संजय गायकवाडांचा पुन्हा देवेंद्र फडणवीसांवर निशाणा; “लेडीज बारमध्ये डान्स करणारे…”
By ऑनलाइन लोकमत | Published: April 20, 2021 10:29 AM2021-04-20T10:29:57+5:302021-04-20T10:31:44+5:30
Shivsena Sanjay Gaikwad Reaction on Devendra Fadnavis Criticism: संजय गायकवाडांची रात्रीची उतरली नसेल या देवेंद्र फडणवीसांच्या टीकेला त्यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.
बुलडाणा – शिवसेना आमदार संजय गायकवाड आणि भाजपा नेते देवेंद्र फडणवीस यांच्यातील कलगीतुरा थांबण्याची चिन्हे नाहीत. देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या टीकेला पुन्हा एकदा आमदार संजय गायकवाड यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. लेडीज बारमध्ये डान्स करणारे लोक देवेंद्र फडणवीसांचे सहकारी मंत्री होते. बुलडाण्याचे पालकमंत्री होते असा पलटवार संजय गायकवाड यांनी फडणवीसांवर केला आहे.(Shivsena Sanjay Gaikwad Target BJP Devendra Fadnavis)
संजय गायकवाडांची रात्रीची उतरली नसेल आणि सकाळी बाईट दिला या देवेंद्र फडणवीसांच्या टीकेला उत्तर देताना संजय गायकवाड म्हणाले की, मी मीडियाला कधी बाईट दिला याची त्यांना माहिती नसेल. संध्याकाळी ५ वाजता मी बोललो होतो तेव्हा सकाळ नव्हती. तळीराम पाळायची सवय त्यांना आहे. मी जे बोललो त्यावर ठाम आहे असंही गायकवाड म्हणाले.
त्याचसोबत नारायण राणे, नितेश राणे यांच्यासारखे भाजपाचे काही लोक मुख्यमंत्र्यांवर खालच्या पातळीवर जाऊन टीका करतात. तुम्ही आमच्या नेत्यांवर टीका करायची मग आम्ही तुमची पूजा करायची का? कोरोनावरून जे राजकारण सुरू आहे त्यावर मी माझी भूमिका मांडली. लोकांचे जीव वाचले पाहिजेत हे मला वाटतं. आम्हाला सल्ले देण्याआधी देवेंद्र फडणवीसांनी केंद्राला सल्ला देऊन राज्याला मदत द्यायला सांगा. फुकटचे सल्ले द्यायची गरज नाही. आमच्या आरोग्याची काळजी आम्हाला घेता येते. ते सल्ले उद्धवसाहेब आम्हाला देतात ते आम्ही ऐकतो असा टोला संजय गायकवाड यांनी देवेंद्र फडणवीसांना लगावला.
काय म्हणाले होते देवेंद्र फडणवीस?
आमदार संजय गायकवाड (Shiv sena MLA Sanjay Gaikwad) यांनी ‘मला कोरोनाचे जंतू सापडले असते, तर मी ते फडणवीसांच्या तोंडात कोंबले असते, असे विधान केले होते. संजय गायकवाड यांच्या टीकेला उत्तर देताना देवेंद्र फडणवीस म्हणाले होते की, ’संजय गायकवाड यांनी रात्रीची उतरली नसताना पत्रकार परिषद घेतली असावी. मात्र मी त्यांना विनंती करतो की, माझ्या घशात कोरोनाचे किटाणू घालण्याआधी त्यांनी हँडग्लोज घालावेत आणि चेहऱ्यावर नीट मास्क लावावा. कारण काय आहे की, मला जनतेचे आशीर्वाद आहेत. त्यामुळे मला काही होणार नाही. मात्र माझ्या माहितीप्रमाणे सामान्य माणसापेक्षा तळीरामांना कोरोना लवकर होतो असा टोला त्यांनी लगावला होता.