“…पण शेतकरी आंदोलन बदनाम करण्यासाठीच तिरंगा अपमानाचे कुभांड रचले हे उघड झाले”

By प्रविण मरगळे | Published: February 3, 2021 07:35 AM2021-02-03T07:35:51+5:302021-02-03T07:38:56+5:30

न घडलेल्या अपमानावर काहूर माजवणे हासुद्धा तिरंग्याचा अपमान आहे. पण बोलायचे कोणी? असा सवाल शिवसेनेने उपस्थित केला आहे.

Shiv Sena Target PM Narendra Modi & BJP Over Farmers Protest in Red fort at Delhi | “…पण शेतकरी आंदोलन बदनाम करण्यासाठीच तिरंगा अपमानाचे कुभांड रचले हे उघड झाले”

“…पण शेतकरी आंदोलन बदनाम करण्यासाठीच तिरंगा अपमानाचे कुभांड रचले हे उघड झाले”

Next
ठळक मुद्देशेतकऱ्यांची लढाई स्वाभिमानाची आहे. तिरंगा हा स्वाभिमान आणि राष्ट्राभिमानाचे प्रतीक आहे हे खरेचसरकारला तिरंग्याच्या अपमानाची चिंता वाटणे ही गर्वाचीच गोष्ट आहे. पण तिरंग्याचा तथाकथित अपमान फक्त आंदोलक शेतकऱ्यांनीच केला आहे काय?चिनी सैन्य आमच्या हद्दीत घुसून बसले हादेखील तिरंग्याचाच अपमान आहे साहेब! लाल किल्ल्यावर तिरंगा फडकतोच आहे. शेतकऱ्यांच्या मुळावर आलेले तीन कृषी कायदे रद्द करा व तिरंग्याचाच मान राखा असे सांगणे व त्यासाठी आंदोलन करणे हा गुन्हा नाही!

मुंबई – सरकार कोणत्याही पक्षाचे असो, पंतप्रधानपदावर कोणीही विराजमान असो, तिरंग्याचे रक्षण करणे हे त्याचे प्रथम कर्तव्य ठरते. म्हणूनच नरेंद्र मोदी यांच्या भावना त्यादृष्टीने महत्त्वाच्या आहेत. पण २६ जानेवारीस म्हणजे प्रजासत्ताकदिनी लाल किल्ल्यावर घडलेल्या प्रसंगाचा जो राजकीय धुरळा उडवला जात आहे तो कितपत योग्य आहे? साठ दिवसांपासून आंदोलन करणाऱ्या शेतकऱयांचा एक गट त्या दिवशी लाल किल्ल्यावर घुसला. त्यांनी हडकंप माजवला. त्यात तिरंग्याचा अपमान झाल्याचा प्रचार भाजप सायबर फौजांनी केला. तो अपप्रचारच ठरला. जे चित्रीकरण समोर आले त्यात तिरंग्याचा अपमान वगैरे झाल्याचे कुठेच दिसत नाही. तिरंगा लाल किल्ल्यावर डौलाने फडकतच होता, पण शेतकरी आंदोलन बदनाम करण्यासाठीच तिरंगा अपमानाचे कुभांड रचले हे उघड झाले असा आरोप सामना अग्रलेखातून शिवसेनेने भाजपावर केला आहे.

तसेच श्रीनगरमधील लाल चौकात तिरंगा फडकविण्यासाठी भाजपचे ज्येष्ठ नेते मुरलीमनोहर जोशी यांनी ‘भारत जोडो’ यात्रा काढली होती. त्याचे सारथ्य करणारे नरेंद्र मोदी आज देशाचे पंतप्रधान आहेत. अतिरेक्यांच्या गोळ्यांची, बॉम्बची पर्वा न करता श्रीनगरच्या लाल चौकात तिरंगा फडकविणारे नरेंद्र मोदीच होते. तिरंग्याविषयीच्या त्यांच्या भावना ज्वलंत आहेत. त्यामुळे मोदी यांच्या भावना या महत्त्वाच्या आहेत. मूळ मुद्दा इतकाच की, लाल किल्ल्यावर तिरंग्याचा तथाकथित अपमान करणाऱ्यांचे धागेदोरे नक्की कोठपर्यंत पोहोचले आहेत ते समोर आणा. दुसरे असे की, न घडलेल्या अपमानावर काहूर माजवणे हासुद्धा तिरंग्याचा अपमान आहे. पण बोलायचे कोणी? असा सवाल शिवसेनेने उपस्थित केला आहे.

सामना अग्रलेखातील महत्त्वाचे मुद्दे

लाल किल्ल्यावर शेतकऱयांच्या एका गटाने गोंधळ घातला. त्यात जो तिरंग्याचा अपमान झाला त्यामुळे आपले प्रिय पंतप्रधान मोदी अत्यंत दुःखी झाले आहेत. ‘मन की बात’ कार्यक्रमात पंतप्रधानांनी त्यांचे मन मोकळे केले. ‘२६ जानेवारी रोजी तिरंग्याचा अपमान झाला. त्यामुळे देश दुःखी झाला’, अशा शब्दांत पंतप्रधानांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या.

