'राज्यपालांच्या माध्यमातून भाजपा सत्ता राबवण्याचा प्रयत्न करत आहे'
By ऑनलाइन लोकमत | Published: August 5, 2021 12:27 PM2021-08-05T12:27:54+5:302021-08-05T12:28:00+5:30
Sanjay Raut attacks Bhagat Singh Koshyari: भाजपाने देशातील लोकशाही मोडीत काढली आहे.
नवी दिल्ली: महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी सध्या महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांच्या दौऱ्यावर गेले आहेत. त्यांच्या या दौऱ्यावर शिवसेना नेते संजय राऊत यांनी टीकास्त्र सोडलं आहे. ज्या राज्यात भाजपाची सरकारे नाहीत, तिथे भाजपा राज्यपालांच्या माध्यमातून सत्ता राबवण्याचा प्रयत्न करत आहे, असा घणाघाती आरोप राऊतांनी केला आहे.
मीडियाशी संवाद साधताना राऊत पुढे म्हणाले की, भाजपची सरकारे नसलेल्या राज्यात भाजपा राज्यपालांच्या माध्यमातून राज्य करू पाहत आहे. तिकडं दिल्लीतही हेच चाललंय ? दिल्लीचे राज्यपाल त्याच पद्धतीने काम करत आहेत. पश्चिम बंगालमध्येही राज्यपालांमार्फत हेच काम सुरू आहे. इकडं महाराष्ट्रातही राज्यपाल त्याच पद्धतीने दुडूदुडू धावताहेत. धावू द्या, काही हरकत नाहीत. दम लागून पडाल, असा टोला राऊतांनी लगावला.
भाजपाने लोकशाही मोडीत काढली...
यावेळी राऊत यांनी पेगासस प्रकरणावरुन केंद्र सरकारवरही घणाघात केला. आम्हाला खात्री आहे, आम्हा विरोधी पक्षाला जे म्हणायचय, तिच भूमिका सर्व प्रमुख पत्रकार कोर्टात मांडतील. पेगाससवर चर्चा व्हावी अशी आमची साधी मागणी आहे. या देशात काय घडतयं हे जाणून घ्यायचा देशाला अधिकार नाही का? सरकार अधिकार नाकारत असेल तर या देशातील लोकशाही त्यांनी मोडीत काढली आहे, असा हल्ला त्यांनी केला.