२४ तासांत शिवसेनेच्या ३०३ जागा घटल्या; यूपी निवडणुकीत १०० जागा लढवण्याची संजय राऊतांची घोषणा
By ऑनलाइन लोकमत | Published: September 12, 2021 11:48 AM2021-09-12T11:48:31+5:302021-09-12T11:50:18+5:30
२०१७ च्या निवडणुकीत उत्तर प्रदेशात एकूण ८ कोटी ६७ लाख २८ हजार ३२४ लोकांनी मतदान केले. यात १ टक्के मतदानही शिवसेनेला झालं नाही.
मुंबई – उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत कालपर्यंत शिवसेना सर्व ४०३ जागा लढवणार असल्याची घोषणा केली होती. परंतु २४ तासांत पुन्हा ४०३ वरुन खाली येत १०० जागा लढवण्याची घोषणा खासदार संजय राऊत यांनी केली आहे. शिवसेनेनच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत ४०३ जागांवर निवडणूक लढवण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानंतर संजय राऊत यांनी केवळ १०० जागा लढवणार असल्याचं स्पष्ट केले.
उत्तर प्रदेश निवडणुकीच्या( Uttar Pradesh Assembly Election) पार्श्वभूमीवर शिवसेनेने कितीही मोठी घोषणा केली तरी ग्राऊंड लेव्हलवर परिस्थिती वेगळी आहे. २०१७ च्या उत्तर प्रदेशच्या निवडणुकीत आकडेवारी पाहिली तर शिवसेनेला राज्यात जनाधार नसल्याचं दिसून आलं आहे. २०१७ मध्ये शिवसेनेने उत्तर प्रदेशच्या निवडणुकीत ५७ जागा लढवल्या होत्या. त्यातील ५६ जागांवर शिवसेनेच्या उमेदवारांचे डिपॉझिट जप्त झालं होतं. केवळ एका जागेवर डिपॉझिट वाचवण्याची नामुष्की शिवसेनेवर(Shivsena) आली होती.
Shiv Sena to contest for all 403 seats in Uttar Pradesh Assembly elections in 2022. The party has not allied with any other political party as of now but has signaled the possibility of an alliance. pic.twitter.com/qqdZz6FQXH
— ANI (@ANI) September 11, 2021
२०१७ मध्ये शिवसेना किती मतं मिळाली?
२०१७ च्या निवडणुकीत उत्तर प्रदेशात एकूण ८ कोटी ६७ लाख २८ हजार ३२४ लोकांनी मतदान केले. यात १ टक्के मतदानही शिवसेनेला झालं नाही. २०१७ मध्ये शिवसेनेच्या ५७ उमेदवारांना मिळून एकूण ८८ हजार ५९५ मतं मिळाली. या ५७ जागांपैकी ४३ मतदारसंघ असे होते जिथे शिवसेनेच्या उमेदवाराला १ हजारपेक्षाही कमी मतदान झाले. तर काही जागा अशा होत्या ज्याठिकाणी शिवसेनेच्या उमेदवाराला २०० मतंही मिळाली नाहीत. अनेक जागांवर शिवसेनेच्या उमेदवाराला नोटापेक्षाही कमी मतदान झाले.
This is BJP's internal matter (Gujarat CM's resignation). We'll contest the elections in Uttar Pradesh on around 100 seats (total 403 seats), which will take place next year. In Goa, we'll contest elections on more than 20 seats, we may form an alliance: Sanjay Raut, Shiv Sena pic.twitter.com/im5V399A5n
— ANI (@ANI) September 12, 2021
केवळ २ जागांवर शिवसेनेचं अस्तित्व दिसलं
२०१७ च्या निवडणुकीत एका जागेवर शिवसेनेच्या उमेदवाराचं डिपॉझिट वाचलं होतं. गोंडा विधानसभा मतदारसंघात शिवसेनेच्या महेश तिवारी यांना ३५ हजार ६०६ मतं मिळाली होती. या मतदारसंघात शिवसेना चौथ्या स्थानावर होती. गोंडा विधानसभा मतदारसंघात शिवसेनेच्या उमेदवाराचं डिपॉझिट वाचलं होतं. गोंडासोबतच बदायू विधानसभा मतदारसंघात शिवसेनेच्या उमेदवाराला १४ हजार ५७६ मतं मिळाली होती. परंतु या मतदारसंघात डिपॉझिट वाचवता आलं नाही.
उत्तर प्रदेशात शिवसेनेचा मविआ प्रयोग
उत्तर प्रदेशच्या पुढील निवडणुकीत शिवसेना १०० जागा लढवणार असल्याचं सांगत आहे. पण या निवडणुकीत हे महाराष्ट्राप्रमाणेच महाविकास आघाडीचा प्रयोग करण्याची शक्यता आहे. याबाबत शिवसेना नेते संजय राऊत म्हणाले की, उत्तर प्रदेशात काही शेतकरी संघटनांचा आम्हाला पाठिंबा आहे. पश्चिमी उत्तर प्रदेशातील शेतकरी संघटनांनी शिवसेनेला जाहीर पाठींबा दिला आहे. उत्तर प्रदेशात युती झाली नाही तर आम्ही एकटं लढू असा निर्धार संजय राऊतांनी बोलून दाखवला आहे.