शिवसेना म्हणते, या निवडणुकीत कोणतीही लाट नाही!
By ऑनलाइन लोकमत | Published: April 19, 2019 05:15 AM2019-04-19T05:15:54+5:302019-04-19T05:16:24+5:30
देशातील जनतेत २०१४ मध्ये असलेली लाट यंदाच्या निवडणुकीत नाही.
नाशिक : देशातील जनतेत २०१४ मध्ये असलेली लाट यंदाच्या निवडणुकीत नाही. कोणतीही लाट परत परत कधी येत नाही आणि अशा लाटेवर पुन्हा निवडणूक लढविलीही जात नाही. त्याचप्रमाणे २०१४च्या पूर्वी असलेल्या मुद्द्यांच्या आधारे मतेही मागता येणार नाहीत. त्यामुळे पाच वर्षांत नरेंद्र मोदी सरकारने जे काम केले त्या कामाचा कस या निवडणुकीत लागणार असल्याचे मत शिवसेनेचे प्रवक्ते खा. संजय राऊत यांनी व्यक्त केले.
नाशिक येथे निवडणूक प्रचारार्थ आलेल्या राऊत यांनी पत्रकारांशी गुरुवारी संवाद साधला. विरोधी पक्षांकडे पंतप्रधानपदासाठी पाच उमेदवार आहेत या छगन भुजबळ यांच्या वक्तव्यावर बोलताना राऊत म्हणाले, ज्या ठिकाणी पाच उमेदवार पंतप्रधानपदासाठी इच्छुक आहेत, याचाच अर्थ त्यांचा पराभव निश्चित आहे. कारण एकापेक्षा अधिक लोक पदासाठी इच्छुक असल्यास ते सरकार कायम कमकुवत असते.
निवडणुकीचा निकाल काहीही लागला तरी, पदासाठी त्यांच्यामध्ये मारामारी ठरलेली असते. त्यामुळे एनडीएमध्ये सर्व पक्षांनी एकत्र येऊन पंतप्रधानपदासाठी नरेंद्र मोदी यांचे एकमेव नाव निश्चित केले आहे. यंदाच्या लोकसभा निवडणुकीत प्रचार करताना पंतप्रधान मोदी यांनी विकासापेक्षा विरोधकांच्या घराण्यांवर व जातीपातीवरच बोलण्यावर भर दिल्याचे बोलताना राऊत म्हणाले की, ‘मोदी ज्या राज्यात जातात
तेथील राजकारण्यांवर बोलतात, शासकीय सभा असतील तर विकासावर बोलतील. १३५ कोटी लोकसंख्येच्या देशात जात, धर्माचा विषय तर येणारच.’ तसेच वंचित आघाडी ही भाजपची बी टीम असल्याच्या आरोपाचे त्यांनी खंडन केले.