...म्हणून डोक्यावरचे केस गेलेले दिसताहेत; उद्धव ठाकरेंनी सांगितलं खरं कारण
By ऑनलाइन लोकमत | Published: July 25, 2020 08:22 AM2020-07-25T08:22:15+5:302020-07-25T10:21:29+5:30
Uddhav Thackeray Interview With Sanjay Raut: अगदी माझ्या मनात डॉक्टर व्हावं असा विचार डोकावत होता पण नाही झालो ते बरचं झालं. डॉक्टर व्हावं म्हणून तसा प्रयत्न मी कधी केला नाही, पण मधल्या काळात होमिओपॅथीचा अभ्यास जरुर केला असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी सांगितले
मुंबई – शिवसेना नेते संजय राऊत यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची मुलाखत घेतली, या मुलाखतीचा पहिला भाग आज प्रसिद्ध करण्यात आला आहे. यात कोरोनापासून ते विरोधकांच्या आरोपापर्यंत सर्वंच प्रश्नावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी सडेतोड उत्तरं दिली आहेत. मुलाखतीच्या सुरुवातीला संजय राऊत यांनी मुख्यमंत्र्यांना काही गमतीदार प्रश्न विचारले.
तुमच्या चेहऱ्यावर कोणताही तणाव नाही, फक्त थोडे डोक्यावरचे केस तेवढे गेलेले दिसताहेत, हा सहा महिन्यांतला परिणाम आहे का? असा सवाल संजय राऊत यांनी केला. त्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, माझा चेहरा स्वच्छच आहे, फेसबुकलाईव्हमध्ये सुद्धा माझा फेस हा स्वच्छच होता. फेसबुकच्या माध्यमातून मी जनतेशी संवाद साधला, त्याला काहीही म्हटलं तरी मी जनतेशी असलेले माझं नातं तुटू दिलं नाही, जनतेशी माझा संबंध दुरावू दिला नाही. त्यांच्यासोबत मी म्हणजे महाराष्ट्र सरकार त्यांच्या खांद्याला खांदा लावून प्रत्येक संकटात, प्रत्येक पावलांवर त्यांच्यासोबत आहे. केस कमी झालेले दिसताहेत, त्याचं कारणही सांगतो, एकतर बऱ्याच दिवसानंतर कालच मी केस कापलेत, गेले तीन-चार महिने स्वत:च स्वत:चे केस थोडेफार कमी करत होतो असं भन्नाट उत्तर त्यांनी दिलं. (Uddhav Thackeray Interview With Sanjay Raut)
तसेच कोरोना संकटकाळात तुम्ही बोलत असता तेव्हा ते ऐकताना असं वाटायचं की, जागतिक आरोग्य संघटनेलासुद्धा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मार्गदर्शन करताहेत की, इतकं आपलं डॉक्टरी ज्ञान, वैद्यकीय ज्ञान आपल्या बोलण्यातून दिसतं, हे डॉक्टरी ज्ञान आपल्याकडे कुठून आलं? असा प्रश्न संजय राऊतांनी केला. त्यावर याला असं काही नेमकं उत्तर देता येणार नाही, लहानपणापासून वैद्यकीय शास्त्र हा अगदी कुतूहलाचा आणि अभ्यासाचा विषय राहिलेला आहे. अगदी माझ्या मनात डॉक्टर व्हावं असा विचार डोकावत होता पण नाही झालो ते बरचं झालं. डॉक्टर व्हावं म्हणून तसा प्रयत्न मी कधी केला नाही, पण मधल्या काळात होमिओपॅथीचा अभ्यास जरुर केला असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी सांगितले.(Uddhav Thackeray Interview With Sanjay Raut)
दरम्यान, आमच्या घरात याबाबत सगळ्यांनाच रुची होती, आमच्याकडे औषधांचा बॉक्सच असायचा, त्यात जे आता खूप वापरलं जातं ते आर्सेनिक आल्बम वैगेरे अनेक औषधे असायची. कोणाला बरं वाटत नसेल तर घरच्या घरी उपचार केले जायचे. तेव्हा होमिओपॅथीचे डॉक्टर्स आमच्याकडे यायचे. त्याकाळी आतासारखे उपद्व्यापी व्हायरस वैगेरे नव्हते. त्रासदायक व्हायरस नव्हते. तेव्हा मी होमिओपॅथीचा अभ्यास करत होतो. कळत नकळत ती जी आवड होती ती आजही थोडीफार जिवंत आहे असंही मुख्यमंत्री म्हणाले.
पाहा व्हिडीओ