"शिवसेनेच्या बुद्धीचा 'चक्का जाम' झालाय?", आशिष शेलारांचा हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Published: February 6, 2021 11:34 AM2021-02-06T11:34:48+5:302021-02-06T11:47:50+5:30

Ashish Shelar : आशिष शेलार यांनी सत्तेसाठी महाराष्ट्र धर्मावर 'ट्रॅक्टर' फिरवणार का? असा सवाल करत शिवसेनेवर टीका केली आहे.

"Shiv Sena's intellect has been 'jammed'?", bjp leader Ashish Shelar attack on shiv sena | "शिवसेनेच्या बुद्धीचा 'चक्का जाम' झालाय?", आशिष शेलारांचा हल्लाबोल

"शिवसेनेच्या बुद्धीचा 'चक्का जाम' झालाय?", आशिष शेलारांचा हल्लाबोल

Next
ठळक मुद्दे'सत्तेसाठी महाराष्ट्र धर्मावर 'ट्रॅक्टर' फिरवणार का?'

मुंबई : केंद्र सरकारच्या नव्या कृषी कायद्यांविरोधात दिल्लीच्या सीमांवर गेल्या दोन महिन्यांपासून शेतकरी आंदोलन सुरू आहे. मात्र, अद्याप यावर तोडगा निघाला नसल्याने आता शेतकरी संघटनांकडून आक्रमक भूमिका घेण्यात आली आहे. याच पार्श्वभूमीवर संयुक्त किसान मोर्चाने आज देशभर चक्का जाम आंदोलनाची हाक देण्यात आली आहे. या चक्का जाम आंदोलनाला काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेससह शिवसेनेने पाठिंबा दिला आहे. यावरून भाजपाचे नेते आशिष शेलार यांनी काँग्रेससह शिवसेनेवर निशाणा साधला आहे.

आशिष शेलार यांनी यासंदर्भात ट्विट केले आहे. यामध्ये शेतकरी आंदोलनाला पाठिंबा दर्शविणाऱ्या रिहाना, ग्रेटा थॅनबर्ग, मिया खलिफा यांची काँग्रेस-शिवसेनेने बाजू घेतल्याचा आरोप करत आशिष शेलार यांनी हल्लाबोल केला आहे. "देशांतर्गत विषयात उगाच ढवळाढवळ करणाऱ्या रिहाना, ग्रेटा थॅनबर्ग, मिया खलिफा या परदेशींच्या तालावर काँग्रेस-शिवसेनेने 'पॉप डान्स' केला. तर या परदेशींना सचिन तेंडुलकर, लतादीदींनी खडसावले, अण्णा हजारेंनी लोकशाहीचा सन्मान केला तर त्यांच्या विरोधात हेच धिंगाणा घालतात," असे ट्विट आशिष शेलार यांनी केले आहे.

याचबरोबर, दुसऱ्या ट्विटमध्ये आशिष शेलार यांनी सत्तेसाठी महाराष्ट्र धर्मावर 'ट्रॅक्टर' फिरवणार का? असा सवाल करत शिवसेनेवर टीका केली आहे. "वंदनीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी ज्यांचा प्रचंड सन्मान केला. त्या भारतरत्न, महाराष्ट्र भूषण व्यक्तींवर शिवसेना शिंतोडे उडवून महाराष्ट्र द्रोह का करतेय? काँग्रेस सोबत जाऊन शिवसेनेच्या बुद्धीचा 'चक्काजाम' झालाय ? सत्तेसाठी महाराष्ट्र धर्मावर 'ट्रॅक्टर' फिरवणार का?", असे ट्विट आशिष शेलार यांनी केले आहे.

दरम्यान, दिल्ली सीमेवरील शेतकरी आंदोलनाचे इंटरनॅशनल पॉप स्टार रिहाना, पर्यावरणवादी ग्रेटा थनबर्ग आणि पॉर्न स्टार मिया खलिफाने समर्थन देत ट्विट केले. मात्र, यानंतर सोशल मीडियावर रणकंदन माजले. हा विषय जागतिक सेलिब्रिटींनी उपस्थित केल्यानंतर आता देशातील काही सेलिब्रिटींचा याला विरोध होत आहे. 

हा प्रश्न भारताचा अंतर्गत मुद्दा असून यावर भारतीयांनाच बोलण्याचा अधिकार आहे, असे सांगत क्रिकेटचा देव म्हणून ओळखले जाणारे सचिन तेंडुलकर, लता मंगेशकर, कंगना रनौत, अक्षय कुमार, अजय देवगण, एकता कपूर, विराट कोहलीसह अनेक सेलिब्रेटींनी शेतकरी आंदोलनासंदर्भात सरकारच्या भूमिकेचे स्वागत करत ट्विट केले आहे.
 

Web Title: "Shiv Sena's intellect has been 'jammed'?", bjp leader Ashish Shelar attack on shiv sena

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.