शिवेंद्रराजे अन् शशिकांत शिंदे यांचे गळ्यात गळे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 19, 2021 07:56 PM2021-02-19T19:56:13+5:302021-02-19T20:01:01+5:30
Shivendrasinghraja Bhosale Politics Satara- काही दिवसांपूर्वी एकमेकांना संपविण्याची भाषा करणारे जिल्ह्यातील दोन दिग्गज नेत्यांनी पुन्हा गळ्यात गळे घातले आहे. आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले व आमदार शशिकांत शिंदे यांनी यू टर्न घेत आपण एकच असल्याचे स्पष्ट केलेय.
सातारा : काही दिवसांपूर्वी एकमेकांना संपविण्याची भाषा करणारे जिल्ह्यातील दोन दिग्गज नेत्यांनी पुन्हा गळ्यात गळे घातले आहे. आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले व आमदार शशिकांत शिंदे यांनी यू टर्न घेत आपण एकच असल्याचे स्पष्ट केलेय.
शिवेंद्रसिंहराजे व शशिकांत शिंदे या दोन नेत्यांनी वाद विकोपाला गेल्याचे पहायला मिळत होते. कुडाळ येथे झालेल्या एका सभेत शिवेंद्रसिंहराजेंनी शिंदे यांच्यावर जोरदार टीकास्त्र सोडले होते. माझा काटा काढायचा प्रयत्न तर मीही काट्याने काटा काढणार, माझ्या नादी लागू नका, असे जोरदार सुनावले होते.
या वादाबाबत खुद्द उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील लोकांना चांगले वाटावे म्हणून अशा पध्दतीने नेते आक्रमकपणे बोलतात असे स्पष्ट केले होते. तर माझा आणि शिवेंद्रसिंहराजेंचा वैयक्तिक कसलाही वाद नाही. मात्र, पक्षीय राजकारणाचा प्रश्न निर्माण झाल्यास खटके उडणार, असे आ. शिंदे यांनी स्पष्ट केले होते. जिल्हा परिषद, पंचायत समिती यांच्या निवडणुका आगामी काळात होणार आहेत, राष्ट्रवादीच्या जास्तीत जास्त जागा निवडून याव्यात, यासाठी आम्ही प्रयत्न करणार, त्या ठिकाणी पक्ष म्हणून वाद होऊ शकतो, असे स्पष्ट केले होते.
या पार्श्वभूमीवर मेढ्यात सरपंच परिषदेतर्फे आयोजित नूतन सरपंच व कोरोना योध्द्यांच्या सत्कार सोहळ्यात शिवेंद्रसिंहराजेंनीही एक पाऊल मागे घेत शशिकांत शिंदे, वसंतराव मानकुमरे आणि आपण एकच असल्याची गुगली टाकल्याने जावली तालुक्यातील राजकारणात विरोधकांना क्लिन बोल्ड करण्याचा प्रयत्न केला आहे. या दोन्ही नेत्यांनी अनेकांना बुचकुळ्यात टाकले आहे.
या कार्यक्रमाला माजी आमदार सदाभाऊ सकपाळ, सरपंच परिषदेचे प्रदेशाध्यक्ष दत्ताभाऊ काकडे, एस. एस. पारटे, जिल्हा परिषदेचे सदस्य वसंतराव मानकुमरे, अर्चना रांजणे, सभापती जयश्री गिरी, अरुणशेठ कापसे, सरपंच परिषदेचे जिल्हाध्यक्ष नितीन पाटील, पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष समाधान फोफळे उपस्थित होते.
शिवेंद्रबाबांच्या घरवापसीचे संकेत
विधानसभा निवडणुकीआधी आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. आता त्यांच्या ताकदीच्या जोरावर भाजपचे नेते जिल्हा बँकेत कमळ फुलवू पाहत आहेत. मात्र, शिवेंद्रसिंहराजेंनी यू टर्न घेऊन राष्ट्रवादीचे आक्रमक नेते आमदार शशिकांत शिंदे यांच्यासोबत मिळते जुळते घेण्याचे ठरवले आहे.
या दोन्ही नेत्यांच्या तुझ्या गळा माझ्या गळामुळे भाजपमध्ये अस्वस्थता पसरली आहे. तर शिवेंद्रसिंहराजेंचे पारंपरिक विरोधक दीपक पवार यांना देखील चेकमेट बसला आहे. शिवेंद्रबाबा आता लवकरच राष्ट्रवादीत घरवापसी करतील, अशी चर्चा त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये सुरु झालेली आहे. तर भाजपवाल्यांचे मनोधैर्य खचू लागले आहे.