किरीट सोमय्या यांच्या आरोपावरून संजय राऊत संतापले; “शेठजींचा पक्ष भंपक, ढोंगी, फालतू अन्...”
By प्रविण मरगळे | Published: November 13, 2020 10:35 AM2020-11-13T10:35:01+5:302020-11-13T10:57:31+5:30
BJP Kirit Somaiya, Shiv Sena Sanjay Raut News: किरीट सोमय्यांनी कितीही फडफड केली त्यातून काही निष्पन्न होणार नाही. तर महाराष्ट्र सरकार ५ वर्ष चालणार आहे असं राऊतांनी सांगितले.
मुंबई – अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणात अर्णब गोस्वामी यांना अटक केल्यानंतर भाजपाने राज्य सरकारविरोधात आक्रमक भूमिका घेतली, यात किरीट सोमय्या यांनी अन्वय नाईक कुटुंबासोबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे जमिनीचे आर्थिक व्यवहार आहेत, उद्धव ठाकरेंचा रिअल इस्टेटचा व्यवसाय आहे का? असा सवाल किरीट सोमय्यांनी केला होता. या आरोपावर उत्तर देताना शिवसेना नेते खासदार संजय राऊत हे भाजपावर चांगलेच संतापल्याचं चित्र पाहायला मिळालं.
माध्यमांशी संजय राऊत यांनी संवाद साधला, ते म्हणाले की, अन्वय नाईक यांच्या आत्महत्येचं प्रकरण हे वेगळं आहे, आमच्या मराठी भगिनीचं कुंकू पुसलं गेलं, अनेक महिन्यापासून न्यायाची मागणी करतायेत, त्यावर शेठजींच्या पक्षाचे व्यापारी प्रवक्ते काहीही बोलायला तयार नाहीत, २०१४ सालचे हे जमिनीचे कायदेशीर व्यवहार आहेत, २१ व्यवहार केलेत हे दाखवावेत, हा खोटारडेपणाचा कळस आहे, मराठी माणसांनी व्यवहार केले ते डोळ्यात खुपतंय का? किरीट सोमय्यांनी कितीही फडफड केली त्यातून काही निष्पन्न होणार नाही. तर महाराष्ट्र सरकार ५ वर्ष चालणार आहे असं त्यांनी सांगितले.
तसेच अन्वय नाईक यांच्या पत्नीला न्याय देण्याची भूमिका शिवसेनेची आहे. ज्यांच्यामुळे ही आत्महत्या झाली त्यांच्या गुन्हेगारांना कायद्याच्या चौकटीत शिक्षा देण्याची आहे, गुन्हेगारांना वाचवण्याचा प्रयत्न शेठजींच्या पक्षाकडून होत आहे. सोमय्या गिधाडासारखे कागद फडकवतायेत..कायद्याच्या चौकटीत राहून केलेले व्यवहार आहेत. रोज सकाळी आरशात पाहून भ्रष्टाचार भ्रष्टाचार किंचाळत असतील, नैराश्य आणि वैफल्यग्रस्त आहेत. तपासाची दिशा बदलून टाकण्यासाठी शेठजींच्या पक्षाचे प्रवक्ते फालतू मुद्दे घेऊन समोर येत आहेत. सोमय्यांना काहीही माहिती नाही, फालतू माणूस आहे अशा शब्दात संजय राऊत यांनी संतप्त प्रतिक्रिया मांडली.
दरम्यान, खुलासा कोणी करावा आणि कशासाठी करावा हे शेठजींच्या पक्षाचे प्रवक्ते सांगू शकत नाही, मराठी भगिनीचं कुंकू पुसलं गेले, त्या स्वत: आणि त्यांची कन्या न्यायासाठी आक्रोश करतायेत, अर्णब गोस्वामी तुमचा लागतो कोण? नाईक कुटुंब मराठी आहेत, ते तुमचे कोणी लागत नाहीत का? महाराष्ट्राचे दुश्मन आहेत. हे सगळे भंपक, बनावट लोक आहेत, महाराष्ट्राच्या मूळावर उठणारे हे लोक आहेत म्हणून त्यांना घरी बसवलं आहे. जे गुंडाची बाजू घेतायेत त्यांना ५ वर्ष नाही तर २५ वर्ष घरी बसवू, स्वत: भ्रष्टाचारी आहेत दुसऱ्यांच्या तोंडाचा वास घेत आहेत. ईडी तुमच्या बापाची नोकर आहेत का? असा सवालही संजय राऊत यांनी भाजपाला विचारला आहे.
काय म्हणाले होते किरीट सोमय्या?
वास्तुविशारद अन्वय नाईक आणि त्यांचे कुटुंबीय अक्षता, आज्ञा आणि रश्मी उद्धव ठाकरे, मनीषा रवींद्र वायकर यांच्यात अनेक जमीन व्यवहार झाल्याचा आरोप भाजपाचे नेते किरीट सोमय्या यांनी पुन्हा एकदा केला. ठाकरे कुटुंबाची जमिनीत इतकी गुंतवणूक का आणि कशासाठी? त्यांचा रिअल इस्टेटचा व्यवसाय आहे का? मुख्यमंत्री याची माहिती राज्यातल्या जनतेला देणार का? नाईक-ठाकरे-वायकर कुटुंबाचे नेमके संबंध काय? वायकर आणि ठाकरे कुटुंबं कशाला एकत्र आली? जमीन खरेदी व्यवहारात अनेकदा ब्लॅक-व्हाईट असतं. लोकांना तसं वाटतं. त्यामुळेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी महाराष्ट्राला जमीन खरेदी व्यवहाराची माहिती द्यावी, उद्धव ठाकरेंचा जमीन खरेदीचा व्यवसाय आहे का? तसं असेल तर त्यांनी जनतेला सांगावं असं आवाहन सोमय्या यांनी केले होते.
वायकर यांच्याकडून सोमय्यांना प्रत्युत्तर
सोमय्यांनी केलेल्या आरोपांना शिवसेनेचे नेते रविंद्र वायकर यांनी प्रत्युत्तर दिलं. कोणी कोणाकडून जमीन खरेदी करू नये का, असा सवाल त्यांनी उपस्थित केले. 'रश्मी ठाकरे आणि मनिषा वायकर यांनी नाईक कुटुंबाकडून जमीन खरेदी केली. त्याची माहिती आम्ही आयकर विभागाला, निवडणूक आयोगाला दिली. पार्टनरशिपमध्ये जमीन खरेदी करायला मनाई आहे का?' असा प्रतिप्रश्न त्यांनी केला.