...तर त्याची जबाबदारी विरोधी पक्ष घेणार आहे का?; भाजपाच्या 'घंटानाद'वर शिवसेनेचा घणाघात

By ऑनलाइन लोकमत | Published: August 31, 2020 07:24 AM2020-08-31T07:24:49+5:302020-08-31T07:26:34+5:30

मंदिरांतील देव जरी गाभाऱ्य़ात बंदिवान असला तरी यापैकी सर्वच धार्मिक संस्थांनी गेल्या अनेक महिन्यांपासून गोरगरीबांसाठी अन्नछत्र वगैरे राबवून लाखो लोकांचा ‘दुवा’ घेतला आहे. म्हणजे मंदिरांचे सेवाकार्य थांबलेले नाही.

Shiv Sena Target opposition Party & BJP over agitation of Demand for temple opening | ...तर त्याची जबाबदारी विरोधी पक्ष घेणार आहे का?; भाजपाच्या 'घंटानाद'वर शिवसेनेचा घणाघात

...तर त्याची जबाबदारी विरोधी पक्ष घेणार आहे का?; भाजपाच्या 'घंटानाद'वर शिवसेनेचा घणाघात

Next
ठळक मुद्देज्या ‘मनःशांती’चा उद्घोष विरोधी पक्षनेते करतात त्यांनी मनःशांतीचा खरा अर्थ समजून घेतला पाहिजेदोन वेळची चूल पेटवणे हीच लाखोंसाठी मनःशांती असतेलाखो कुटुंबांचे अर्थकारण चालावे म्हणून मंदिरे उघडायला हवीत. याविषयी दुमत असण्याचे कारण नाही

मुंबई - लोकांना मनःशांती व पोटशांती हे दोन्ही मंदिरांच्या माध्यमातून मिळायला हवी, पण कोरोनाचा स्फोट पुन्हा झालाच तर त्याची जबाबदारी विरोधी पक्ष घेणार आहे काय? धार्मिक स्थळे उघडल्यानंतर ‘फिजिकल डिस्टन्सिंग’ राबवायचे हे लोकांना कळते असे देवेंद्र फडणवीस सांगतात. पण भाजपतर्फे जे घंटानाद आंदोलन झाले त्याची छायाचित्रे पाहिल्यावर समजले या ‘डिस्टन्सिंग’ची कशी जोरदार काशी झाली आहे. त्यामुळे मंदिरे उघडण्याच्या प्रश्नी विरोधकांनी धसमुसळेपणा करण्याआधी महाराष्ट्राची स्थिती समजून घेतली पाहिजे अशा शब्दात सामना अग्रलेखातून शिवसेनेने भाजपाच्या घंटानाद आंदोलनावर टीकास्त्र सोडलं आहे.

ज्या ‘मनःशांती’चा उद्घोष राज्याचे विरोधी पक्षनेते करतात त्यांनी मनःशांतीचा खरा अर्थ समजून घेतला पाहिजे. मंदिरांची टाळी उघडायला हवीत, पण राजकीय मनःशांतीसाठी नकोत. आधी लोकांना जगवा, मग पुढचे पुढे! सत्तेपुढे शहाणपण चालत नाही असे म्हणण्याची प्रथा आहे, पण सध्याच्या काळात विरोधी पक्षांपुढे सत्तेचे शहाणपण चालत नाही, असे म्हणणे अधिक व्यावहारिक ठरेल. विरोधी पक्ष नावाचा प्राणी कधी कोणत्या प्रश्नी उधळेल ते सांगता येत नाही असा घणाघातही शिवसेनेने विरोधी पक्षावर केला आहे.

सामना अग्रलेखातील महत्त्वाचे मुद्दे

महाराष्ट्रातील प्रबळ विरोधी पक्षाने सर्वत्र घंटानाद केला. कुठे थाळीनाद केला. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या पाचेक महिन्यांपासून बंद असलेली राज्यभरातील मंदिरे उघडा या मागणीसाठीच हा घंटानाद होता. विरोधी पक्षाचे हे आंदोलन नक्की धार्मिक होते की राजकीय, असा प्रश्न आता निर्माण झाला आहे.

भाजपाच्या पाठोपाठ प्रकाश आंबेडकर यांनी पंढरपूरचे विठ्ठल-रखुमाई मंदिर उघडण्याचे आंदोलन सुरू केले आहे. तिकडे संभाजीनगरचे एमआयएमचे खासदार जलील मियांनी दोन सप्टेंबरनंतर मशिदीची टाळी उघडण्याची घोषणा केली आहे. जलील यांनी मशिदी उघडण्याची बांग दिली म्हणून भाजप पुढाऱ्य़ांनी राज्याच्या आरोग्याचा विचार न करता ‘घंटा’ वाजवणे हे बरे नाही.

मुळात सर्वच धर्मीयांची प्रार्थनास्थळे का बंद करावी लागली? देवांना बंदिवान का व्हावे लागले? याचा सारासार विचार करून याप्रश्नी विरोधकांनी मतप्रदर्शन करणे गरजेचे आहे. जेथे जेथे शाळा आणि प्रार्थनास्थळे उघडली तेथे कोरोनाचे संक्रमण वाढले हे सत्य आहे.

