रस्त्यावर शांतता, पण सोशल मीडियात घमासान सुरूच; ‘ते’ शिवसैनिक पोहोचले ‘वर्षा’वर
By ऑनलाइन लोकमत | Published: June 18, 2021 07:51 AM2021-06-18T07:51:53+5:302021-06-18T07:52:16+5:30
राड्यात आघाडीवर असलेल्या शिवसैनिकांनी वर्षा निवासस्थानी गुरुवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. राजनंदा चॅरिटेबल ट्रस्टला मुख्यमंत्री सहाय्यता निधीस एक लाखांचा चेक द्यायचा होता, त्यासाठी ही भेट होती, असा दावा स्थानिक आमदार सदा सरवणकर यांनी केला.
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : राम मंदिराच्या प्रश्नावर शिवसेना भवन परिसरात भाजप, शिवसैनिकांत झालेल्या राड्यानंतर गुरुवारी दोन्ही पक्ष कार्यालयांवर तणावपूर्ण शांतता होती. पोलिसांनी दोन्ही कार्यालयांसह संवेदनशील ठिकाणांवरील बंदोबस्त वाढविला. रस्त्यावर शांतता असली तरी सोशल मीडियात मात्र दोन्ही बाजूने घमासान सुरू आहे.
मुंबईतील शिवसेना नेत्यांनी या घटनेच्या निषेधाचे व्हिडिओ प्रसारित केले. भाजपच्या शिवसेना भवनवर मोर्चा आणण्याच्या भूमिकेवर आक्षेप घेतानाच पुन्हा असे प्रकार घडल्यास तीव्र प्रतिक्रियेचा इशारा दिला, तर बुधवारी जशास तसे उत्तर देण्याची भाषा करणारे भाजप नेते काहीसे बॅकफूटवर गेलेले पाहायला मिळाले.
सेना पदाधिकाऱ्यांच्या आक्रमक भाषेला उत्तर देताना गुरुवारी भाजपने कायदा सुव्यवस्था, विकासाचा मुद्दा मांडला. राडेबाजी शिवसेनेची संस्कृती आहे. आता महिलांवरील हल्ल्याची भर पडली. तुम्ही राड्याची तारीख सांगा, आम्ही विकासकामांच्या तारखा सांगतो, अशी भूमिका भाजपच्या मुंबई महिला अध्यक्षा, स्थानिक नगरसेविका शीतल गंभीर यांनी मांडली.
राड्यात आघाडीवर असलेल्या शिवसैनिकांनी वर्षा निवासस्थानी गुरुवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. राजनंदा चॅरिटेबल ट्रस्टला मुख्यमंत्री सहाय्यता निधीस एक लाखांचा चेक द्यायचा होता, त्यासाठी ही भेट होती, असा दावा स्थानिक आमदार सदा सरवणकर यांनी केला. यावेळी मुख्यमंत्र्यांनी बुधवारच्या घटनेची चौकशी केली. आपण शांतता राखायला हवी, असे ते म्हणाले. यापेक्षा जास्त भाष्य या विषयावर त्यांनी केले नसल्याचे सरवणकर म्हणाले.
पाेलीस तपासणार सीसीटीव्ही फूटेज
राड्याप्रकरणी गुन्हे दाखल झाले आहेत. आता, सीसीटीव्ही फूटेज तपासून या प्रकरणात कोण कोण सहभागी आहेत, हे पाहून त्यानुसार कारवाई केली जाईल, अशी माहिती पोलीस उपायुक्त प्रणय अशोक यांनी दिली.