...तर वातावरण बिघडवायचेच हा डाव उधळला; शिवसेनेचा प्रकाश आंबेडकर यांच्यावर गंभीर आरोप

By ऑनलाइन लोकमत | Published: September 1, 2020 07:21 AM2020-09-01T07:21:15+5:302020-09-01T07:24:38+5:30

नामदेवांच्या चरित्रामध्ये अनेक लोकविलक्षण चमत्कारांचा उल्लेख आहे. तसा एक विलक्षण चमत्कार  प्रकाश आंबेडकर यांनी मंदिरात माऊलीचे दर्शन घेऊन केला.

Shiv Sena serious allegations against Prakash Ambedkar over Pandhapur Agitation for open temple | ...तर वातावरण बिघडवायचेच हा डाव उधळला; शिवसेनेचा प्रकाश आंबेडकर यांच्यावर गंभीर आरोप

...तर वातावरण बिघडवायचेच हा डाव उधळला; शिवसेनेचा प्रकाश आंबेडकर यांच्यावर गंभीर आरोप

Next
ठळक मुद्देवंचित बहुजन आघाडीची पावले हिंदुत्वाच्या दिशेने पडत असतील तर त्यांच्या नव्या दिंडीयात्रेचे स्वागतचएक विलक्षण चमत्कार  प्रकाश आंबेडकर यांनी मंदिरात माऊलीचे दर्शन घेऊन केलाप्रकाश आंबेडकर यांच्या चतुरपणाविषयी कुणाला शंका असण्याचे कारण नाही

मुंबई -  प्रकाश आंबेडकरांच्या मंदिर प्रवेश आंदोलनाला भाजप नेत्यांनी जाहीर पाठिंबा दिला. हे त्रांगडे कधी सुटेल असे वाटत नाही.  आंबेडकरांनी पंढरपुरात गर्दी जमवली व ती गर्दी मंदिरासमोरचे बॅरिकेडस् तोडून आत घुसण्याचा प्रयत्न करत होती. यावेळी पोलिसांनी कोणताही बलप्रयोग केला नाही. पोलिसांनी संयम राखला हे महत्त्वाचे. पोलिसांनी लाठी जरी उगारली तरी वातावरण बिघडवायचेच हा डाव त्यामुळे उधळला गेला असा गंभीर आरोप सामना अग्रलेखातून शिवसेनेने प्रकाश आंबडेकर यांच्या पंढरपूर येथील आंदोलनावर केला आहे.

तसेच देह विसर्जन करण्यासाठी नामदेव पंढरीला आले आणि विठ्ठलाच्या महाद्वारी त्यांनी समाधी घेतली. तीच ‘नामदेवाची पायरी’ म्हणून प्रसिद्ध आहे. नामदेवांच्या चरित्रामध्ये अनेक लोकविलक्षण चमत्कारांचा उल्लेख आहे. तसा एक विलक्षण चमत्कार  प्रकाश आंबेडकर यांनी मंदिरात माऊलीचे दर्शन घेऊन केला. कपाळास बुक्का, चंदन लावून आंबेडकर मंदिरात गेले. एक प्रकारे त्यांनी भगवी पताकाच खांद्यावर घेतली. आंबेडकर व त्यांच्या वंचित बहुजन आघाडीची पावले हिंदुत्वाच्या दिशेने पडत असतील तर त्यांच्या नव्या दिंडीयात्रेचे स्वागतच करावे लागेल असा टोलाही शिवसेनेने लगावला आहे.

सामना अग्रलेखातील महत्त्वाचे मुद्दे

सरकारच्या मनात कोरोनासंदर्भात भीती आहे व ती रास्त आहे. इतके असूनही अॅड. प्रकाश आंबेडकर व त्यांच्या पंधरा सहकाऱ्यांना विठ्ठल मंदिरात जाऊन माऊलीचे दर्शन घेण्याची परवानगी दिली. अॅड. आंबेडकरांनी ‘नामदेव पायरी’चेही दर्शन घेतल्याचे समजते. दोन दिवसांपूर्वी भारतीय जनता पक्षाने मंदिरे उघडण्यासाठी जागोजाग घंटानाद आंदोलन केले व आता वंचित बहुजन आघाडीचे अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी पंढरपुरात विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात प्रवेशासाठी मोठे आंदोलन केले व अखेर सरकारी हस्तक्षेपाने त्यांनी मंदिरात प्रवेश मिळवला.

मंदिरांसंदर्भात प्रकाश आंबेडकर यांनी केलेल्या आंदोलनाचा संबंध भाजपच्या घंटानादाशी जोडला जातो, हा निव्वळ योगायोग समजायला हवा. अॅड. आंबेडकर व भाजपचे आतून साटेलोटे आहे, असा आरोप नेहमी केला जातो. त्यात काही तथ्य असावे असे वाटत नाही. लोक दहा तोंडांनी बोलतात व शंभर कानांनी ऐकतात त्याला इलाज नाही.

