"...तर अमेरिकेत जे घडले त्याची भारतात पुनरावृत्ती व्हायला वेळ लागणार नाही"
By बाळकृष्ण परब | Published: November 7, 2020 08:24 AM2020-11-07T08:24:56+5:302020-11-07T08:28:53+5:30
arnab Goswami News : सदोष मनुष्यवध प्रकरणात सरकारवर आणि ज्यांचा मृत्यू झाला त्या नाईक कुटुंबावर अश्लाघ्य चिखलफेक करणाऱ्या टोळ्यांनी भान राखले नाही तर अमेरिकेत ट्रम्प यांच्याबाबतीत जे घडले त्याची पुनरावृत्ती भारतात व्हायला वेळ लागणार नाही
मुंबई - अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणी रिपब्लिक वृत्तवाहिनीचे संपादक अर्णव गोस्वामी यांना झालेल्या अटकेवरून राज्यातील सत्ताधारी शिवसेना आणि मुख्य विरोधी पक्ष असलेला भाजपा आमने-सामने आले आहेत. अर्णववर झालेल्या कारवाईविरोधात भाजपाच्या नेत्यांनी विरोध आणि आंदोलनांना सुरुवात केली आहे. दरम्यान, अर्णव गोस्वामी यांच्यावरील कारवाईला विरोध करणाऱ्या भाजपावर शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनामधून जोरदार टीकास्त्र सोडण्यात आले आहे. सदोष मनुष्यवध प्रकरणात सरकारवर आणि ज्यांचा मृत्यू झाला त्या नाईक कुटुंबावर अश्लाघ्य चिखलफेक करणाऱ्या टोळ्यांनी भान राखले नाही तर अमेरिकेत ट्रम्प यांच्याबाबतीत जे घडले त्याची पुनरावृत्ती भारतात व्हायला वेळ लागणार नाही, असा इशाराही या अग्रलेखातून लगावण्यात आला आहे.
सामनाच्या आजच्या अग्रलेखात म्हटले आहे की, आत्महत्येस प्रवृत्त करणे आणि त्यातून आत्महत्या घडणे हा एक प्रकारे सदोष मनुष्यवधासारखाच गुन्हा आहे. असा गुन्हा करणारी व्यक्ती लहान असो की मोठी त्याच्यावर कायद्याने कारवाई व्हायला हवी. मात्र भाजपाला असे कायद्याचे राज्य मान्य नाही. मुळात कायदाच मान्य नाही, असे भरकटलेले वर्तन ते करत आहेत. महाराष्ट्रात २०१८ मध्ये एका मायलेकराने आत्महत्या केली. तत्कालीन सरकारने हे प्रकरण दडपले. पोलिसांनी या प्रकरणातील एका आरोपीच पकडले आणि त्याच्या जामिनावर सुनावणी सुरू असताना भाजपाचे नेते वेडेखुळेच बनले. जोपर्यंत सदोष मनुष्यवधातले महात्मा सुटल नाहीत तोपर्यंत आम्ही सगळे दंडास काळ्या फिती लावून काम करू. हा तर मानसिक विकलांगतेचा तमाशाच आहे. मनाने भरकटलेले अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प जसे वागत आहेत. तसेच डिट्टो महाराष्ट्रातील भाजपा पुढारी वागू लागले आहेत, असा टोला सामनामधून लगावण्यात आला आहे.
ट्रम्प यांचे वर्तंन कायद्यास आणि अमेरिकेसारख्या राष्ट्राच्या प्रतिष्ठेस धरून नाही. तशीच अप्रतिष्ठा महाराष्ट्रातील विरोधी पक्षाकडून कायद्याच्याबाबतीत सुरू आहे. आणीबाणीची परिस्थिती कोण निर्माण करत आहे आणि अराजक कुणाला हवे आहे ते आता स्पष्ट झाले आहे. पंतप्रधान मोदींच्या प्रतिमेचे आणि प्रतिष्ठेचे भंजन करण्याचे हे कारस्थान सुरू आहे. अमित शहांपासून अनेक भाजपाच्या नेत्यांना तत्कालीन सरकारच्या कारवाईस सामोरे जावे लागले होते. या सर्व कारवाया सुडाच्याच होत्या असे शहा यांचे म्हणणे असले तरी त्यासाठी भाजपाने रस्त्यावर उतरून आंदोलने केली नाहीत. कायद्याला आव्हान द्यायचा प्रयत्न केला नाही. न्यायालयीन डावपेचातून शहा सुटले. तेव्हा मोदी हेच गुजरातचे मुख्यमंत्री होते. त्यांनी तेव्हा संयम राखला. त्याचे फळ त्यांना मिळाले. आज सदोष मनुष्यवध प्रकरणात सरकारवर आणि ज्यांचा मृत्यू झाला त्या नाईक कुटुंबावर अश्लाघ्य चिखलफेक करणाऱ्या टोळ्यांनी भान राखले नाही तर अमेरिकेत ट्रम्प यांच्याबाबतीत जे घडले त्याची पुनरावृत्ती भारतात व्हायला वेळ लागणार नाही, असा सल्लाही सामनामधून देण्यात आला.
उद्धव ठाकरे आणि इंदिरा गांधी यांचे पोस्टर्स चिकटवून आणीबाणीची आठवण लोकांना करून दिली जात आहे. हा बालीशपणा तर आहेच. पण अज्ञानसुद्धा आहे. इंदिरा गांधी यांच्याशी तुलना होणे ही गौरवाचीच बाब आहे. भारताच्या फाळणीचा सूड याच पोलादी स्त्रीने पाकिस्तानची फाळणी करून घेतला होता. असे धाडस एकाही मर्द म्हणवून घेणाऱ्या राज्यकर्त्यास दाखवता आलेले नाही. बाकी भाजपाने दिल्लीत इंदिराजी आणि उद्धव ठाकरे यांचे चेहरे एकत्र लावले असतील तर त्याचे स्वागतच करायला हवे. यानिमित्ताने भाजपाने इतिहासाचे वाचन केले तर बरे होईल. म्हणजे सदोष मनुष्यवध प्रकरणातील आरोपीच्या समर्थनार्थ दंडास काळ्या पट्टया आणि पायात घुंगरू बांधून नाचायची वेळ येणार नाही. पंतप्रधान, राष्ट्रपती, लष्करप्रमुख, राज्यपाल अशा पदावरील व्यक्तींचा एकेरी आणि अरे-तुरेच्या भाषेत जाहीर उद्धार केलेला भाजपाला चालणार असेल तर त्यांनी तसे सांगावे, म्हणजे त्यांच्या दंडावरील काळ्या पट्ट्यांचे आम्ही स्वागत करू. अमित शाह, मोदी यांच्याशी मतभेद असू शकतात. म्हणून एकेरी उल्लेख करून चिखलफेक करणे आम्हाला मान्य नाही. मनुष्यवधास जबाबदार असणाऱ्यांसाठी रस्त्यावर उतरणारा सत्ताधारी पक्ष म्हणजे जगातले आठवे आश्चर्यच मानावे लागेल. नक्कीच त्यांच्या रक्तात आणि मेंदूत काहीतरी गडबड आहे, असा टोलाही या आग्रलेखातून लगावण्यात आला.