“शर्जिलवर कठोर कारवाई करावी ही सगळ्यांचीच इच्छा, पण इतकी आदळआपट करायची गरज नाही”

By प्रविण मरगळे | Published: February 4, 2021 07:27 AM2021-02-04T07:27:55+5:302021-02-04T07:31:17+5:30

कुणीतरी एक शर्जिल उस्मानी नावाचं कार्टं महाराष्ट्रात येऊन बरळलं आहे. हिंदुत्वाच्या नावाने त्याने जी भाषा वापरली आहे, ती महाराष्ट्र तरी सहन करणार नाही

Shiv Sena Target BJP & Devendra Fadnavis over Sharjeel usmani Controversy statement on Hindu | “शर्जिलवर कठोर कारवाई करावी ही सगळ्यांचीच इच्छा, पण इतकी आदळआपट करायची गरज नाही”

“शर्जिलवर कठोर कारवाई करावी ही सगळ्यांचीच इच्छा, पण इतकी आदळआपट करायची गरज नाही”

Next
ठळक मुद्देशर्जिलसारखे साप अलिगढच्या बिळातच काय, तर पाताळात लपून बसले तरी त्याला खेचून आणण्याची हिंमत महाराष्ट्र पोलिसांत आहे हे काय फडणवीस यांना माहीत नाही?शर्जिलच्या मुसक्या बांधून महाराष्ट्रात आणावे. शाब्बास देवेंद्रजी! आपण सरकारची ‘मन की बात’च जाहीर केलीत.हा जो कोणी शर्जिल हिंदुत्वावर शिंतोडे उडवून गेला त्यास पुण्यात आमंत्रित करणाऱ्यांवर सर्वप्रथम कठोर कारवाई केली पाहिजे.या शर्जिलसारख्या हिंदुत्वद्रोही घाणीचा उगम होतो कोठून? त्याचे धागेदोरे शेवटी योगी राज्यातच जातात.

मुंबई - शर्जिल नावाच्या बोकडास फरफटत महाराष्ट्रात आणावे व त्याच्यावर कठोर कारवाई करावी ही सगळय़ांचीच इच्छा आहे, पण इतकी आदळआपट करायची गरज नाही. हिंदुत्व रस्त्यावर पडले आहे काय, हा फडणवीसांचा प्रश्न योग्यच आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात तर नाहीच नाही, पण दिल्लीच्या सीमेवर हजारो शेतकरी ९० दिवसांपासून रस्त्यावर पडले आहेत. ते सर्व शेतकरी हिंदूच आहेत. त्या हिंदू, शीख शेतकऱयांना सन्मानाने घरी कधी पाठवणार ते सांगा असा टोला सामना अग्रलेखातू शिवसेनेने भाजपाला लगावला आहे.

तसेच शर्जिलसारखे कित्येक किडे-मकोडे आले व गेले. महाराष्ट्रात हिंदुत्वाचे एक पानही त्यांना खुडता आले नाही. समस्त हिंदू समाजाला अपमानित करणे हे निधर्मीपणाचे धंदे म्हणजे समाजाला लागलेला कलंक आहे. शर्जिलसारखे साप अलिगढच्या बिळातच काय, तर पाताळात लपून बसले तरी त्याला खेचून आणण्याची हिंमत महाराष्ट्र पोलिसांत आहे हे काय फडणवीस यांना माहीत नाही? तेसुद्धा कालपर्यंत राज्यकर्ते होतेच. त्यांच्या मनात तरी महाराष्ट्र पोलिसांच्या क्षमतेविषयी शंका असू नये. शर्जिलला बेडय़ा पडतीलच. निश्चिंत रहा! ठाकरे राज्यात हिंदूच काय, समाजातला प्रत्येक घटक सुरक्षित आहे. पण रस्त्यावर तीन महिन्यांपासून लढणाऱया हिंदू शेतकऱयांना तेवढा आधार द्या म्हणजे झाले असा चिमटाही शिवसेनेने काढला आहे.

सामना अग्रलेखातील महत्त्वाचे मुद्दे

कुणीतरी एक शर्जिल उस्मानी नावाचं कार्टं महाराष्ट्रात येऊन बरळलं आहे. हिंदुत्वाच्या नावाने त्याने जी भाषा वापरली आहे, ती महाराष्ट्र तरी सहन करणार नाही. ‘एल्गार’ नावाची एक टोळधाड पुण्यात जमा केली जाते. त्या व्यासपीठावरून फक्त भडकवाभडकवीच केली जाते. नाव एल्गार, पण वाजवायच्या हिंदुत्वविरोधी पिपाण्या.

