"संभाजीनगरमुळे महाविकास आघाडीत बिघाडी होईल, असं वाटणारे ठार वेडे"
By बाळकृष्ण परब | Published: January 2, 2021 09:50 AM2021-01-02T09:50:49+5:302021-01-02T09:59:22+5:30
Shiv Sena Attack on BJP : औरंगाबादचे संभाजीनगर असे नामांतर करण्यास काँग्रेसने विरोध केला आहे. त्यावरून भाजपाला गलिच्छ उकळ्या फुटल्या आहेत.
मुंबई - एकमेकांचे कट्टर विरोधक बनलेले शिवसेना आणि भाजपा आता औरंगाबादच्या नामांतराच्या मुद्द्यावरून आमनेसामने आले आहेत. औरंगाबादच्या नामांतराच्या शिवसेनेने तयार केलेल्या प्रस्तावाला काँग्रेसने विरोध केल्यानंतर भाजपाने शिवसेनेवर टीकेची झोड उठवण्यात आली होती. आता भाजपाच्या या टीकेला शिवसेनेकडून प्रत्युत्तर देण्यात आले असून, जेव्हा अलाहाबादचे प्रयागराज, फैजाबादचे अयोध्या आणि दिल्लीतील औरंगजेब रस्त्याचे अब्दुल कलाम असे नामांतर केले. तेव्हाच महाराष्ट्रातील औरंगाबादचे संभाजीनगर का केले नाही? हे भाजपाने सांगावे असा सवाल सामनामधील अग्रलेखामधून करण्यात आला आहे.
सामनाच्या आजच्या अग्रलेखात म्हटले आहे की, औरंगाबादचे संभाजीनगर असे नामांतर करण्यास काँग्रेसने विरोध केला आहे. त्यावरून भाजपाला गलिच्छ उकळ्या फुटल्या आहेत. काँग्रेसचा हा विरोध आजचा नाही जुनाच आहे. त्यामुळे त्याचा महाविकास आघाडीच्या ध्येयधोरणांशी संबंध जोडणे मुर्खपणाचे आहे. सरकारी कागदावर नसले तरी राज्यात काँग्रेसचा मुख्यमंत्री असताना शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी औरंगाबादचे संभाजीनगर असे नामांतर केले आणि जनतेने ते स्वीकारले. त्यामुळे आता संभाजीनगरमुळे महाविकास आघाडीत बिघाडी होईल, असे कुणाला वाटत असेल तर ते ठार वेडे आहेत.
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी औरंगाबादच्या नामांतरास विरोध जाहीर केल्यानंतर भाजपाला हिंदुत्वाचा घोर लागला आहे. आता शिवसेना काय करणार असा प्रश्न चंद्रकांत पाटील आदी लोकांनी केला आहे. शिवसेनेने भूमिका स्पष्ट करावी असा भाजपाचा आग्रह आहे. पण त्यात भूमिका स्पष्ट करण्यासारखे काय आहे. शिवसेनेने भूमिका बदललेली नाही. बाळासाहेब ठाकरे यांनी तीस वर्षांपूर्वीच जाहीरपणे औरंगाबादचे संभाजीनगर केले होते. हे नामांतर लोकांनी स्वीकारले आहे. आता सरकारी कागदपत्रांमध्येही लवकच दुरुस्ती होईल. भाजपाला त्याची काळजी करण्याची गरज नाही. औरंगाबादचे संभाजीनगर हा लोकनिर्णय आहे. जे निजामी अवलादीचे आहेत ते औरंग्यापुढे गुडघे टेकत अशतील तर तो त्यांचा प्रश्न, असा टोला शिवसेनेने लगावला आहे.
आता भाजपाच्या थयथयाटाबाबत बोलायचे तर अलाहाबादचे प्रयागराज, फैजाबादचे अयोध्या होऊ शकते, दिल्लीतील औरंगजेब रस्त्याचे डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम मार्ग असे नामांतर होऊ शकते तर औरंगाबादचे संभाजीनगर का होऊ शकत नाही असा सवाल चंद्रकांत पाटील यांनी विचारला आहे. मात्र ही नामांतरे केली तेव्हाच औरंगाबादचे संभाजीनगर का केले नाही. तुम्ही फक्त संभाजीनगरचेच नामांतर का शिल्लक ठेवले, असा प्रतिसवाल शिवसेनेने विचारला आहे. ज्याप्रमाणे अयोध्येतील राममंदिर सर्वसंमतीने होत आहे. संभाजीनगरच्याबाबतीतही तसाच निर्णय होईल, असा विश्वास शिवसेनेने या अग्रलेखातून व्यक्त केला आहे.
औरंगजेबाच्या नावाने महाराष्ट्राच्या भूमीत एक शहर असावे हा शिवरायांचाच अपमान ठरतो. एमआयएमचा ओवेसी संभाजीनगरला येऊन औरंगजेबाच्या कबरीसमोर गुडघे टेकतो. त्या ओवेसीच्या पक्षाचा माणूस संभाजीनगरचा खासदार म्हणून निवडून यावा यासाठी उघड प्रयत्न करणारे आज शिवसेनेस औरंगाबादच्या नामांतरावरून प्रश्न विचारत आहेत, हे ढोंग आहे. असा टोलाही सामनामधून लगावण्यात आला आहे.
बाकी बाळासाहेब थोरात म्हणतात ते बरोबरच आहे. महाराष्ट्राचे सरकार किमान समान कार्यक्रमाच्या अंमलबजावणीशी बांधील आहेच. अन्न, वस्त्र, निवारा, पददलितांना न्याय, शेतकरी, कष्टकऱ्यांना बळ देण्याचा हा कार्यक्रम आहेच तरीही कोणत्याही राज्याला धर्माचे आणि सरकारला स्वाभिमानाचे अधिष्ठान हवेच. औरंगजेब हा काही महाराष्ट्र धर्म किंवा स्वाभिमानाचे प्रतीक नाही. हे काँग्रेसवालेही मान्य करतील. औरंगजेब काही सेक्युलर नव्हता. हे समजून घेतले पाहिजे. भाजपावाल्यांनी चिंतातूर जंतूप्रमाणे उगाच वळवळ करू नये. पाकिस्तानात हिंदू मंदिरांची तोडफोड सूरू आहे. तेथे एखादा सर्जिकल स्ट्राइचा फुगा फोडता येईल का ते पाहावे, असा सल्लाही सामनामधून देण्यात आला आहे.