वर्षभरापूर्वी तुम्हाला ‘धुतले’ ते काय कमी झाले? शिवसेनेचा भाजपावर कडवा वार
By ऑनलाइन लोकमत | Published: November 23, 2020 09:19 AM2020-11-23T09:19:42+5:302020-11-23T09:20:42+5:30
Corona Virus Samana Editorial: भाजपचे अनेक खासदार व केंद्रीय मंत्री कोविडने आजारी पडले. एक केंद्रीय मंत्री सुरेश आंगडिया तर कोरोनाचे बळी ठरले. रामविलास पासवानही गेले. अनेक खासदार कोरोनाग्रस्त झाले. याची जबाबदारी कोणी घ्यायची? असा सवाल सामनाच्या अग्रलेखातून केला आहे.
मुंबईवर शुद्ध भगवा फडकवण्याच्या नादात ‘भाजप’ कोरोनाचा प्रसार वाढवत आहे. जागतिक आरोग्य संघटनेचे वगैरे एकवेळ सोडून द्या, पण पंतप्रधान मोदी यांनीही गर्दीचे प्रसंग टाळा. सोशल डिस्टन्सिंगचे भान राखा, असे आवाहन वारंवार केले आहे. पण पं. बंगाल व महाराष्ट्राच्या बाबतीत पंतप्रधान मोदींचे ऐकायचेच नाही असा विडा उचलून भाजपाई रस्त्यावर उतरत आहेत. या अतिरेकी वागण्यांमुळे आपण ‘कोरोना’चा प्रसार वाढवीत आहोत व लोकांच्या जिवाशी खेळत आहोत. आताही भाजपतर्फे मुंबई-महाराष्ट्रात वाढीव वीज बिलांसंदर्भात आंदोलन केले. गर्दी, दाटीवाटी करून या मंडळींनी सरकारच्या नावे शिमगा करून स्वतःचा कंडू शमवून घेतला हे खरे, अशी टीका शिवसेनेचे मुखपत्र सामनामधून करण्यात आली आहे.
कोरोनाची दुसरी ‘लाट’ येत आहे, पण भाजपला वाटत आहे ही लाट त्यांच्या राजकीय विचारांची आहे. त्याच लाटेवर शिडी लावून मुंबई पालिकेवरील भगवा उतरवू. आम्ही म्हणतो ठीक आहे. तुमचे राजकारण तुमच्यापाशी, पण त्यासाठी लोकांना कोरोनाच्या खाईत का ढकलता? असा सवाल भाजपाला करण्यात आला आहे.
देशाची राजधानी हे फक्त अरविंद केजरीवाल यांच्या ‘आप’चे राज्य नाही. ती देशाची राजधानी आहे. त्यामुळे केजरीवाल सरकारला कोरोना नियंत्रणासाठी सर्वतोपरी मदत करणे हे केंद्र सरकारचे कर्तव्यच आहे. भाजपचे अनेक खासदार व केंद्रीय मंत्री कोविडने आजारी पडले. एक केंद्रीय मंत्री सुरेश आंगडिया तर कोरोनाचे बळी ठरले. रामविलास पासवानही गेले. अनेक खासदार कोरोनाग्रस्त झाले. याची जबाबदारी कोणी घ्यायची? गुजरात, हरयाणा, राजस्थान, मणिपूर या चार राज्यांत केंद्राने कोविड पाहणीसंदर्भात खास पथके तैनात केली. याचा अर्थ या राज्यातील स्थिती चांगली नाही. महाराष्ट्राने स्थिती नियंत्रणात आणली तर विरोधी पक्षाचे एकच तुणतुणे वाजत आहे, हे उघडा आणि ते उघडा. म्हणजे कोरोनाची महामारी पसरू द्या व त्याचे खापर सरकारवर फोडून आत्म्यास थंडक पोहोचू द्या, असा आरोप शिवसेनेने केला आहे.
महाराष्ट्रातील काही चवली-पावलीचे उपरे भाजप नेते प्रश्न विचारतात की, ‘‘हात धुवा, असे सांगण्याशिवाय महाराष्ट्र सरकारने काय केले?’’ त्यांना उत्तर असे की, वर्षभरापूर्वी तुम्हाला ‘धुतले’ ते काय कमी झाले. आता जनता हात धूत आहे. मास्क लावत आहे. तुम्हाला तुमचे काही धुता येत नसेल तर लोकांची शिस्त का बिघडवता? ‘कोरोना महामारीचे संकट चीनमधून आले हा समज खोटा आहे. कोरोना महामारीचे बाप आपल्या आसपास वावरत आहेत. आपल्या पंतप्रधानांचे तरी ऐका असे सांगणे हा सुद्धा अपराध ठरतोय. कारण पंतप्रधान फक्त भाजपचे किंवा भाजपशासित प्रदेशांचे असा नवा पायंडा या मंडळींनी पाडला आहे. तो लोकशाही, स्वातंत्र्य व हिंदुस्थानच्या संघराज्यास घातक आहे. देशात महागाई, आर्थिक मंदी, बेरोजगार, कश्मीरातील रक्तपात, चीनची लडाखमधील घुसखोरी असे अनेक चिंतेचे विषय आहेत. त्यावरील लक्ष हटविण्यासाठी शुद्ध भगवा व कोरोना महामारीसारखे विषय वाढवले जात आहेत काय? असा सवालही करण्यात आला आहे.