पंतप्रधानांचे असे म्हणणे असेल तर ते योग्यच आहे. देशातल्या सवाशे कोटी नागरिकांच्या भावना याच आहेत. तिरंग्याचा सन्मान हाच राष्ट्राचा सन्मान असतो. सीमेवर तैनात सुरक्षा दलाचे बजेट या वर्षी 7.1 टक्क्यांनी वाढवले आहे. सीमा सुरक्षा दल, केंद्रीय राखीव पोलीस दल, हिंदुस्थान-तिबेट सीमा पोलीस दलासाठी नव्या अर्थसंकल्पात 1 लाख तीन हजार 803.52 कोटी रुपयांची विशेष तरतूद करण्यात आली, ती फक्त तिरंग्याचा सन्मान करण्यासाठीच.

तिरंगा आम्हाला ‘जान से प्यारा’ आहे. भाजपच्या सायबर टोळधाडीस तिरंगा जितका प्यारा आहे त्यापेक्षा जास्त तो गाझीपूरच्या आंदोलक शेतकऱ्यांना प्यारा आहे. तिरंगा अपमानित करून कोणतेही आंदोलन चालणार नाही. प्रश्न इतकाच आहे, जो अपमान झालाय असे दिसत नाही त्यावर पंतप्रधानांनी इतके व्यथित का व्हावे किंवा सत्ताधारी पक्षाने इतकी आदळआपट का करावी?

पंतप्रधान मोदी यांच्या भावना देशाला समजल्या आहेत व आता आंदोलक शेतकऱ्यांचे म्हणणे ऐकून घ्या, इतकेच मागणे आहे. शेतकऱ्यांच्या मुळावर आलेले तीन कृषी कायदे रद्द करा व तिरंग्याचाच मान राखा असे सांगणे व त्यासाठी आंदोलन करणे हा गुन्हा नाही! हातात व ट्रक्टरवर तिरंगा लावूनच शेतकरी त्यांच्या प्रश्नांसाठी लढतो आहे.

शेतकऱ्यांना रस्त्यावर तडफडून मरू देणे हा तर तिरंग्याचा भयंकर अपमान आहे. तिरंग्याच्या रक्षणासाठी जवानांची फौज सीमेवर प्राणांची बाजी लावत आहे. त्यात पंजाबच्या शेतकऱयांची पोरे मोठय़ा प्रमाणावर आहेत. त्यांचे बळी घेऊन तिरंग्याचा काय सन्मान राखणार आहात?

निर्मला सीतारामन यांनी सोमवारी संसदेत अर्थसंकल्प सादर केला. त्या अर्थसंकल्पाच्या हृदयात गाव आणि शेतकरी असल्याचे पंतप्रधान मोदी यांनी सांगितले. हे टाळीचे वाक्य आहे, पण गाझीपूर सीमेवर आंदोलन करणारे लाखो शेतकरी तुमच्या मनमंदिरात आहेत की नाहीत?

शेतकऱ्यांची लढाई स्वाभिमानाची आहे. तिरंगा हा स्वाभिमान आणि राष्ट्राभिमानाचे प्रतीक आहे हे खरेच, पण शेतकऱ्यांना पोलिसी दंडुक्याने चिरडणे हा तिरंग्याचा अपमान आहे हेदेखील तेवढेच खरे. सरकारला तिरंग्याच्या अपमानाची चिंता वाटणे ही गर्वाचीच गोष्ट आहे. पण तिरंग्याचा तथाकथित अपमान फक्त आंदोलक शेतकऱ्यांनीच केला आहे काय?

शेतकऱ्यांचे आंदोलन संपविण्यासाठी पोलिसांच्या सशस्त्र फौजा उभ्या केल्या गेल्या आहेत. लोखंडी कठडे उभे करण्यात आले आहेत. डांबरी रस्त्यांवर खिळे मारून ठेवले आहेत. शेतकऱयांनी दिल्लीत पुन्हा येऊ नये म्हणून काय हा कडेकोट बंदोबस्त! हे सर्व कठोर प्रयोग लडाखच्या सीमेवर केले असते तर चीनचे सैन्य आमच्या हद्दीत घुसून आपल्या बापाचीच जमीन असल्यासारखे बसून राहिले नसते.

चिनी सैन्य आमच्या हद्दीत घुसून बसले हादेखील तिरंग्याचाच अपमान आहे साहेब! लाल किल्ल्यावर तिरंगा फडकतोच आहे. गाझीपूरच्या शेतकरी आंदोलनातील प्रत्येक तंबूवर आणि टॅक्टरवरही तिरंगाच फडकतो आहे, पण चिनी सैन्याने आमची जमीन बळकावून तेथे त्यांचे लाल निशाण फडकवले हे कसे सहन करावे?

तिरंग्याचा हा अपमान जनतेचे मन दुःखी करीत आहे. राष्ट्रीयत्वाची व्याख्या सगळय़ांसाठी एकच आहे. देशाचे संविधान आणि तिरंगा ध्वज यासाठी आतापर्यंत लढाया झाल्या. अमित शहा यांनी जम्मू-कश्मीरमधील 370 कलमाचा मुडदा पाडला तो तिरंगा तेथे डौलाने फडकावा म्हणूनच.

 

Web Title: Shiv Sena Target PM Narendra Modi & BJP Over Farmers Protest in Red fort at Delhi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.