तिरुपती बालाजी मंदिरात याचा फटका बसलाच आहे. प्रत्यक्ष राममंदिर भूमिपूजन सोहोळ्यानंतर मुख्य महंतांसह अनेकांना लागण झाली. देशाचे गृहमंत्री अमित शहा हे कोरोनाच्या विळख्यात सापडले व त्यांच्यावर पांढऱ्य़ा कपड्यांतील देवदूत उपचाराची शर्थ करीत आहेत. इस्पितळं, कोविड सेंटर्स, आरोग्य यंत्रणा सध्या देवाचे काम करीत आहेत.

गर्दी व त्यातून वाढणारा संसर्ग टाळण्यासाठीच मंदिराचे दरवाजे बंद आहेत, पण इस्पितळांत गर्दी आहे. मंदिर हे  प्रार्थनेचे स्थळ आहे. तेथे मानसिक आधार, मनःशांती मिळते म्हणून मंदिरांची कुलुपे उघडा अशी विरोधी पक्षांची मागणी आहे, पण मंदिरे तसेच इतर सर्वधर्मीय प्रार्थनास्थळे ही अर्थकारणाची, उपजीविकेची साधने आहेत व लाखो कुटुंबांच्या पोटापाण्याची ही ‘रचना’ देवादिकांनीच केली आहे.

सिद्धिविनायक, तुळजापूर, महालक्ष्मी, शिर्डी, माहुर, भद्रा मारुती, अष्टविनायक, शनिशिंगणापूर, शेगावचे गजानन महाराज ही महत्त्वाची मंदिरे म्हणजे धर्म व पर्यटनाचा पवित्र संगम आहे. मंदिराबाहेरचे अनेक पूजा सामान, खण, नारळ, ओटी, हार-फुले, प्रसादाची दुकाने लाखो कुटुंबांची चूल पेटवत आहेत.

वारकरी संप्रदायाचे अनेक कीर्तनकार, प्रवचनकार देशभरात फिरून आध्यात्मिक संवाद साधतात. त्यांच्या सोबत मृदंग, तबलजी, पेटीवालेसुद्धा त्याच आधाराने उपजीविकेचे साधन म्हणून अध्यात्माचे दूत म्हणून काम करतात व त्यात काहीच चुकीचे नाही. त्यामुळे फक्त मनःशांतीच नव्हे, तर लाखो कुटुंबांचे अर्थकारण चालावे म्हणून मंदिरे उघडायला हवीत. याविषयी दुमत असण्याचे कारण नाही.

कोरोनामुळे अमरनाथ, वैष्णोदेवीची यात्रा झाली नाही. त्याचा आर्थिक फटका कश्मीर खोऱ्य़ातील असंख्य कुटुंबांना बसलाच आहे. दुसरे असे की, मंदिरांतील देव जरी गाभाऱ्य़ात बंदिवान असला तरी यापैकी सर्वच धार्मिक संस्थांनी गेल्या अनेक महिन्यांपासून गोरगरीबांसाठी अन्नछत्र वगैरे राबवून लाखो लोकांचा ‘दुवा’ घेतला आहे. म्हणजे मंदिरांचे सेवाकार्य थांबलेले नाही.

लालबागचा राजाने मूर्तीची प्रतिष्ठापना केली नाही, पण आरोग्य महायज्ञ करून नवी परंपरा सुरू केली. लोकांना मनःशांती व पोटशांती हे दोन्ही मंदिरांच्या माध्यमातून मिळायला हवी

ज्या ‘मनःशांती’चा उद्घोष राज्याचे विरोधी पक्षनेते करतात त्यांनी मनःशांतीचा खरा अर्थ समजून घेतला पाहिजे. मनःशांतीचा मार्ग त्यागातून जात असतो. मनःशांती ही महात्मा गौतम बुद्ध, वर्धमान महावीर, स्वामी विवेकानंद यांच्यासाठी असते, गौतम बुद्धाने मनःशांतीसाठी राज्याचा त्याग तर केलाच, परंतु कठोर साधनादेखील केली. असा त्याग सध्याचे राजकारणी करणार आहेत काय?

दोन वेळची चूल पेटवणे हीच लाखोंसाठी मनःशांती असते, तर अनेकांना राजकीय खुर्चीप्राप्ती हाच मनःशांतीचा मार्ग वाटतो. क्रांतिवीर मदनलाल धिंग्रा यांना फासावर जाण्यापूर्वी मनःशांती प्राप्त झाली होती. वीर बाजीप्रभू देशपांडे यांना पाच तोफांचे आवाज ऐकून कमालीची मनःशांती मिळाली होती. मनःशांती राष्ट्रीय, धार्मिक व सामाजिक कार्यातही असते. मंदिरांची टाळी उघडायला हवीत, पण राजकीय मनःशांतीसाठी नकोत.

Read in English

Web Title: Shiv Sena Target opposition Party & BJP over agitation of Demand for temple opening

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.