांना नृत्यगोपाल दास भेटल्याची चिंता, माजी राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांनाही कोरोना झाला व त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. कॅबिनेटचे सदस्य, नोकरशहा, संसदेचा कर्मचारी वर्ग असे सगळेच जण दिल्लीत कोरोनाच्या विळख्यात आहेत. दंगली व लढायांतही दिल्ली इतक्या दहशतीखाली नव्हती. ती आज जरा जास्त भयग्रस्त आहे. मोदी व शहा यांची भीती होतीच, पण कोरोनाची भीती त्यांच्यापेक्षा जास्त आहे असं मत संजय राऊत यांनी मांडले आहे.