कोरोनाच्या संकटात निदान मंदिर-मशिदीचे राजकारण करू नये, पण विरोधकांना येनकेनप्रकारेण फक्त गोंधळाचे वातावरण निर्माण करायचे आहे. पंढरपुरात मराठी जनतेची विठाई माऊली आहे. पंढरीनाथाखेरीज मराठी माणसांना इतर देवतांना भजण्याचे कारण नाही असे आचार्य अत्रे म्हणत ते खरेच आहे.

पंढरपूर हे आपल्या सगळय़ांचेच मोक्षपीठ आहे व आषाढी-कार्तिकीची वारी हाच महाराष्ट्राचा धर्म आहे. उद्धव ठाकरे यांचे सरकार याच धर्माशी बांधील आहे. त्यामुळे उगाच थाळय़ांचा नाद करून विरोधकांनी ध्वनिप्रदूषण वाढवू नये. महाराष्ट्राचे आराध्य दैवत विठाई माऊली आहे. जनतेचा, सरकारचा माऊलीशी थेट संबंध आहे. त्यामुळे जे लोक आज मंदिरात घुसण्यासाठी आंदोलन करत आहेत त्यांनी सरकार व देवांत भांडण लावण्याचा कितीही प्रयत्न केला तरी ते शक्य नाही.

जगात भांडल्यावाचून काही मिळत नाही. परमेश्वराशीदेखील भक्ताला भांडावे लागले; पण इथे सरकारविरोधी पुढारीच मंदिराबाहेर उभे राहून भक्तांना भांडण्याचे उत्तेजन देत आहेत. प्रकाश आंबेडकर यांचा हट्ट असा आहे की, ‘नियम मोडीन, पण मंदिरात जाईन. मंदिराचे दरवाजे उघडा. मी येथे नियम मोडण्यासाठीच आलो आहे.’ कायद्याची जाण असलेल्या आंबेडकरांसारख्या व्यक्तीने कायद्याचे पालन करणार नाही अशी भाषा वापरणे योग्य नाही.

मंदिरे उघडा ही जनतेची मागणी आहे, असे आता आंबेडकर सांगत आहेत. जनतेची मागणी आहे हे त्यांचे म्हणणे बरोबर आहे; पण राज्यातील आरोग्यविषयक आणि बाकीच्या संकटांचे भानही जनतेला आहे. वारकरी संप्रदायाने याचे भान राखले हे महत्त्वाचे.

आंबेडकर यांचे म्हणणे असे की, राज्यकर्ते ऐकत नसतील तर लोकांनी आंदोलन करावे. हा अधिकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या घटनेनेच बहाल केला आहे. प्रकाश आंबेडकर यांच्या चतुरपणाविषयी कुणाला शंका असण्याचे कारण नाही, पण मंदिरे उघडणार नाहीत किंवा मंदिरात कोणाला प्रवेश दिला जाणार नाही असे कधीच कोणी जाहीर केलेले नाही.

मंदिरे उघडण्याची ही वेळ नाही इतकेच सरकारने सांगितले. यावर वारकरी संप्रदायाचे प्रमुख लोक थेट मुख्यमंत्र्यांशी संवाद साधू शकतात. गर्दीतील एकमेकांच्या संपर्कामुळे कोरोना होतो हा गैरसमज यानिमित्ताने संपवायचा आहे असे पंढरपुरात सांगण्यात आले. असे सांगणे म्हणजे संपूर्ण डॉक्टरी क्षेत्राला व जागतिक आरोग्य संघटनेलाच आव्हान आहे.

प्रकाश आंबेडकर हे बौद्ध धर्माचे उपासक आहेत, पण राज्यातील बहुजन वंचित आघाडीचे नेतृत्व ते करतात. जे देश बौद्धधर्मीय आहेत त्या देशांतही बौद्ध प्रार्थनास्थळांत लोकांना प्रवेश नाही अशी स्थिती आहे. प्रकाश आंबेडकर यांना जनतेचे प्रश्न समजतात व वारे कोणत्या दिशेला वाहतात हेसुद्धा समजते.

मंदिरे उघडा ही लोकभावनाच आहे हे जसे आंबेडकरांना समजते तसे सरकारलाही समजत असावे व कोणतेही सरकार लोकभावनेला चिरडू शकत नाही. तरीही विरोधक बेबंद वागतात तसे सरकारला वागता येत नाही. सरकारच्या मनात कोरोनासंदर्भात भीती आहे व ती रास्त आहे.

Web Title: Shiv Sena serious allegations against Prakash Ambedkar over Pandhapur Agitation for open temple

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.