अनिल देशमुख दिल्लीला, शिवसेनेचे एकनाथ शिंदे सिल्व्हर ओकवर; शरद पवारांसोबत खलबते
By ऑनलाइन लोकमत | Published: April 5, 2021 07:23 PM2021-04-05T19:23:26+5:302021-04-05T19:23:54+5:30
Eknath Shinde: राज्यातील गृहमंत्रीपद रिकामे झाले आहे. हे मंत्रिपद राष्ट्रवादीच्या वाट्याला आलेले आहे. अशातच राष्ट्रवादीमध्ये चार जणांची नावे या पदासाठी चर्चेत आहेत. यात शरद पवारांचे विश्वासू प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि राजेश टोपे यांची नावं आघाडीवर आहेत.
राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुखांनी मंत्रिपदाचा राजीनामा देऊन दिल्ली गाठलेली असताना शिवसेनेचे एकनाथ शिंदे हे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांच्या सिल्व्हर ओकवर पोहोचल्याने चर्चांना उधाण आले आहे. (Mumbai: Maharashtra Minister and Shiv Sena leader Eknath Shinde arrives at Silver Oak, residence of Nationalist Congress Party (NCP) chief Sharad Pawar.)
Mumbai: Maharashtra Minister and Shiv Sena leader Eknath Shinde arrives at Silver Oak, residence of Nationalist Congress Party (NCP) chief Sharad Pawar. pic.twitter.com/ahdVpjQn3j
— ANI (@ANI) April 5, 2021
राज्यातील गृहमंत्रीपद रिकामे झाले आहे. हे मंत्रिपद राष्ट्रवादीच्या वाट्याला आलेले आहे. अशातच राष्ट्रवादीमध्ये चार जणांची नावे या पदासाठी चर्चेत आहेत. यात शरद पवारांचे विश्वासू प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि राजेश टोपे यांची नावं आघाडीवर आहेत. जयंत पाटील यांनी आर आर पाटील यांच्यानंतर गृहमंत्रिपदाचा कारभार सांभाळला होता, कठीण काळात जबाबदारी सांभाळण्याचा अनुभव त्यांच्याकडे आहे, तर राजेश टोपे यांनी कोरोना काळात केलेल्या कार्याचं अनेकजण कौतुक करत आहेत, हे दोन्ही नेते शरद पवारांच्या अत्यंत निकटवर्तीय आहेत, त्याचसोबत गृहमंत्रिपदाच्या शर्यतीत आणखी एक नाव प्रामुख्याने पुढे येत आहे ते म्हणजे कोल्हापूरचे हसन मुश्रीफ, त्याचसोबत कामगार मंत्री आणि माजी विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे पाटीलही यांचेही नाव चर्चेत आहे. त्यामुळे गृहमंत्रिपदाचा कार्यभार राष्ट्रवादीच्या कोणत्या नेत्याकडे सोपवण्यात येणार याबाबत उत्सुकता आहे.
उच्च न्यायालयाने माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंगांच्या आरोपांची सीबीआय चौकशी करण्याचे आदेश दिल्याने पदाचा राजीनामा देऊन अनिल देशमुख दिल्लीला गेले आहेत. अशातच शिवसेनेचे मंत्री आणि मातोश्रीचे विश्वासू नेते एकनाथ शिंदे हे काही वेळापूर्वी शरद पवारांच्या सिल्व्हर ओक या निवासस्थानी पोहोचले आहेत. यामुळे या दोघांमध्ये काय चर्चा होते, विश्रांती घेत असलेल्या शरद पवारांना मातोश्रीवरून काय संदेश असेल, याबाबत अनेक राजकीय चर्चांना उधाण आले आहे.
काय म्हणाले अनिल देशमुख?
अँड जयश्री पाटील यांनी केलेल्या याचिकेवर सुनावणीवेळी न्यायालयाने १०० कोटी वसुलीच्या आरोपाची सीबीआय चौकशीचे आदेश दिले आहेत. यावर अनिल देशमुख म्हणाले की,उच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर मी गृहमंत्रीपदावर राहणे मला नैतिकदृष्ट्या योग्य वाटत नाही. त्यामुळे, मी स्वत:हून या पदापासून दूर राहण्याचा निर्णय घेत आहे, असे अनिल देशमुख यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात म्हटलंय. तसेच, मला गृहमंत्री या पदावरुन कार्यमुक्त करावे, असेही त्यांनी म्हटलंय.
हायकोर्टात काय घडलं?
याचिकाकर्त्या जयश्री पाटील यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावरील १०० कोटी वसुलीच्या आरोपाची सीबीआय चौकशी करावी अशी याचिका हायकोर्टात दाखल केली होती, अनिल देशमुख हे गृहमंत्री असल्याने पोलीस या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करू शकत नाही असं याचिकेत म्हटलं होतं, या याचिकेवर सुनावणीवेळी हायकोर्टाने सीबीआय संचालकांना या प्रकरणी १५ दिवसांत प्राथमिक चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत, त्याचसोबत जर यात कोणत्याही प्रकारे गुन्हा आढळत असेल तर FIR दाखल करण्यासही म्हटलं आहे.