सोशल मिडियावरील राजकीय जाहिरातींचा खर्च यंदा दुप्पट
By ऑनलाइन लोकमत | Published: April 17, 2019 05:48 AM2019-04-17T05:48:31+5:302019-04-17T05:48:46+5:30
सोशल मिडियावर विविध राजकीय पक्षांकडून केल्या जाणाऱ्या जाहिरातींमध्ये वाढ झाली
कोलकाता : सोशल मिडियावर विविध राजकीय पक्षांकडून केल्या जाणाऱ्या जाहिरातींमध्ये वाढ झाली असून यावरील खर्च सुमारे ५०० कोटी रुपयांपर्यंत होऊ शकतो. मागील निवडणुकीच्या तुलनेत यंदा हा खर्च दुप्पट होण्याचा अंदाज वर्तविला जात आहे.
सध्या प्रत्येकाच्याच हातात मोबाईल फोन आला असून स्वस्त असलेल्या डेटा पॅकमुळे प्रत्येकजणच सोशल मिडियावर सक्रीय आहे. त्यामुळेच विविध राजकीय पक्षांनी आता सोषल मिडियावर जाहिराती करण्यास प्रारंभ केला आहे. मागील लोकसभा निवडणुकीमध्ये सोशल मिडियावर करण्यात आलेल्या जाहिरातींच्या खर्चपेक्षा यावेळी अधिक रक्कम खर्च होणार असून हा आकडा यंदा ५०० कोटी रुपयांपर्यंत पोहोचू शकेल.
यंदा सोशल मिडियावरील खर्चामध्ये पुन्हा भाजप अव्वल स्थानी राहणार आहे. सोशल मिडियावर भाजप सर्वाधिक सक्रीय असतो. त्यामुळे त्यांचा सोशल मिडियावरील खर्चही मोठ्या प्रमाणावर दिसून येतो. गुगलच्या राजकीय जाहिरातीविषयक पारदर्शकता अहवालामध्ये १९ फेब्रुवारीपासून आजपर्यंत ८.६३ कोटी रुपयांच्या जाहिराती आल्याचे म्हंटले आहे. फेसबुकवर १२.१८ कोटी रुपयांच्या राजकीय जाहिराती केल्या गेल्या आहेत.