Narayan Rane: नारायण राणेंच्या निषेधार्थ शिवसेनेचा जुहूमध्ये राडा; महिलांकडून पोलिसांना धक्काबुक्की
By ऑनलाइन लोकमत | Published: August 25, 2021 07:41 AM2021-08-25T07:41:21+5:302021-08-25T07:41:39+5:30
Narayan Rane: सांताक्रुझ पश्चिमेच्या जुहू तारा रोड येथील राणेंच्या बंगल्याजवळ मंगळवारी सकाळी अकरा वाजल्यापासून युवासेनेसह शिवसैनिकांनी गर्दी करण्यास सुरुवात केली होती. ‘नारायण राणे, कोंबडी चोर’ अशा घोषणा देत हातात कोंबड्या घेऊन राणेंच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली.
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विरोधात केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यानंतर मंगळवारी राणेंच्या जुहूतील निवासस्थानाजवळ शिवसैनिकांनी राडा केला. यावेळी महिला शिवसैनिकांकडून पोलिसांना धक्काबुक्की करत राणेंच्या निवासस्थानी जाण्यासाठी बॅरिकेटस देखील हटविण्याच्या प्रयत्न झाला. यावेळी दोन पोलीस जखमी झाले. सहपोलीस आयुक्त (कायदा सुव्यवस्था) विश्वास नांगरे-पाटील यांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली.
सांताक्रुझ पश्चिमेच्या जुहू तारा रोड येथील राणेंच्या बंगल्याजवळ मंगळवारी सकाळी अकरा वाजल्यापासून युवासेनेसह शिवसैनिकांनी गर्दी करण्यास सुरुवात केली होती. ‘नारायण राणे, कोंबडी चोर’ अशा घोषणा देत हातात कोंबड्या घेऊन राणेंच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. जवळपास पाचशे ते सहाशे कार्यकर्ते त्याठिकाणी जमा झाले होते. त्यामुळे जुहूत कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. तर भाजपचे जवळपास शंभर समर्थक हे राणेंच्या निवासस्थानी हजर होते. शिवसैनिकांना रोखण्यासाठी पोलीस सतत त्यांची समजूत काढताना दिसत होते. मात्र त्यांचे काहीही न ऐकता बॅरिकेटस बाजूला करत राणेंच्या निवासस्थानी पोहोचण्याचा प्रयत्न शिवसैनिक करत होते. त्यांना पोलिसांनी अडविल्यावर महिला कार्यकर्त्या हातात झेंडे घेऊन पुढे आल्या. त्यांनी पोलिसांना धक्काबुक्कीही करण्यास सुरुवात केली. या दरम्यान जवळपास दहा कार्यकर्ते जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी कूपर रुग्णालयात दाखल करण्यात आले. तर दोन पोलिसांनाही दुखापत झाल्याचे नांगरे पाटील यांनी सांगितले.
अखेर दुपारी दीड ते दोनच्या सुमारास विनंती केल्यावर शिवसैनिक माघारी फिरू लागले आणि तणाव निवळला. शिवसेना विभाग क्रमांक १ तर्फेही परिमंडळ १२ चे पोलीस उपायुक्त डॉ. डी. एस. स्वामी यांच्याकडे राणेंच्या विरोधात निवेदन देण्यात आले. तर, दिंडोशी येथेही शिवसैनिकांनी घोषणाबाजी करत मालाड पूर्व परिसरातील रस्ता बंद केला.
गोरेगावात ‘जोडे मारो’
गोरेगाव येथे शिवसेनेने नारायण राणे यांच्या विरोधात मोतीलाल नगर, शिवसेना शाखेसमोर आंदोलन केले. राणेंच्या प्रतिमेला शिवसैनिकांनी जोडे मारत दहन केले. यावेळी ३० ते ३५ कोंबड्या सोडून ‘कोंबडी चोर’ अशा घोषणा दिल्या.
दिंडोशीत शिवसेनेचे आंदोलन
शिवसेना विभाग क्रमांक ३च्या वतीने आमदार सुनील प्रभू यांच्या नेतृत्वाखाली दिंडोशी, मालाड पूर्व कुरार येथे नारायण राणे यांच्या विरोधात मंगळवारी निदर्शने करण्यात आली. घोषणाबाजी करत कुरार येथील रस्ता बंद केला.