"...तर पंतप्रधान मोदीच राणेंच्या डोक्यातली हवा काढतील; फडणवीसांच्या मनातही शंका नसावी"

By ऑनलाइन लोकमत | Published: August 26, 2021 08:57 AM2021-08-26T08:57:54+5:302021-08-26T08:59:43+5:30

शिवसेना वि. राणे संघर्ष पेटला; शिवसेनेचे राणेंवरील प्रहार सुरूच

shiv sena slams narayan rane and bjp over controversial comment on cm uddhav thackeray | "...तर पंतप्रधान मोदीच राणेंच्या डोक्यातली हवा काढतील; फडणवीसांच्या मनातही शंका नसावी"

"...तर पंतप्रधान मोदीच राणेंच्या डोक्यातली हवा काढतील; फडणवीसांच्या मनातही शंका नसावी"

Next

मुंबई: केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंबद्दल केलेलं आक्षेपार्ह विधान, त्यानंतर त्यांना झालेली अटक, जामीनावर झालेली सुटका अशा घडामोडींमुळे राज्यातील राजकारण तापलं आहे. शिवसेना आणि राणे यांच्यातील वाद पेटला असून राज्यात अनेक ठिकाणी याचे पडसाद उमटले आहेत. राणेंनी काल पत्रकार परिषद घेऊन शिवसेना आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल केला. यानंतर आता शिवसेनेनं सामनामधून राणेंचा समाचार घेतला आहे. 

मी काय नॉर्मल माणूस वाटलो काय, असा सवाल राणेंनी परवा उपस्थित केला होता. अटकेआधी त्यांनी हा प्रश्न विचारला होता. त्यावरून सामनामधून राणेंना लक्ष्य करण्यात आलं आहे. नारायण राणे यांनी स्वतःला महान समजणं बंद केलं, तर त्यांच्या आयुष्यातील बऱ्याच समस्या कोणत्याही औषधांशिवाय बऱ्या होतील व त्यांचा संसर्ग होण्यापासून भाजपही वाचेल, असा टोला लगावण्यात आला आहे. राणेंच्या डोक्यात मंत्रिपदाची हवा गेली असेल तर ती मोदीच काढणार हे नक्की, असा इशाराही सामनाच्या अग्रलेखातून शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दिला आहे.

अग्रलेखातील महत्त्वाचे मुद्दे-
१. राणे यांना अटक होणे व त्यानंतर रस्त्यावर हंगामा होणे, कार्यकर्त्यांशी संघर्ष होणे, कार्यालयांवर हल्ला करणे हे आजपर्यंत कधीच झाले नव्हते. त्यास सर्वस्वी राणे व त्यांची तळी उचलून धरणारे भाजपमधील नतद्रष्ट जबाबदार आहेत. शिवसेना-भाजपमध्ये आतापर्यंत वादाचे अनेक विषय झाले, पण एकमेकांवर चाल करून जाणे असे प्रकार घडले नव्हते.

२. मोदी यांच्या केंद्रीय मंत्रिमंडळात मंत्री म्हणून ते महान किंवा असामान्य झाले असतील तर त्यांच्या डोक्यातली हवा मोदीच काढतील हे पक्के. पंतप्रधान मोदी हेच त्यांच्या मंत्रिमंडळात सबकुछ आहेत. मंत्री येतात व जातात. मोदी हे स्वतःला फकीर समजतात व राणे ‘महान’ हा फरक समजून घेतला तर राणे हे केंद्रीय मंत्रिमंडळातले थोड्याच दिवसांचे ‘मेहमान’ आहेत याविषयी फडणवीसांच्या मनातही शंका नसावी.

३. मुल्ला ओमरसारखे लोक भाजपात आले तर त्यांच्याही समर्थनासाठी डोक्याला तेल फासून ते उभे राहतील. त्यामुळे ही जबाबदारी भाजपातील शहाण्यांवरच आहे. पुन्हा तेथे बाहेरून आलेल्या दीडशहाणे व अतिशहाण्यांची फौज निर्माण झाली आहे ती वेगळीच. त्यामुळे भाजपात अतिशहाणपणाचे जे अजीर्ण झाले ते राज्याच्या स्वच्छ वातावरणासाठी धोकादायक आहे. राज्यातील पर्यावरण कार्यकर्त्यांसाठी हे आव्हान आहे.

४. राणे, प्रसाद लाड हे मूळ भाजपवाले नसलेले ‘बाटगे’ भाजपनिष्ठेची जोरात बांग देऊ लागल्यावर ते घडले हे समजून घेतले पाहिजे. राणे व लाड यांच्यासारखे फुटकळ लोक कधीपासून हिंदुत्ववादी झाले? भाडोत्री लोकांच्या खांद्यावर बंदुका ठेवून कोणी शिवसेनेवर हल्ले करू पाहत असतील तर त्यांनी आपल्या गोवऱ्या आताच सोनापुरात रचून याव्यात. शिवसेनेचे हृदय वाघाचे आहे. शिवसेना अशा लढाया स्वबळावरच लढत आली आहे. त्यांना राणे, लाडसारखे भाडोत्री लोक लागत नाहीत.
 

Web Title: shiv sena slams narayan rane and bjp over controversial comment on cm uddhav thackeray

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.