Shivsena: “शिवसेनेला हिंदुत्वावर प्रवचने देणे म्हणजे डोके ठिकाणावर नसल्याचे लक्षण”; भाजपाला टोला
By ऑनलाइन लोकमत | Published: October 23, 2021 08:16 AM2021-10-23T08:16:26+5:302021-10-23T08:21:04+5:30
भाजपचे खासदार सुब्रह्मण्यम स्वामी यांनी तर हिंदुत्व रक्षणासाठी बांगलादेशावर लष्करी कारवाई करण्याचेच सुचवले आहे. म्हणजे खतऱ्यात सापडलेल्या हिंदुत्वाबाबत भावना किती तीव्र आहेत ते पाहा.
मुंबई - शिवसेनेने सत्तेसाठी हिंदुत्व सोडले, असे म्हणणाऱ्यांनी जम्मू-कश्मीरात मेहबुबा मुफ्तीच्या पक्षाशी सत्तेसाठी लावलेला निकाह विसरता येईल काय? महाराष्ट्रात शिवसेनेने काय केले व करायला हवे त्यावर सल्ले देण्यापेक्षा देशाच्या सीमेवरील हिंदूंचा आक्रोश समजून घ्या. हिंदुत्व हे तुमच्या राजकीय स्वार्थासाठी चावून फेकण्याचा चोथा नाही. एका राज्यात गोमांसावरून लोकांना ठार करायचे व दुसऱ्या राज्यात गोमांस विकायला परवानगी द्यायची हे तुमचे बेगडी हिंदुत्व. हे तुमचे नव हिंदुत्व म्हणजे षंढपणाचा कळसच झाला. हिंदुत्वावरील ही फुकाची प्रवचने आता बंद करा! कश्मीरातील हिंदूंच्या किंकाळ्यांनी ज्यांचे मन द्रवत नाही त्यांनी महाराष्ट्रावर प्रवचने झोडू नयेत अशा शब्दात शिवसेनेने(Shivsena) सामना अग्रलेखातून भाजपावर(BJP) निशाणा साधला आहे.
तसेच महाराष्ट्रातील बेगडी हिंदुत्ववादी जे ‘शिवसेनेने हिंदुत्व सोडले होss’ म्हणून कंठशोष करीत आहेत त्यांना बांगलादेशातील हिंदूंची होत असलेली राखरांगोळी चिंतामग्न करीत नाही. कश्मीरातील व बांगलादेशातील होरपळणाऱ्या हिंदूंचे रक्षण करणे हे मोदी सरकारचेच कर्तव्य आहे. हिंदू हा असा खतरे में आला असताना फुकाची प्रवचने झोडण्यात काय हशील? मोदी सरकारने दोन मंत्र्यांना अनंतनाग, बारामुल्ला, श्रीनगर येथे ठाण मांडूनच बसवायला हवे व जी काही प्रेरणादायी पोपटपंची करायची आहे ती तिकडे करा, असे सांगायला हवे असा टोलाही शिवसेनेने लगावला आहे.
सामना अग्रलेखातील महत्त्वाचे मुद्दे
भारतीय जनता पक्षात सत्तेसाठी शिरलेल्या काही उपटसुंभांना हिंदुत्वाचा(Hindutva) पुळका आला आहे. शिवसेनेने सत्तेसाठी हिंदुत्व कसे सोडले यावर सध्या या उपटसुंभांची पोकळ प्रवचने झडत आहेत. खरे तर हिंदुत्व हा पवित्र शब्द उच्चारायचीच त्यांची लायकी नाही.
देशातील एकंदरीत स्थिती अशी आहे की, आज हिंदू खतऱ्यात आला आहे. हा मजकूर लिहीत असताना कश्मीरातील हिंदूंच्या किंकाळ्या आणि आक्रोशाने आमचे काळीज अस्वस्थ झाले आहे. कश्मिरी पंडित भीतीच्या सावटाखाली आहेत व त्यांनी मोठय़ा प्रमाणावर पलायन सुरू केले आहे.
नव्वदच्या दशकात कश्मीर खोऱ्यात अगदी अशीच तणावाची स्थिती होती. गेल्या पंधरा दिवसांत कश्मीर खोऱ्यातील 220 हिंदू-शीख कुटुंबांनी जम्मूतील निर्वासितांच्या छावण्यांत आश्रय घेतला आहे. हे काही (नव) हिंदुत्ववाद्यांसाठी चांगले लक्षण नाही. शिवसेनेस सध्या हिंदुत्वाचे धडे देणाऱ्यांना कश्मीरातील हिंदूंचे पलायन आणि हत्या दिसू नयेत याचे आश्चर्य वाटते.
कश्मीरात हे असे, तर तिकडे बांगलादेशात हिंदू मंदिरांवर हल्ले सुरू आहेत. हिंदूंच्या वस्त्या जाळल्या जात आहेत. हिंदू मुलींच्या इज्जतीवर हल्ले सुरू आहेत. संपूर्ण बांगलादेशात हिंदू समाज भीतीच्या सावटाखाली कसाबसा जगतो आहे. बांगलादेशातही असेच एक पथक पाठवून तेथील हिंदूंना दिलासा द्यायला हवा.
