शिवसेना भाजपाला मोठा धक्का देणार, दोन मोठे नेते संजय राऊत यांच्या उपस्थितीत हाती शिवबंधन बांधणार
By बाळकृष्ण परब | Published: January 5, 2021 06:12 PM2021-01-05T18:12:06+5:302021-01-05T18:12:59+5:30
Nashik POlitics News : एकेकाळचे मित्र असलेले शिवसेना आणि भाजपा सध्या विविध मुद्द्यांवरून आमने-सामने आलेले आहेत. त्यातच आता शिवसेनेने भाजपाला मोठा धक्का देण्याची तयारी केली आहे.
नाशिक - एकेकाळचे मित्र असलेले शिवसेना आणि भाजपा सध्या विविध मुद्द्यांवरून आमने-सामने आलेले आहेत. त्यातच आता शिवसेनेने भाजपाला मोठा धक्का देण्याची तयारी केली आहे. काही दिवसांपूर्वी बाळासाहेब सानप यांना आपल्या गोटात खेचून भाजपाने शिवसेनेची कोंडी केल्यानंतर आता शिवसेनेनेही भाजपाच्या दोन नेत्यांना आपल्याकडे वळवण्यात यश मिळवले आहे. शिवसेना नेते संजय राऊत यांच्या उपस्थितीत भाजपाचे दोन नेते गुरुवारी हाती शिवबंधन बांधण्याची शक्यता आहे.
शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत गुरुवारी नाशिकच्या दौऱ्यावर येणार आहेत. त्या दौऱ्यामध्ये भाजपाचे दोन नेते शिवसेनेत दाखल होणार आहेत. मात्र हाती शिवबंधन बांधण्याच्या तयारीत असलेले भाजपाचे हे नेते कोण आहेत, हे मात्र अद्याप समोर आलेले नाही.
काही दिवसांपूर्वी भाजपाने माजी आमदार बाळासाहेब सानप यांना शिवसेनेमधून आपल्या पक्षात आणले होते. त्यामुळे नाशिकमध्ये शिवसेनेला धक्का बसला होता. मात्र बाळासाहेब सानप यांचा भाजपाप्रवेश पक्षातील अनेकांना रुचला नव्हता. त्यामुळे अनेकांनी सानप यांना पक्षात प्रवेश देऊ नये अशी विनंती केली होती. मात्र हा विरोध डावलून सानप यांनी पक्षात प्रवेश दिला गेला होता. त्यामुळे भाजपातील अनेक जण नाराज आहेत.
आता याच नाराजीचा फायदा उठवण्याचा प्रयत्न शिवसेनेकडून करण्यात येत आहे. आता शिवसेना आणि संजय राऊत भाजपाला केवढा मोठा धक्का देतात याचा उलगडा होण्यासाठी अजून दोन दिवस प्रतीक्षा करावी लागणार आहे.