संजय राऊत आणि अरविंद सावंत यांच्यावर शिवसेनेची मोठी जबाबदारी; भास्कर जाधव यांचाही समावेश
By ऑनलाइन लोकमत | Published: March 31, 2021 08:42 AM2021-03-31T08:42:46+5:302021-03-31T08:43:22+5:30
महापौर किशोरी पेडणेकर, नगरसेविका शीतल म्हात्रे, डॉ. शुभा राऊळ, किशोर कान्हेरे, संजना घाडी, आनंद दुबे यांच्याही नावाचा समावेश आहे
मुंबई – सचिन वाझे प्रकरणात राज्यातील ठाकरे सरकारवर विरोधकांनी तोंडसुख घेतलं आहे, यात शिवसेना आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करण्याची एकही संधी भाजपा सोडत नाही. अशातच माध्यमांमध्ये शिवसेनेची बाजू ठामपणे मांडणाऱ्यांची संख्या मोजकीच आहे, संजय राऊत(Sanjay Raut) वगळता इतर कोणीही नेते या प्रकरणात जास्त भाष्य करताना दिसत नाही. मात्र याच पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या प्रवक्त्यांची नवी यादी जाहीर करण्यात आली आहे.(Shivsena New Spokesperson List Announced today)
मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या यांच्या आदेशाने शिवसेनेच्या प्रवक्त्यांची अधिकृत यादी जाहीर करण्यात आली आहे. यात शिवसेनेचे मुख्य प्रवक्ते म्हणून खासदार संजय राऊत आणि खासदार अरविंद सावंत(Arvind Sawant) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मुख्य प्रवक्त्यांबरोबर अन्य प्रवक्त्यांची नावे जाहीर करण्यात आली आहे. त्यात खासदार प्रियंका चतुर्वैदी, परिवहन मंत्री अनिल परब, उपनेते सचिन अहिर, आमदार सुनील प्रभू, प्रताप सरनाईक, भास्कर जाधव, अंबादास दानवे, मनिषा कायंदे यांची नावे आहेत.
त्याचसोबत महापौर किशोरी पेडणेकर, नगरसेविका शीतल म्हात्रे, डॉ. शुभा राऊळ, किशोर कान्हेरे, संजना घाडी, आनंद दुबे यांच्याही नावाचा समावेश आहे. शिवसेनेच्या मध्यवर्ती कार्यालयातून ही नावे जाहीर करण्यात आली आहेत.