ठाण्याचे खासदार झाले कृषीमंत्र्यांचे व्याही; राजन विचारेंची लेक बनली दादा भूसेंच्या घरची सून
By ऑनलाइन लोकमत | Published: April 26, 2021 03:51 PM2021-04-26T15:51:38+5:302021-04-26T15:52:43+5:30
मालेगावातील आनंद फार्म येथे काही मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत हे लग्न उरकण्यात आलं.
नाशिक – ठाण्यातील शिवसेनेचे खासदार राजन विचारे यांच्या कन्येचं कृषीमंत्री दादा भूसे यांच्या मुलासोबत विवाह सोहळा संपन्न झाला आहे. या विवाह सोहळ्याला अनेक मान्यवरांनी हजेरी लावली होती. नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनीही लग्न सोहळ्याला हजेरी लावून दोन्ही नवदाम्पत्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. दादा भूसे यांचा मुलगा अविष्कार आणि राजन विचारे यांची कन्या लतीशा यांचा विवाह सोहळा पार पडला.
मालेगावातील आनंद फार्म येथे काही मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत हे लग्न उरकण्यात आलं. लग्नाबद्दल कोणतीही वाच्यता न करता अतिशय गुप्तपणे हा लग्नसोहळा पार पडला. या लग्न सोहळ्याला दोन्ही कुटुंबाचे नातेवाईक आणि काही मान्यवर नेतेच उपस्थित होते. इतर कोणालाही या सोहळ्याला आमंत्रित करण्यात आलं नाही. मीडियालाही या लग्न सोहळ्यापासून दूर ठेवण्यात आलं होतं. ज्याठिकाणी हा सोहळा पार पडला तिथे परवानगीशिवाय कोणालाही आतमध्ये एन्ट्री नव्हती.
कोरोनाची परिस्थिती पाहता केवळ प्रतिष्ठीत व्यक्ती यांना आतमध्ये सोडण्यात येत होते. राज्यातील काही आमदार-खासदारही या लग्न सोहळ्याला उपस्थित राहिले होते. त्यामुळे लग्न सोहळ्याच्या ठिकाणी सुरक्षेसाठी पोलिसही तैनात होते. या विवाह सोहळ्याला नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनीही ऑनलाईन उपस्थिती लावत नववधुवरांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.