“पंतप्रधान नरेंद्र मोदींना एव्हाना एक आनंदाची बातमी समजली असेलच; काही जमतंय का बघा”

By ऑनलाइन लोकमत | Published: April 20, 2021 09:57 AM2021-04-20T09:57:28+5:302021-04-20T09:59:02+5:30

Shivsena Advice to PM Narendra Modi, Manmohan Singh Letter: पंतप्रधान नरेंद्र मोदी व गृहमंत्री अमित शहा(Amit Shah) हे प. बंगालच्या निवडणूक प्रचार मोहिमेतून दिल्लीस परतले आहेत. दिल्लीत येताच दोघांनीही कोरोनासंदर्भात निर्माण झालेल्या परिस्थितीवर लक्ष घालण्यास सुरुवात केली.

Shivsena Advice on Corona situtation to PM Narendra Modi over Manmohan Singh Letter | “पंतप्रधान नरेंद्र मोदींना एव्हाना एक आनंदाची बातमी समजली असेलच; काही जमतंय का बघा”

“पंतप्रधान नरेंद्र मोदींना एव्हाना एक आनंदाची बातमी समजली असेलच; काही जमतंय का बघा”

googlenewsNext
ठळक मुद्देइस्रायलने देश कोरोनामुक्त होण्यासाठी काय केले? त्यांनी संपूर्ण लसीकरण तर केलेच, पण नियम आणि निर्बंधांचे काटेकोर पालन केलेफालतू राजकारण, थाळय़ा किंवा टाळय़ा पिटून कोरोना पळवणे या नवटांक उद्योगांना थारा दिला नाही.कोरोना लसनिर्मितीसाठी लागणारा परवाना काही काळासाठी स्थगित करावा, जेणेकरून अन्य कंपन्याही लसीची निर्मिती करू शकतील.जे ‘प्रॅक्टिकल’ आहे तेच केले. इस्रायल लोकसंख्येच्या तुलनेत लहान देश आहे. पण या संकटकाळात तेथे विरोधकांच्या सल्ल्यांनाही महत्त्व देण्यात आले.

मुंबई - कोरोनामुक्तीची घोषणा करणारा इस्रायल हा जगातील पहिला देश ठरला आहे. इस्रायलने देश कोरोनामुक्त होण्यासाठी काय केले? त्यांनी संपूर्ण लसीकरण तर केलेच, पण नियम आणि निर्बंधांचे काटेकोर पालन केले. आपले माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग(Dr. Manmohan Singh) यांनी मोदी यांना पत्र लिहून जी पंचसूत्री काल मांडली तेच धोरण इस्रायलने राबवले. मनमोहन यांचे मार्गदर्शन राष्ट्रहितासाठीच आहे. त्यास राहुल गांधींनीही हातभार लावला आहे. वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राहुल गांधी यांनी प. बंगालमधील सर्व सभा रद्द केल्या हासुद्धा कोरोना नियंत्रित करण्याचा धाडसी उपाय आहे. इस्रायलने गेले वर्षभर हाच मार्ग अवलंबला. बहुधा मनमोहन सिंग यांची ‘मन की बात’ बेंजामिन नेतान्याहूपर्यंत पोहोचली असेल. आता ती मनमोहन यांनी पंतप्रधान मोदी(Narendra Modi) यांच्यापर्यंतही पोहोचवली आहे. त्याप्रमाणे काही जमतंय का बघा! असा हटके स्टाईलनं सल्ला सामना अग्रलेखातून शिवसेनेने(Shivsena) केंद्र सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींना दिला आहे.

तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी व गृहमंत्री अमित शहा(Amit Shah) हे प. बंगालच्या निवडणूक प्रचार मोहिमेतून दिल्लीस परतले आहेत. दिल्लीत येताच दोघांनीही कोरोनासंदर्भात निर्माण झालेल्या परिस्थितीवर लक्ष घालण्यास सुरुवात केली. पंतप्रधान मोदी यांनी दिल्लीत एक महत्त्वाची बैठक बोलावून कोरोनाच्या गांभीर्याबाबत चर्चा केली, तर अमित शहा यांनी स्पष्ट केले की, घाईघाईने लॉक डाऊन लावण्याची गरज नाही. मोदी यांना एव्हाना एक आनंदाची बातमी समजली असेलच. इस्रायल(Israel) या देशाने कोरोनावर मात केली आहे असंही शिवसेनेनं म्हटलं आहे.

सामना अग्रलेखातील महत्त्वाचे मुद्दे

कोरोनामुक्तीची घोषणा करणारा इस्रायल हा जगातील पहिला देश ठरला आहे. पंतप्रधान मोदी ज्या पद्धतीने कोरोना लढय़ाचे नेतृत्व करत होते ते पाहता इस्रायलच्या आधी आपला हिंदुस्थानच जगात कोरोनामुक्त होईल असे वातावरण अंधभक्तांनी निर्माण केलेच होते. पण कोरोनामुक्ती सोडाच, देशात कोरोनाने घातलेले थैमान हाताबाहेर गेले.

