“सुशांत सिंह राजपूत प्रकरणी शिवसेनेची नाहक बदनामी झाली, त्याची भरपाई कोण करणार?”
By प्रविण मरगळे | Published: September 28, 2020 03:12 PM2020-09-28T15:12:38+5:302020-09-28T15:14:58+5:30
शरद पवार महाविकास आघाडीचे मार्गदर्शक आहेत, ते नेहमी मुख्यमंत्र्यांना भेटत असतात. राज्यासमोर जे प्रश्न येतात त्याबद्दल त्यांची भेट होत असतेच असा खुलासाही अनिल परब यांनी केला आहे.
मुंबई – विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना नेते संजय राऊत यांच्या भेटीनंतर राज्यात राजकीय हालचालींना वेग आला आहे. या भेटीनंतर रविवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी वर्षा निवासस्थानी जाऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची भेट घेतली, त्यानंतर आज शिवसेना आमदारांसोबत मुख्यमंत्र्यांनी चर्चा केली, फडणवीस-राऊत भेट, शरद पवार-मुख्यमंत्री भेट आणि आता शिवसेना आमदारांसोबत चर्चा यामुळे राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आलं आहे.
या भेटीबाबत शिवसेना मंत्री अनिल परब म्हणाले की, शिवसेनेच्या आमदारांशी नव्हे तर टप्प्याटप्प्याने महाविकास आघाडीच्या सर्व आमदारांशी मुख्यमंत्री बोलणार आहेत, कोणत्या कामाला प्राधान्य दिलं पाहिजे, आश्वासनं कशी पूर्ण करायची, आमदारांशी बोलून त्यांच्या मतदारसंघातील प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करायचे आहेत, आमचा वचननामा आहे तो पूर्ण करण्याच्या दृष्टीकोनातून मुख्यमंत्री आमदारांशी चर्चा करत आहेत. महाराष्ट्रासमोरील प्रश्न जाणून तो सोडवण्याबाबत मुख्यमंत्री प्रयत्नशील आहेत असं त्यांनी सांगितले आहे.
तसेच सामना शिवसेनेचं मुखपत्र असलं तरी कोणत्याही पक्षाची बातमी त्यात लागू शकते, कोणाची मुलाखत घ्यायची हा संपादकांचा अधिकार आहे. फडणवीस भेटीबाबत दोन्ही नेत्यांनी खुलासा केला आहे. महाविकास आघाडीत कुठेही अस्वस्थता नाही, शरद पवार महाविकास आघाडीचे मार्गदर्शक आहेत, ते नेहमी मुख्यमंत्र्यांना भेटत असतात. राज्यासमोर जे प्रश्न येतात त्याबद्दल त्यांची भेट होत असतेच असा खुलासाही अनिल परब यांनी केला आहे.
कोणाला किती महत्त्व द्यायचं हे विचार करण्याची वेळ
बिहारचे माजी डीजीपी समोर स्क्रिप्ट दिली होती ते वाचत होते, त्यांना जे लिहून दिलं होतं ते वाचत होते, त्यातून त्यांची पुढची पाऊले दिसत होती, आता त्यांनी राजकारणात प्रवेश केला आहे. जेव्हा शिवसेना महाराष्ट्र पोलिसांवर विश्वास दाखवत होती तेव्हा हे सगळे सीबीआयला उचलून धरत होते. सुशांत प्रकरण, बॉलिवूड ड्रग्समध्ये २४ तास मीडियाचं सुरु आहे जसं यांनी देशासाठी मोठं योगदान दिलं आहे. कोणाला किती महत्त्व द्यायचं हे विचार करण्याची वेळ आली आहे.
शिवसेनेची नाहक बदनामी झाली त्याची भरपाई कोण देणार?
सुशांत सिंह राजपूत प्रकरणात तो ड्रग्स घ्यायचा हे सगळ्यांच्या समोर आलं आहे. दिल्लीची टीम मुंबईत आली तरी काय साध्य झालं? या प्रकरणात जे नेते छाती बडवून घेत होते ते आता कुठे गेले? सुशांत प्रकरणात शिवसेनेची नाहक बदनामी केली गेली, त्याची भरपाई कोण करणार? असा सवालही शिवसेना मंत्री अनिल परब यांनी विचारत भाजपावर अप्रत्यक्षपणे निशाणा साधला आहे.
मुख्यमंत्र्यांनाही ‘त्या’ भेटीची कल्पना - राऊत
देवेंद्र फडणवीस यांच्यासोबतची ती भेट गुप्त नव्हती. शिवेसेनेत गुप्त बैठका वगैरे होत नाहीत. मुलाखतीबाबत ती भेट होती. त्याचे वेगळे अर्थ काढण्याचे कारण नाही. राजकारणात आम्ही वैयक्तिक शत्रुत्व मानत नाही, असे सांगतानाच या भेटीबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना कल्पना होती, असा दावा खा. संजय राऊत यांनी केला.
आदित्यला अडचणीत आणणाऱ्यांसोबत जायचे कशाला?; शिवसेनेतील सूर
ज्या शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे यांना भाजप नेत्यांनी अडचणीत आणले, मुख्यमंत्री ठाकरे घरी बसून काम करतात, अशी टीका केली; त्यांच्यासोबत सत्तेत जायचे कशाला, असा सूर शिवसेनेत दिसत आहे.