...तर त्या अवदसेचे थडगे मुंबईची जनता बांधून त्यावरही भगवा फडकवेल

By बाळकृष्ण परब | Published: November 20, 2020 08:15 AM2020-11-20T08:15:42+5:302020-11-20T08:20:46+5:30

Mumbai Municipal Corporation News : मुंबई महानगरपालिकेवरील भगव्यास हात घालू असे सांगणे म्हणजे मराठी माणसाचे मुंबईशी नाते तोडण्यासारखे आहे. भगवा उतरवणे म्हणजे मुंबई पुन्हा भांडवलदारांच्या घशात घालून मराठी माणूस, श्रमिक, मजुरांना गुलाम करण्यासारखेच आहे.

Shiv Sena's harsh criticism on BJP in the Editorial of the Saamana | ...तर त्या अवदसेचे थडगे मुंबईची जनता बांधून त्यावरही भगवा फडकवेल

...तर त्या अवदसेचे थडगे मुंबईची जनता बांधून त्यावरही भगवा फडकवेल

Next
ठळक मुद्देभाजपा शिवसेनेसोबत नव्हता तेव्हापासून मुंबईवर भगवा फडकलेलाच आहेआता भाजपामध्ये कुणी प्रतिशिवाजी निर्माण झाले असतील आणि त्यांनी त्यांचा स्वतंत्र भगवा निर्माण केला असेल तर तो त्यांचा प्रश्नमुंबईवरील भगवा उतरवण्याचे स्वप्न ज्यांनी पाहिले ते राजकारण आणि सार्वजनिक जीवनातून कायमचे नेस्तनाबूत झाले

मुंबई - मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीला अद्याप सव्वा वर्षाचा अवधी आहे. मात्र मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीचे नियोजन भाजपाने सुरू केल्याचे वृत्त आल्यापासून या निवडणुकीचा विषय राजकीय वर्तुळात ऐरणीवर आला आहे. त्यातच पुढील निवडणुकीत मुंबई महानगरपालिकेमध्ये एकहाती बहुमत मिळवण्याची घोषणा भाजपा नेत्यांनी केल्यानंतर आज शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनामधून त्याला चोख प्रत्युत्तर देण्यात आले आहे. मुंबई महानगरपालिकेवरील भगवा उतरवण्याची अवदसा कुणाला आठवली असेल तर त्या अवदसेचे थडगे मुंबईची जनता बांधून त्यावरही भगवा फडकवेल. भगव्याला हात लावाल तर जळून खाक व्हाल, असा इशारा सामनामधून भाजपाला देण्यात आला आहे.

सामनाच्या आजच्या अग्रलेखात म्हटले आहे की, मुंबई जिंकण्याचा चंग भारतीय जनता पक्षाने बांधला आहे. भाजपाने असे ठरवले आहे की, यावेळी मुंबई महानगरपालिकेवर शुद्ध भगवा फडकवायचा आता हा शुद्ध भगवा म्हणजे काय प्रकार आहे. बेशुद्ध अवस्थेत केलेले हे विधान आहे. बिहारच्या निवडणुका भाजपाने जिंकल्या. त्या जिंकताना काय घाम फुटला हे देशाने पाहिले आहे. भाजपा शिवसेनेसोबत नव्हता तेव्हापासून मुंबईवर भगवा फडकलेलाच आहे. हा भगवा शुद्ध, तेजस्वी आणि प्रभावी आहे. यापेक्षा वेगळा भगवा अस्तित्वात आहे असे महाराष्ट्राला वाटत नाही. हा भगवा छत्रपती शिवरायांचाच आहे. आता भाजपामध्ये कुणी प्रतिशिवाजी निर्माण झाले असतील आणि त्यांनी त्यांचा स्वतंत्र भगवा निर्माण केला असेल तर तो त्यांचा प्रश्न, असा टोलाही सामनामधून लगावण्यात आला.


शिवरायांचे सातारा आणि कोल्हापूरच्या गादीचे वंशज भाजपामध्ये सामील करून घेतले आहेत. पण भगव्याची मालकी शिवरायांच्या प्रजेकडे म्हणजे मराठी जनांकडेच आहे. तोच भगवा मुंबईवर पन्नास वर्षांपासून फडकत आहे. हा भगवा उतरवून वेगळा झेंडा फडवणे ही महाराष्ट्राशी आणि छत्रपती शिवरायांशी प्रतारणा आहे. मुंबई महानगरापालिकेवरील भगवा उतरवण्याची भाषा करणे म्हणजे महाराष्ट्राचा मुंबईवरील हक्क नाकारण्यासारखेच आहे. मुंबई महानगरपालिकेवरील भगव्यास हात घालू असे सांगणे म्हणजे मराठी माणसाचे मुंबईशी नाते तोडण्यासारखे आहे. भगवा उतरवणे म्हणजे मुंबई पुन्हा भांडवलदारांच्या घशात घालून मराठी माणूस, श्रमिक, मजुरांना गुलाम करण्यासारखेच आहे. मुंबईवरील भगवा उतरवण्याची भाषा करणे ही १०५ हुतात्म्यांशी सरळसरळ बेईमानी आहे, अशी टीकाही या अग्रलेखातून करण्यात आली आहे.

छत्रपती शिवरायांचा त्याग, त्यांचे हजारो, लाखो मावळे, महाराष्ट्र घडवताना कामी आलेल्या मर्द मराठ्यांच्या रक्तांचे शिंपण या भगव्यावर झाले आहे. हा मराठी अस्मितेचा, हिंदू तेजाचा अस्सल भगवा उतरवण्याचे कपट कारस्थान जे करत आहेत ते देशातील प्रखर हिंदुत्वाचा अवमान करीत आहेत. त्यांना मुंबई महानगरपालिकेवरील भगवा राजकीय स्वार्थासाठी उतरवायचा आहे. जोपर्यंत पालिकेवर भगवा आहे तोपर्यंत महाराष्ट्र दुष्मनांचे पाशवी हात मुंबईच्या गळ्यापर्यंत पोहोचणार नाहीत. मुंबई भांडवलदारांची बटीक होण्यापासून रोखण्याचे काम याच तेजस्वी भगव्याने केले आहे. मुंबईवरील भगवा उतरवण्याचे स्वप्न ज्यांनी पाहिले ते राजकारण आणि सार्वजनिक जीवनातून कायमचे नेस्तनाबूत झाले, असेही सामनातील या अग्रलेखात म्हटले आहे.

 

 

 

 

Web Title: Shiv Sena's harsh criticism on BJP in the Editorial of the Saamana

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.