इस्रायलने देश कोरोनामुक्त होण्यासाठी काय केले? त्यांनी संपूर्ण लसीकरण तर केलेच, पण नियम आणि निर्बंधांचे काटेकोर पालन केले. फालतू राजकारण, थाळय़ा किंवा टाळय़ा पिटून कोरोना पळवणे या नवटांक उद्योगांना थारा दिला नाही.

आपले माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी मोदी यांना पत्र लिहून जी पंचसूत्री काल मांडली तेच धोरण इस्रायलने राबवले. मनमोहन हे शांतपणे काम करणारे नेते आहेत. पंतप्रधान मोदी यांनाही मनमोहन सिंग यांनी काही सूचना केल्या आहेत. कोरोनावर मात करण्यासाठी अनेक पर्याय आहेत, पण लोकांचे लसीकरण होणे सर्वात महत्त्वाचे आहे.

पुढील सहा महिन्यांत राज्यांना कशा पद्धतीने लसपुरवठा होईल याबाबत केंद्राने स्पष्टीकरण द्यावे, असे मनमोहन सिंग यांनी पंतप्रधान मोदी यांना सुचवले आहे. मनमोहन काय सांगतात? कोणत्या राज्याला किती लसी मिळाल्यात याबाबत एक पारदर्शक सूत्र असायला हवे.

कोरोना काळात सरकार किती लसी कंपन्यांकडून घेत आहे ते सार्वजनिक करावे. कोणत्या कंपनीकडून किती लसी घेण्यात आल्या, कोणत्या कंपनीला किती लसींची ऑर्डर दिली हे लोकांना समजायलाच हवे. मनमोहन यांनी एक महत्त्वाची सूचना केली आहे ती म्हणजे कोरोना लसनिर्मितीसाठी लागणारा परवाना काही काळासाठी स्थगित करावा, जेणेकरून अन्य कंपन्याही लसीची निर्मिती करू शकतील.

कंपन्यांना उत्पादनासाठी मदत व्हावी यासाठी पंतप्रधानांनी फंड, तसेच इतर सवलती द्याव्यात. केंद्र सरकार आपत्कालीन गरजांसाठी १० टक्के लसी ठेवू शकते, पण राज्यांना संभाव्य लसीबाबत स्पष्ट संकेत मिळायलाच हवेत. जेणेकरून राज्ये आपली योजना तयार करू शकतील. यातील बऱयाच गोष्टी इस्रायलसारख्या देशाने अंमलात आणल्या व त्यामुळे तो देश पूर्णपणे कोरोनामुक्त झाला.

पंतप्रधान मोदी यांचे मधल्या काळात इस्रायलमध्ये फार कौतुक झाले. याचा आपल्यालाही अभिमान वाटायलाच हवा. पण इस्रायलला जे जमले ते मोदींना आपल्या देशात का जमवता आले नाही? कोरोनास पळवण्यासाठी व तेथील पांढऱ्या कपडय़ातील देवदूतांना बळ देण्यासाठी इस्रायलच्या राज्यकर्त्यांनी थाळय़ा वाजवण्याचे फालतू उपक्रम साजरे केले नाहीत.

जे ‘प्रॅक्टिकल’ आहे तेच केले. इस्रायल लोकसंख्येच्या तुलनेत लहान देश आहे. पण या संकटकाळात तेथे विरोधकांच्या सल्ल्यांनाही महत्त्व देण्यात आले. इस्रायलमध्ये कोणताही उत्सव साजरा न करता सार्वजनिक लसीकरण केले. त्याचा परिणाम असा झाला की, इस्रायलने आता सर्व प्राथमिक, माध्यमिक शाळा उघडल्या आहेत.

परदेशी पर्यटकांवरील बंदी हटवण्यात आली असून पर्याटकांचेही टिकाकरण करण्यात येईल असे जाहीर केले आहे. सार्वजनिक ठिकाणी ‘मास्क’ वापरण्याचे निर्बंध हटवण्यात आले असून मोठय़ा सभा व संमेलनांत मात्र ‘मास्क’ वापरणे बंधनकारक असल्याची नियमावली जाहीर केली आहे.

इस्रायल लहान देश असला तरी तेथेही कोरोनाने ६७०० बळी आतापर्यंत घेतले. १० लाखांवर जनता त्या काळात कोरोना संक्रमित झाली. त्यामुळे कोरोनाच्या वणव्याचे चटके इस्रायलनेही सहन केले, पण आता इस्रायल कोरोनामुक्त झाला व तशी अधिकृत घोषणाच करण्यात आली.

मोदी व इस्रायलच्या राज्यकर्त्यांत मधुर संबंध मधल्या काळात प्रस्थापित झाले. पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू हे तर मोदींना जवळचे मित्रच मानतात व नेतान्याहू यांनी त्यांच्या निवडणूक प्रचारात मोदी यांच्या होर्डिंग्जचा मोठय़ा प्रमाणात वापर केला. मोदी नावाचा वापर करून नेतान्याहू यांनी त्यांच्या देशातील कोरोना पळवून लावला असेही भक्त मंडळ बोलू शकते. अशा प्रचारपंडितांना कोणी रोखायचे? ते तर सुरूच राहणार.

Web Title: Shivsena Advice on Corona situtation to PM Narendra Modi over Manmohan Singh Letter

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.