तो कोणीएक शर्जिल उस्मानी तेथे आला व त्याने आपल्या देशातले हिंदुत्व कसे सडले आहे यावर प्रवचन झोडले. त्यावर भाजपाने आता आरोळय़ा ठोकायला सुरुवात केली आहे. हिंदुत्वासाठी रस्त्यावर येऊ असे त्यांनी जाहीर केले आहे. उस्मानी जे बरळला ते गंभीर आहे. हिंदुत्व रस्त्यावर पडले आहे काय, असा आतडी पिळवटून टाकणारा सवाल विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.

विरोधी पक्षनेते तळमळीने सांगतात, ‘‘एक युवक राज्यात येतो, छातीठोकपणे हिंदुत्वावर शिंतोडे उडवतो आणि डोक्यावर मिरे वाटून निघून जातो आणि त्यावर काहीही कारवाई होत नाही हा प्रकार अतिशय आश्चर्यजनक आहे, समस्त राज्याची चिंता वाढविणारा आहे आणि सर्वांच्या माना शरमेने खाली घालायला लावणारा आहे.’’ फडणवीस यांचं म्हणणे असे आहे की, शर्जिलच्या मुसक्या बांधून महाराष्ट्रात आणावे. शाब्बास देवेंद्रजी! आपण सरकारची ‘मन की बात’च जाहीर केलीत.

रस्त्यावरचा शेतकरी त्याच्या हक्कासाठी लढत आहे. आता त्याचे पाणी, विजेचे कनेक्शन कापले. त्याच्यासमोर खिळय़ांची बिछायत अंथरली. हा समस्त हिंदू शेतकऱयांचा सन्मान म्हणावा काय? या शेतकऱयांनी तर कोणताही गुन्हा केलेला नाही. भाजपा पुढाऱ्यांनी रस्त्यावरच्या या हिंदुत्वाची थोडी फिकीर केली तर बरे होईल.

हा जो कोणी शर्जिल हिंदुत्वावर शिंतोडे उडवून गेला त्यास पुण्यात आमंत्रित करणाऱ्यांवर सर्वप्रथम कठोर कारवाई केली पाहिजे. एल्गार परिषदेच्या निमित्ताने शर्जिलसारख्या कमअस्सल अवलादीचे लोक पुण्यात बोलवायचे व वातावरण बिघडवायचे, हीच त्यांची दुकानदारी आहे. शर्जिलसारख्या कमअस्सल अवलादीच्या बोकडांनी शिंतोडे उडवले म्हणून हिंदुत्वाचे तेज कमी होणार नाही, पण म्हातारी मेल्याचे दुःख नसून काळ सोकावत जातो.

महाराष्ट्रात शिवसेना आहेच. सरकारचे सूत्रधार ठाकरे आहेत. त्यामुळे कायदा आहे तसा हाती दंडुकाही आहेच. म्हणूनच हिंदुत्वावर वाकडेतिकडे हल्ले कोणीच सहन करणार नाही. पण सवाल हा आहे की, या शर्जिलसारख्या हिंदुत्वद्रोही घाणीचा उगम होतो कोठून? त्याचे धागेदोरे शेवटी योगी राज्यातच जातात.

हा शर्जिलही आता पळून उत्तर प्रदेशातील अलिगढला लपला आहे. महाराष्ट्राचे पोलीस अलिगढला जाऊन या शर्जिलच्या मुसक्या आवळतीलच, पण हिंदुत्वविरोधी कारवायांची फॅक्टरी ही उत्तरेत आहे व तेथून तयार झालेला माल देशभरात जात असतो. हिंदुत्व विरोधकांच्या मुसक्या महाराष्ट्र आवळेलच, पण थोडी जबाबदारी योगी राज्याचीसुद्धा आहे.

त्या पळून गेलेल्या व लपून बसलेल्या शर्जिलला महाराष्ट्र पोलिसांच्या हवाली करण्याची जबाबदारी त्यांची आहे व याकामी कोणी हस्तक्षेप करू नये. कारण महाराष्ट्राने एखाद्या गुन्हेगारावर कारवाई करावी व इतर राज्यांतील भाजप शासकांनी त्या गुन्हेगारांना विशेष सुरक्षा कवच बहाल करावे, असे प्रकार अलीकडे वारंवार घडू लागले आहेत. शर्जिललाही विशेष संरक्षण मिळणार नाही ना, ही शंका म्हणूनच आहे.

 

Web Title: Shiv Sena Target BJP & Devendra Fadnavis over Sharjeel usmani Controversy statement on Hindu

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.