भाजपचे खासदार सुब्रह्मण्यम स्वामी यांनी तर हिंदुत्व रक्षणासाठी बांगलादेशावर लष्करी कारवाई करण्याचेच सुचवले आहे. म्हणजे खतऱ्यात सापडलेल्या हिंदुत्वाबाबत भावना किती तीव्र आहेत ते पाहा. जे उपटसुंभ शिवसेनेस हिंदुत्वाचे प्रवचन देत आहेत त्यांनी दिल्लीत मोदी-शहांची भेट घेऊन कश्मीर आणि बांगलादेशातील हिंदू खतऱ्यात सापडला असताना सरकार असे थंड का बसले आहे? असा जाब विचारायला हवा.
बांगलादेशात हिंदूंच्या घरांना आगी लावण्यात आल्या. काही ठिकाणी हिंदूंना पळवून लावले व त्यांच्या संपत्तीवर कब्जा करण्यात येत आहे. कश्मीर खोऱयातही हेच चालले आहे. नव्वदच्या दशकात आपली संपत्ती, घरेदारे मागे सोडून पंडितांनी पलायन केले होते.
1997 साली सरकारने एक कायदा बनवला. संकटकाळात अचल संपत्ती खरेदी-विक्रीच्या विरोधात हा कायदा होता, पण कायद्याची पर्वा न करता कश्मिरी पंडितांची संपत्ती कवडीमोल भावात विकण्यात आली. आता नव्याने कश्मिरी पंडितांना त्यांचे हक्क, इतरांनी ताब्यात घेतलेला त्यांचा जमीन-जुमला परत करण्याच्या हालचाली सुरू झाल्या. साधारण अशा एक हजार जणांना त्यांची संपत्ती परत करण्याची प्रक्रिया सुरू केली.
जम्मू-कश्मीर सरकारने एक ‘पोर्टल’ सुरू केले. त्यात कश्मिरी पंडितांना त्यांची संपत्ती परत करण्याची ‘ऑनलाइन’ प्रक्रिया सुरू केली. या पोर्टलची जाहिरातही केली. अनेकांना असे वाटले की, आता अचानक जी हिंसा खोऱ्यात भडकली आहे त्यामागे हे संपत्तीचे कारण असू शकेल.
राज्यपाल मनोज सिन्हा यांच्या हस्ते पोर्टलचे उद्घाटन झाले, त्या दिवशीच राज्यपालांच्या कार्यालयाने जाहीर केले की, खोऱयातून जवळजवळ 60 हजार हिंदूंनी पलायन केले होते. त्यातील 44 हजार कुटुंबांनी राज्याच्या मदत व पुनर्वसन आयुक्तांकडे आपली नोंदणी केली होती. 44 हजार परिवारांत 40,142 हिंदू, 1730 शीख आणि 2684 मुसलमान परिवारांचा समावेश आहे.
स्वतंत्र हिंदुस्थानात आपल्याच देशात आपल्याच नागरिकांना आपली घरेदारे सोडून पलायन करावे लागते व निर्वासितांच्या छावण्यांत दिवस काढावे लागतात, हे काय हिंदुत्वाची प्रवचने झोडणाऱया राज्यकर्त्यांना शोभा देते काय? पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकीतही ‘हिंदू खतरे में’ अशी आरोळी भाजप प्रचार सभांतून मारली जात होती, पण प. बंगालातील हिंदू मतदारांनी शेवटी ममता बॅनर्जींनाच विजयी केले. हे असे आपण का आपटलो? हे नव हिंदुत्ववाद्यांनी स्वतःलाच विचारायला हवे.
मतांसाठी हिंदुत्वाचा धुरळा उडवायचा, हिंदू-मुसलमानांचा खेळ मांडायचा. यातून तणावाचे वातावरण निर्माण करून मते मिळवायची. या खेळास आता हिंदूही विटला आहे. शिवसेनेने सत्तेसाठी हिंदुत्व सोडले, असे म्हणणाऱयांनी जम्मू-कश्मीरात मेहबुबा मुफ्तीच्या पक्षाशी सत्तेसाठी लावलेला निकाह विसरता येईल काय? तुमचा तो निकाह म्हणे व्यापक राष्ट्रीय हितासाठी! तेथे तर सरळ सरळ फुटीरतावादी, अतिरेक्यांशी हातमिळवणी करूनच सत्तेचा शिरकुर्मा चापला होता.
त्या शिरकुर्म्याची दातांत अडकलेली शिते तशीच ठेवून शिवसेनेला हिंदुत्वावर प्रवचने देणे म्हणजे डोके ठिकाणावर नसल्याचे लक्षण आहे. आज फक्त हिंदू खतऱ्यात नसून हिंदुस्थान खतऱ्यात आहे! 100 कोटी लसींचे उद्दिष्ट पूर्ण झाले म्हणून पंतप्रधान मोदी यांनी देशातला सगळय़ात मोठा तिरंगा लालकिल्ल्यावर फडकविला हे योग्यच झाले; पण चिनी, पाकडे, बांगलादेशी ज्या बेदरकारपणे सीमेवर धडका मारीत आहेत ते पाहता तो भव्य, तेजस्वी तिरंगा सुरक्षित आहे काय? याचा विचार करावा लागेल.
सावरकरांसारख्या प्रखर हिंदुत्ववादी राष्ट्रभक्ताची बदनामी करायची, सावरकरांना ‘भारतरत्न’ देण्याची मागणी आली की, मूग गिळून बसायचे. हे तुमचे नव हिंदुत्व म्हणजे षंढपणाचा कळसच झाला. हिंदुत्वावरील ही फुकाची प्रवचने आता बंद करा! कश्मीरातील हिंदूंच्या किंकाळय़ांनी ज्यांचे मन द्रवत नाही त्यांनी महाराष्ट्रावर प्रवचने झोडू नयेत.